Beed News : बीड (Beed) जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील सोने सांगवी गावामध्ये गेल्या पंधरा दिवसापासून वीजपुरवठा खंडित झाला असून, तात्काळ वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा यासाठी स्वतः सरपंचानेच पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरु केलं आहे. या आंदोलनामध्ये ग्रामपंचायतीचे सदस्य देखील सहभागी झाले असून, सकाळी आठ वाजल्यापासून सरपंच मुकुंद कणसे आणि इतर सदस्य गावातील पाण्याच्या टाकीवर चढले आहेत. मात्र, अद्याप एकही महावितरणचा अधिकारी त्या ठिकाणी आला नसल्याने गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. 


सोनेसांगवी गावातील तीन ट्रान्सफॉर्मर हे गेल्या पंधरा दिवसापासून जळालेले आहेत. अनेक वेळा मागणी करुन आणि निवेदन देऊन देखील महावितरणकडून याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या सरपंच मुकुंद कणसे यांनी गावातील वीज पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी चक्क आता पाण्याच्या टाकीवर चढूनच शोले स्टाईल आंदोलन सुरु केलं आहे. त्यांच्या आंदोलनाला इतर ग्रामपंचायत सदस्य यांनी सुद्धा पाठिंबा दिला आहे. जोपर्यंत महावितरण ठोस पाऊले उचलणार नाही, तोपर्यंत पाण्याच्या टाकीवरुन खाली येणार नसल्याची भूमिका सरपंच मुकुंद कणसे यांनी घेतली आहे. 


गावकऱ्यांचे प्रचंड हाल...


सोनेसांगवी गावातील तीन ट्रान्सफॉर्मर जळाल्याने मागील पंधरा दिवसांपासून गावात वीज नाही. त्यामुळे गावात अंधार आहे. तसेच वीज नसल्याने पाणीपुरवठा देखील ठप्प झाला आहे. त्यामुळे गावकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे अशात सर्प आणि इतर प्राण्यांचा धोका असताना रात्र अंधारात काढावी लागत आहे. अनेकदा महावितरणच्या अधिकाऱ्यांना याबाबत तक्रार आणि निवेदन देऊन देखील याची दखल घेतली जात नसल्याने गावकऱ्यांमध्ये संताप आहे. त्यामुळे शेवटी सरपंच यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरु केले आहे. 


महावितरण विरोधात संताप... 


ग्रामीण भागात अनेकदा विजेचा प्रश्न निर्माण होतात. ट्रान्सफॉर्मर जळल्यावर अनेक दिवस पाठपुरावा करुन देखील वेळेत ट्रान्सफॉर्मर मिळत नाही. अशीच काही परिस्थिती बीडच्या सोनेसांगवी गावात पाहायला मिळत आहे. पंधरा दिवसांपासून गावातील ट्रान्सफॉर्मर जळल्यावर देखील, महावितरण याची दखल घेण्यासाठी तयार नाही. गावकऱ्यांनी मागणी करुन देखील त्यांना वेळेत ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करुन दिला जात नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. विशेष म्हणजे सरपंचांनी पाण्याच्या टाकीवर चढत आंदोलन सुरु केल्यानंतर देखील महावितरण याची दखल घेत नसल्याने गावकऱ्यांमध्ये मोठा संताप पाहायला मिळत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


पीक विमा घोटाळा! सातबारा नांदेडचा अन् विमा काढला बीडचा; शेतकऱ्यांमध्ये खळबळ