Nashik Farmer : शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारच्या (Maharashtra Government) अनेक योजना असून, यात महत्वपूर्ण आणि सध्याच्या घडीला अनेक शेतकऱ्यांना उपयुक्त असलेली अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका (Ahilyadevi Holkar Ropvatika) योजना होय. तुम्हाला जर अधिक उत्पन्न आणि विषमुक्त भाजीपाला उत्पादन करायचं असल्यास ही योजना महत्वपूर्ण असणार आहे. भाजीपाला उत्पादनाला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यारिता अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना ही राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राबविण्यात येत आहे.
फलोत्पादनामध्ये महाराष्ट्र राज्य अग्रेसर आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात फळे व भाजीपाला पिकांचे व्यावसायिक पद्धतीने लागवड करुन उत्पादन घेतले जाते. तसेच त्याची निर्यातही मोठ्या प्रमाणात करण्यात येते. भाजीपाला पिकाचे निर्यातक्षम आणि विषमुक्त उत्पादन करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढतो आहे. म्हणूनच भाजीपाला बियाणांच्या चांगल्या जाती आणि चांगली रोपे यांची मागणी वाढत आहे. भाजीपाला पिकांची (Vegetable Farm) दर्जेदार व कीडरोग मुक्त रोपे निर्मिती करुन उत्पन्न व उत्पादनात वाढ करणे तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्नात वाढ करण्याच्यादृष्टीने अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका येाजना शेतकऱ्यांसाठी लाभदायक आहे. कृषी उत्पादनाच्या निर्यातवाढीसाठी नियंत्रित वातावरणामध्ये तयार झालेल्या कीड व रोगमुक्त भाजीपाला रोपांची मागणी वाढत आहे.
अशी होते लाभार्थ्यांची निवड
अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेचा (Ahilya Devi Holkar Nursery Scheme) लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे स्वतःच्या मालकिची किमान 0.40 हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे. रोपवाटिका उभारण्यासाठी पाण्याची कायमची सोय असावी. तसेच लाभार्थी निवडताना महिला कृषी पदवीधारकांना प्रथम प्राधान्य दिले जाते तर महिला गट, महिला शेतकरी द्वितीय आणि भाजीपाला उत्पादक अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी व शेतकरी गट यांना तृतीय प्राधान्यक्रम देण्यात येतो. प्रथम प्राधान्याच्या ज्येष्ठतासूचीतील संपूर्ण अर्जावर कार्यवाही झाल्यानंतरच द्वितीय प्राधन्याच्या ज्येष्ठतासूचीनुसार निवड करण्यात येते. खाजगी रोपवाटिकाधारक, राष्ट्रीय कृषी विकास योजना, एकात्मिक फलोत्पादन अभियान, पोकरा किंवा इतर योजनेमधून संरक्षित शेती (शेडनेट व हरितगृह) घटकाचा लाभ घेतलेले लाभार्थी या योजनेच्या लाभास पात्र राहणार नाहीत.
अनुदान किती मिळते?
टोमॅटो, वांगी, कोबी, फुलकोबी, मिरची, कांदा, इत्यादी व इतर भाजीपाला पिकांसाठी रोपवाटीकेची उभारणी करण्यात येते. रोपवाटिका उभारणीरिता 1000 चौरस मीटरच्या शेडनेट गृह, पॉलिटनेलसह साहित्य खर्चाच्या 50 टक्के 2 लाख 77 हजार 500 रुपयांच्या मर्यादेत अनुदान देण्यात येते. योजना प्रकल्प स्वरुपात राबवायची असल्याने शेडनेट गृह, पॉलिटनेल, प्लास्टिक क्रेट व पॉवर नॅपसॅक स्प्रेअर या चारही घटकांची एकाच ठिकाणी उभारणी करणे बंधनकारक आहे.
उपविभागीय कृषी अधिकारी यांच्यामार्फत प्रकल्प उभारणीनंतर प्रथम मोका तपासणी करुन अनुज्ञेय अनुदानाच्या 60 टक्के अनुदान प्रथम हप्ता शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्यात येतो. रोपवाटीकेतील रोपांची प्रत्यक्ष विक्री, उचल झाल्यावर मंडळ कृषी अधिकारी यांच्यामार्फत द्वितीय मोका तपासणी करून उर्वरित 40 टक्के अनुदान दुसरा हप्ता लाभार्थाच्या आधार संलग्न बँक खात्यावर वितरीत करण्यात येतो.
रोपवाटिका धारकास बियाणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडून परवाना घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. परवान्या अभावी कोणताही लाभार्थी अनुदानापासून वंचित राहणार नाही , याबाबत दक्षता घेण्यात येते. भाजीपाला रोपवाटीकेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांना फलोत्पादन प्रशिक्षण केंद्र, तळेगाव- दाभाडे, कृषी विज्ञान केंद्र, बारामती, नाशिक, जालना, कृषी महाविद्यालय, नागपूर आणि उद्यान महाविद्यालय, अकोला येथे तीन ते पाच दिवसांचे प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे.
असा करा अर्ज
योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर किंवा तालुका कृषी अधिकारी यांचेकडे अर्ज करावेत. अर्ज करताना, 7/12 व 8 अ चे उतारे, आधार कार्डची छायांकित प्रत, आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गाकरिता संवर्ग प्रमाणपत्र अर्जासोबत जोडावे. पात्र अर्जानुसार प्रवर्गनिहाय ज्येष्ठतासूची तयार करुन संबंधित शेतकऱ्यांना सोडत प्रक्रियेबाबत अवगत करण्यात येते.