Sugarcane News : राज्यातील साखर कारखान्यांना (Sugar Factory) ऊस तोडणी आणि वाहतुकीसाठी किती पैसै मोजायचे, याचे दरपत्रक साखर आयुक्त शेखर गायकवाड (Sugar Commissioner Shekhar Gaikwad) यांनी जाहीर केलं आहे. साखर कारखान्यांकडून ऊस तोडणी आणि वाहतूक खर्च जास्त घेतला जातो, असा आरोप शेतकऱ्यांसह विविध शेतकरी संघटनांकडून केला जात होता. त्यामुळं शेतकऱ्यांना ऊस तोडणी आणि वाहतूक खर्चाची माहिती व्हावी यासाठी आयुक्तांनी हे दर जाहीर केले आहेत. ठरलेल्या दरापेक्षा अधिक पैसे घेणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
राज्यातील 200 साखर कारखान्यांचे ऊस तोडणीसह वाहतुकीचं दरपत्रक जाहीर
राज्यातील सहकारी आणि खासगी साखर कारखाने शेतकऱ्यांचा ऊस ऊसतोड कामगार पाठवून गाळपासाठी घेऊन जतात. त्यासाठी येणारा खर्च शेतकऱ्यांच्या ऊसाच्या बिलातून वजा केला जातो. मात्र, साखर कारखाने तोडणी आणि वाहतुकीसाठी येणारा खर्च वाढवून दाखवतात असा शेतकरी संघटनांचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी राज्यातील 200 साखर कारखान्यांचे प्रती मेट्रिक टन ऊसाचे तोडणी आणि वाहतुकीचे दरपत्रक जाहीर केलं आहे. या दरपत्रकात नमुद करण्यात आलेली रक्कमच कारखाने शेतकऱ्यांच्या बीलातून वजा करु शकणार आहेत. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना स्वतः चा ऊस तोडून साखर कारखान्यापर्यंत पोहोचवायचा असेल तर त्यांना तशी मुभा देण्यात आली आहे..
धाराशिव शुगरचा सर्वाधिक तोडणी आणि वाहतुकीचा दर
राज्यातील 200 साखर कारखान्यांचे ऊसाचे तोडणी आणि वाहतुकीचे दरपत्रक जाहीर केले आहे. यामध्ये सर्वाधिक ऊस तोडणी आणि वाहतूक खर्चाचा दर (प्रति मेट्रिक टन) नाशिक जिल्ह्यातील धाराशिव शुगर कारखान्याचा आहे. त्या खारखान्याचा 1 हजार 109 रुपये खर्च आहे. त्याखालोखाल औरंगाबादच्या सिल्लोडमधील खडकपूर्णा अॅग्रो कारखान्याचा दर 1 हजार 102 रुपये आहे. तर, सर्वांत कमी दर सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील क्रांतिवीर डॉ. नागनाथ नाईकवडी हुतात्मा किसन अहीर कारखान्याचा दर आहे. तो दर 571 रुपये तर कोल्हापूर जिल्ह्यातील भोगावती साखर कारखान्याचा दर 595 रुपये इतका आहे. साखर कारखान्यांचा तोडणी आणि वाहतूक खर्च जास्त असतो, असा आरोप शेतकरी संघटनांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर येत्या हंगामात कारखान्यांचा खर्च वाजवी असल्याची खात्री करुन, गाळपासाठी ऊस देताना शेतकऱ्यांनी जवळच्या कारखान्याची निवड करावी. हा खर्च जास्त वाटल्यास शेतकऱ्यांना कारखान्याच्या कार्यक्रमानुसार परंतू स्वतः मालकतोड करुन ऊस गाळपासाठी नेता येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या: