Nashik Fraud Marriage : आजकाल लग्नाचा (Marriage) विषय म्हटला तर तरुणांना मुली मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे आईवडील नातेवाईक, लांबच्या पाहुण्यांकडून लग्न जमवण्यासाठी तगादा लावला जात आहे. अशा स्थितीत कोणत्याही जिल्ह्यातून मुलगी मिळाली तरीही आईवडिलांचा नकार नसतो, उलट सदर मुलीला विवाहासाठी पैसा, दागिने पुरविणे या गोष्टी सुद्धा केल्या जात आहेत. मात्र याच माध्यमातून बोगस लग्न (Fraud Marriage) लावून पॆसे दागिने घेऊन पळून जाणाऱ्या नवऱ्या मुलींच्या घटना काही नवीन नाही. नाशिकमध्ये पुन्हा एकदा असा प्रकार समोर आला आहे.
नाशिक (Nashik) जिल्ह्यात बनावट लग्न लावून पळून जाणाऱ्या टोळ्या कार्यरत असल्याचे अनेक घटनांवरून दिसून येत आहे. अडचणीतील तरुणांना हेरून त्यांचे बनावट नवरीशी लग्न लावून त्यांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. यामध्ये सुशिक्षित तरुण देखील फसत असल्याचे चित्र आहे. नाशिक जिल्ह्यातील चांदवड (Chandwad) तालुक्यात असा प्रकार घडला असून लग्न झाल्यानंतर 18 दिवसांतच मावशी आजारी असल्याचे कारण देत सासरकडील दागिने आणि रोकड घेऊन नववधू फरार झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी तातडीने तपासचक्रे फिरवत पळून गेलेल्या नववधूसह मध्यस्थीकरणाऱ्या चौघांना अटक केली आहे. सदर नववधूसह चौघांनी न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली.
चांदवड तालुक्यातील एका शेतकऱ्याने लग्न जमत नसल्याने पुरी गावातील ओळखीतील व्यक्तीस लग्नासाठी मुलगी शोधण्यास सांगितले. त्यानुसार संबंधिताने शोध सुरु करत नांदेड जिल्ह्यातील एक मुलगी शोधली. संबंधित व्यक्तीने मोबाईलवर शेतकऱ्याने फोटो नवऱ्या मुलीला पाठविला. तिनेही स्वत:चा फोटो पाठविला. फोटो बघितल्यानंतर शेतकऱ्याने पसंती दर्शविली. त्यानंतर मुलगी बेबी जगताप, तिची बहिण अश्विनी पाटील आणि मावशी संगीता या चांदवड येथील मध्यस्थीच्या घरी आल्या. याठिकाणी पाहण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर अडीच लाख रुपये रोख व 48 हजार रुपयाचे दागिने मुलीच्या नातेवाईकांना देण्याचे ठरले.
मावशीला पाहून येते म्हणाली, ती परत आलीच नाही...
दरम्यान सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर एप्रिल महिन्यात दोघांचे लग्न झाले. लग्न झाल्यानंतर 18 दिवसांनी नववधू बेबी हिने नवऱ्याकडे नाशिकची मावशी आजारी असल्याचे सांगत तिला भेटून पुन्हा येते, असे सांगितले. नवऱ्याने होकार दिल्यानंतर तिला नाशिक येथे मावशीच्या घरी आणून सोडले. पुन्हा घरी येईल, असे सांगून नववधू मावशीकडे निघून गेली. मात्र ती परत आली नाही. त्यातून फसवणूक झाल्याचे शेतकऱ्याच्या लक्षात आले. त्याने वडनेर भैरव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 3 ऑगस्ट रोजी संशयित नववधू बहिणी आणि मावशीसोबत चांदवडमधील बाजारात फिरताना दिसली. पोलिसांनी दोघीना अटक करत त्यांनी दिलेल्या माहितीवरून मध्यस्वीस पोलिसांनी अटक केली.