Nashik Crime : एकीकडे नाशिक (Nashik) ग्रामीण पोलिसांनी नुकतीच दोन मोठ्या दरोड्यांचा उकल केली असताना आज नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात (Dindori Taluka) पुन्हा सशस्र दरोडा (Robbery) घालण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. या दरोड्यात दागिने, रोख रक्कम असा अंदाजे 20 लाखांचा मुद्देमाल लंपास झाल्याचे समजते आहे.
नाशिक (Nashik) जिल्ह्याच्या गुन्हेगारीवर (Crime) अंकुश ठेवण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांनी (Nashik Police) कंबर कसली असून जिल्ह्यातील दोन महत्वाच्या दरोड्यांची उकल करण्यात यश आले आहे. अशातच दिंडोरी तालुक्यातील ढकांबे शिवारात दरोडा पडल्याची घटना घडली आहे. आज पहाटेच्या सुमारस काही सशस्र टोळक्याने घरात घुसून कुटुंबियांना बंदुकीचा धाक दाखवून जबरी लूट केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सशस्र दरोड्याचे प्रकरण समोर आल्याने ग्रामीण भागात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
नाशिक शहरापासून दिंडोरी तालुक्याच्या हद्दीत असलेल्या वणी रस्त्यावर ढकांबे गाव आहे. येथील बोडके वस्तीवर हि घटना घडली आहे. मानोरी शिवारात आज पहाटे 1 ते 1.30 वाजेच्या सुमारास शेतकरी रतन शिवाजी बोडके राहत असलेल्या "शिवकथल" बंगल्यामध्ये पाच ते सहा अज्ञात चोरट्यांनी प्रवेश रात्रीच्या सुमारास कुटुंब गाढ झोपेत असताना अचानक सात ते आठ जणांचे टोळक्याने बंदुकीचा धाक दाखवत घरात प्रवेश केला. विशेष घराबाहेर असलेल्या पाळीव कुत्र्याला दरोडेखोरांनी गुंगीचे औषध देत घरात प्रवेश केला. त्यांनतर बंदुकीचा धाक दाखवून बोडके कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देत घरातील सोने, पैसे बाहेर काढण्यास सांगितले. घरातील 28 तोळे सोन्याचे दागिने, 480 ग्रम चांदी व 8 लाख 50 हजार रोख रक्कम चोरून नेले आहे. या घटनेमुळे बोडके वस्तीवर घबराट पसरली आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच दिंडोरी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. तसेच पुढील तपास सुरु केला आहे. एकीकडे नाशिक ग्रामीणला लाभलेल्या नव्या अधीक्षकांनी गुन्हेगारांना इंगा दाखविण्यास सुरवात केली असून पहिल्याच आठवड्यात दोन ते तीन घरफोड्यांचा निकाल लावला असून सहा संशयितांना बेड्या ठोकण्यात आल्या. यामुळे ग्रामीण भागात घडणाऱ्या सशस्र दरोड्यांना लगाम लागणार असल्याचे दिसत असताना पुन्हा ढकांबे येथील घटनेने पोलिसाना आव्हान दिले आहे.
ठोस पाऊले उचलणे गरजेचे...
नाशिक शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारी नित्याची झाली आहे. यावर अंकुश लावण्यासाठी पोलिसानं प्रशासन हरेक प्रकारे प्रयत्न करत असताना गुन्हे कमी होण्याचे नाव नाही. उलट छोट्या मोठ्या चोऱ्या, मारहाण, हल्ला, घरफोडी आदी घटना राजरोसपणे घडत आहेत. त्यामुळे नागरिकांचा जीव देखील मेटाकुटीला आला आहे. अशातच आता नाशिक ग्रामीणच्या अधीक्षक पदी शहाजी उमाप रुजू झाले आहेत. काही दिवसांपूर्वी रुजू झालेल्या उमाप यांनी कारभार समजून घेत लागलीच गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे नाशिकच्या ग्रामीण भागात गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. तर आजच्या घटनेने पुन्हा एकदा नाशिक ग्रामीण पोलिसांना दरोडेखोरांचा बिमोड करण्यासाठी ठोस पाऊले उचलणे आवश्यक असल्याचे दिसते.