Nashik Crime : नाशिक (Nashik) शहर, जिल्हा आणि विभागात (Nashik Division) लाचखोरी बोकाळली असून दिवसेंदिवस लाचखोरीच्या (Bribe) घटनांमध्ये वाढ होत आहे. दुसरीकडे सातत्याने कारवाई होत असताना अधिकारी वर्ग लाच घेण्यापासून हात आखडता घेत नसल्याचे चित्र आहे. अशातच सिन्नर (Sinner Taluka) तालुक्यातील कृषी अधिकारी एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. पन्नास हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. 


एकीकडे नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) झोडपून काढले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अनेक भागातिल पंचनामे करण्यासाठी कृषी विभागाला (Agri Department) साकडे घातले जात आहे. मात्र दुसरीकडे कृषी अधिकारीच (Agri Officer) लाच घेताना सापडल्याने खळबळ उडाली आहे. कोणतेही काम असो, सरकारी असो खासगी असो, लाच घेण्यापासून अधिकारी वर्ग कचरत नसल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे. कृषी विभागाकडून अनुदान मिळवून देण्याकरिता उद्योजकाकडे चार लाख रुपयांची लाच मागणी करून त्या मोबदल्यात तडजोडीअंती 50 हजारांची लाच स्वीकारणाऱ्या सिन्नर तालुका कृषी अधिकारी व निफाड (Niphad Taluka) तालुक्याचा अतिरिक्त कारभार असणाऱ्या अण्णासाहेब हेमंत गागरे याला ताब्यात घेण्यात आले. नाशिकरोड येथील प्राइड अपार्टमेंट येथे राहणाऱ्या घोगरे यांना शुक्रवारी रात्री सिन्नर एमआयडीसी परिसरात लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे.


एसीबीने (acb) दिलेल्या माहितीनुसार, सिन्नर एमआयडीसीमध्ये (Sinnar MIDC) एका उद्योजकाने उत्पादित केलेल्या यंत्रे व अवजारांच्या खरेदीवर शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून अनुदान वितरीत करण्यात येत असते. परंतु या उद्योजकाची यंत्रे ही अनुदानास पात्र नसल्याचे लाचखोर गागरे याने भासवले. अनुदान मिळवून देण्याच्या मोबदल्यात या चार लाखांची मागणी केली. तडजोडीअंती अखेर 2 लाख रुपयांची लाच घेण्याचे निश्चित केले. त्यानंतर याप्रकरणी एसीबीकडे तक्रार आली. एसीबीच्या पथकाने सापळा रचला. लाचेचा पहिला हफ्ता 50 हजार रुपये घेताना गागरे हा एसीबीच्या पथकाला सापडला आहे. याप्रकरणी गागरेवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


लाच मागितल्यास तक्रार करा... 


कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये कोणी लाच मागत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधकच्या 1064 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. या संदर्भातील फलक सर्व शासकीय कार्यालयांमध्ये लावणे अपेक्षित असताना पोलीस विभाग वगळता इतर विभागांत हा फलक दिसत नसल्याचे चित्र आहे.  मात्र गेल्या काही दिवसात नाशिक जिल्ह्यातील अनेकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारी केल्या आहेत.