Aurangabad News: औरंगाबादच्या सोयगाव तालुक्यातील जंगलातांडा गावात डेंग्यूनेचे थैमान पाहायला मिळत असून, डेंग्यूमुळे एका 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तर गावातील आणखी सहा रुग्णांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. प्रणव प्रेमसिंग चव्हाण असे डेंग्यूमुळे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांवर देखील रुग्णालयात उपचार सुरु आहे. तर जंगलातांडा गावात आरोग्य पथक ठाण मांडून असून, गावात साफसफाई करण्यात येत आहे. 


सोयगाव तालुक्यातील अडीच हजार लोकसंख्या असलेल्या जंगलातांडा या गावात पाच सहा दिवसांपासून तापेचे रुग्ण आढळून येत आहे. विशेष म्हणजे रुग्णांमध्ये पंधरा वर्षांच्या आतील मुलांची संख्या अधिक आहे. सदरील रुग्णांनी खासगी रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली असता यात अधिकतर रुग्णांना डेंग्यू असल्याचे निष्पन्न झाले असून काही रुग्णांचा चाचणी अहवाल येणे बाकी आहे. तर प्रणव प्रेमसिंग चव्हाण याचा डेंग्यूने मृत्यू झाला आहे. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे.  


यांच्यावर उपचार सुरु... 


जंगलातांडा गावातील प्रणव प्रेमसिंग चव्हाण यांचा डेंग्यूने मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. तर गावातील आणखी सहा जणांना ताप आल्याने त्यांच्यावर देखील उपचार करण्यात येत आहे. ज्यात अर्णव प्रेमसिंग चव्हाण (वय 7 ), मानवी प्रेमसिंग चव्हाण (वय 15), विक्रम विलास चव्हाण ( वय 11), कुणाल राजू राठोड (वय 12), प्रवीण बद्री राठोड (वय 14), किसन रामदास राठोड (वय 15) या डेंग्यूच्या सहा रुग्णांवर पाचोरा, सोयगाव व शेंदुर्णी येथील खासगी रुग्णालयात वैद्यकीय उपचार करण्यात येत आहे. 


गावकऱ्यांमध्ये प्रशासनाविरुध्द संताप...


या घटनेने गावकऱ्यांमध्ये प्रशासनाविरुध्द संताप पाहायला मिळत असून, नागरिकांनी गंभीर आरोप केले आहे. गावात ठिकठिकाणी नालीचे पाणी साचून निर्माण झालेल्या घाणीच्या साम्राज्यामुळेच जंगलातांडा गावात डेंग्यूची साथ पसरल्याचा आरोप ग्रामस्थांनी केली. विशेष म्हणजे कोरोना काळानंतर गावात धूर फवारणी करण्यात आलेली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. साफसफाई होत नसल्याने गावात डासांचा उपद्रव वाढल्याच्या आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. 


गावात आरोग्य पथक दाखल....


सोयगाव तालुक्यातील जंगलातांडा मुलांमध्ये तापेची साथ पसरल्याची माहिती मिळताच आरोग्य पथकाने गावात धाव घेतली आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीनिवास सोनवणे आरोग्य सेवक संतोष सोहनी, अमोल धमके, दादाराव झोंड यांच्या पथकाने गावात सर्वेक्षण करून नालीचे साचलेले दूषित पाणी वाहते करीत पाण्याचे अबेटिकरण केले आहे. तसेच गावातील ताप आणि इतर लक्षणे असणाऱ्या रुग्णांची तपासणी देखील करण्यात येत आहे. तर गावातील काही रुग्णांवर सोयगाव व शेंदुर्णी येथील खासगी रुग्णालयात वैद्यकीय उपचार करण्यात येत आहे.


Dengue Fever : डेंग्यूमध्ये पांढऱ्या पेशी का कमी होतात? यासाठी 'हे' उपाय करा