Jalgaon Sanjay Raut : अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची क्षमता असून ते गेली अनेक वर्ष राजकारणात आहे. मंत्री आहे, चार वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेले आहे. जर एखाद्याच्या भाग्यात योग असतील तर त्यांना ते पदही मिळते, मात्र अनेकजण लायकी नसताना तोडफोड करून मुख्यमंत्री होतात, असा कडक शब्दांत खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर निशाणा साधला आहे. 


जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील पाचोरा (Pachora) येथे उद्या उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांची भव्य सभा होत आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत सध्या जळगाव दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील विविध प्रश्नांवर भाष्य केले. यावेळी अजित पवारांनी केलेल्या मुख्यमंत्री पदाच्या वक्तव्यावर राऊत यांनी प्रतिक्रिया देत त्यांनी नाव न घेता मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, मुख्यमंत्री व्हायला कोणाला आवडणार नाही, मुख्यमंत्री होण्याची क्षमता अजित पवार यांच्यात आहे. सर्वाधिक वेळा ते उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम त्यांनी केला आहे. मात्र अनेक जण लायकी नसताना मुख्यमंत्री होतात, तोडफोड करून. जर एखाद्याच्या भाग्यात योग असतील तर त्यांना ते पदही मिळते. अजित पवारांनी (Ajit Pawar) मुख्यमंत्री पदाची अनेकवेळा इच्छा बोलून दाखवली. त्यांना माझ्या शुभेच्छा असल्याचे संजय राऊत म्हणाले. 


संजय राऊत यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या आवाहनाला उत्तर देताना म्हणाले की, जळगावात घुसण्याबाबत आम्हाला आव्हान दिले होते, पण आम्ही आलो. आजही जळगाव सेनेचे आहे. उद्धव ठाकरे यांची उद्याची सभा मोठी होणार असून उद्धव ठाकरे बोलतील काय बोलायचं असेल ते, शिवसेना ही शिवसेना असून कोणी धाडस करून घुसू शकणार नाही. खोटी कागदपत्रे बनवून धनुष्यबाण तुमच्या हातात दिला असला तरी, मूळ शिवसैनिक आहे, तिथेच आहे. ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत नाही. आमदार गेले असतील पण आमदार म्हणजेच शिवसैनिक नाही. आमदार, खासदारावर जर शिवसेना कोणाची आहे. हे निवडणूक आयोगाने ठरवली असेल तर चोवीसमध्ये यांचा पराभव झाल्यानंतर आम्हाला आमची शिवसेना परत देणार का? असा सवाल निवडणूक आयोगाला केला आहे. 


गुलाबी गँग आहे ही....


राऊत पुढे म्हणाले की, संदीप देशपांडे यांनी जिभेवर नसबंदी करावी, अशी मागणी केली आहे. त्यांना म्हणावं त्यांना तुमची राजकीय नसबंदी झाली आहे. आम्ही जे प्रेस मधून बोलतो आहे, आमच्या परखडपणाची त्यांना भीती आहे. हे पाळलेले पोपट असून आमच्या सारखे वाघ नाही. आम्ही संघर्ष करणार, लढणार, गुलाबराव पाटील कोण विसरून जा, गुलाबी गँग आहे ही.... संजय राऊत ही त्यांची पोटदुखी आहे. आर ओ पाटील यांना आजारी असताना आम्ही दवाखान्यात अनेक वेळा गेलो होतो. मातोश्रीवरून उद्धव ठाकरे रोज दवाखान्यात फोन करून चौकशी करत होते. त्यावेळी कोरोनामुळे तारीख देण्यात अडचणी आल्या असतील. मात्र उद्धव ठाकरे पाचोऱ्यात येत आहेत. हीच पोटदुखी आहे, त्यांची, म्हणून ते गरळ ओकत असल्याचे राऊत म्हणाले. 


चांगल्या मिशा अतिक अहमदलाही होत्या.... 


गुलाबराव पाटील यांना सेनेने सर्व काही दिले. ते पळपुटे आहेत, मंत्री केले, सर्व केले. आम्ही का गेलो? यावर त्यांनी बोलायला पाहिजे. ते उत्तर त्यांना जनता पुढे मत पेटीतून देईल. मात्र पाटील यांनी सभेत घुसण्याचा प्रयत्न त्यांनी करावा. या राज्यात कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर आहेत. यांचे मंत्री सतेच्या जोरावर उघडपणे धमक्या देत आहेत. गुंडांच्या सारखे, सत्ता आज हे उद्या नाही. आम्ही तेच शिवसैनिक आहोत, गुलामी पत्करली नाही. डरपोक नाही आणि पळपुटे नाही. यांना लोकांचे प्रश्न सोडवायचे नाही, फक्त भाजपाजी स्क्रिप्ट देईल, त्यानुसार ते वागत आहेत. पन्नास साधक वारले. त्याच प्रायश्चित यांनी घेतले पाहिजे, लोक मरत होते आणि हे मेजवानी करत होते, यांना लाज वाटली पाहिजे, नुसत्या दाढी मिशी असून चालत नाही. त्याला मर्द म्हणत नाहीत, चांगल्या मिशा अतिक अहमद यालाही होत्या,असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.