Sadabhau Khot : स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Saghtana) आता शिल्लकच राहिली नाही, त्यामुळं गटतट काय होणार? असा सवाल करत रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्यावर टीका केलीय. राजू शेट्टींना अनेक सहकारी सोडून गेले आहेत, त्यामुळं त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे खोत म्हणाले. ते आज पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राजू शेट्टींवर टीका केली. रविकांत तुपकर यांचा एकट्याचाच नाहीतर आमचा ही बळी घेतल्याचे खोत म्हणाले.
स्वाभिमानी शेतकरी संघटना वाढवण्यासाठी अनेकांनी काम केल्याचे सदाभाऊ खोत म्हणाले. दिवंगत शरद जोशींच्या विचाराने आम्ही एकत्रित आलो होतो. पण काही खुजी नेतृत्व असतात ती बाजार बुणग्यांचं ऐकतात असं म्हणत खोतांनी शेट्टींना टोला लगावला. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पुण्यात (Pune) आज शिस्तपालन आणि कोअर कमिटीची बैठक आहे. या बैठकीला स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) जाणार नाहीत. त्यामुळं या बैठकीत तुपकर यांच्याबाबत काय निर्णय होणार हे पाहणं आज महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान, सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानीच्या शिस्तपालन आणि कोअर कमिटीवरही टीका केली. ही शिस्तपालन समिती दुसऱ्यादा उदयास आली आहे. अगोदर माझ्यवेळी आणि आता तुपकर यांच्यावेळी. मी या समितीसमोर आलो तरी मात्र तुपकर यांनी समितीलाच फाट्यावर मारल्याचे खोत म्हणाले.
खोतांचा राज्य सरकारला इशारा
राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी पाणीपट्टी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, याला सदाभाऊ खोत यांनी कडाडून विरोध केला आहे. याबाबत समिती घेऊन सरकारकडे जाणार असल्याचे खोत म्हणाले. सरकारनं याबाबत विचार न केल्यास सरकार विरोधात मोठं जन आंदोलन घेऊ असा इशाराही खोतांनी राज्य सरकारला दिला.
रविकांत तुपकरांची भूमिका
मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेत राहूनच काम करणार असल्याची भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी मांडली. मी या पक्षात जाणार, मी त्या पक्षात जाणार अशा अफवा सुरु आहेत. त्या अफवा थांबवाव्यात असेही तुपकर यावेळी म्हणाले. रविकांत तुपकर यांनी आज बुलढाण्यात (Buldhana) पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ही भूमिका मांडली.
महाराष्ट्रात तरुण पोरांची मोठी फौज उभारणार
मला शेतकरी संघटनेच राहूनच काम करायचे आहे. शेतकरी हा माझा आत्मा असल्याचे तुपकर यावेळी म्हणाले. रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मला शेतकऱ्यांसाठी लढत राहायचंय. यासाठी मी आजपासून कामाला लागलो असल्याची तुपकर म्हणाले. गेल्या चार ते पाच वर्षात अनेकवेळा राजू शेट्टी यांच्यासमोर मी माझी भूमिका मांडली असल्याचे तुपकर म्हणाले. मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. संघटनेत राहूनच चळवळीचं काम करत राहणार आहे. ते मला नेतृत्वानं प्रामाणिकपणानं करु द्यावं अशी माझी भूमिका असल्याचे ते म्हणाले. शेतकरी प्रश्नांवर लढण्यासाठी महाराष्ट्रात तरुण पोरांची मोठी फौज उभारणार असल्याचे तुपकर यावेळी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: