Nashik News : एकीकडे तीन दिवसांपूर्वी भारतीय रिझर्व बँकेने (RBI) दोन हजार रुपयांच्या नोटा बंद (Note Bann) करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सामान्य नागरिकांसह देशातील प्रत्येकाच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अशातच पेट्रोल पंप चालकांना आतापर्यंत दोन हजार रुपयांचे सुट्टे देण्यास अडचण नव्हती. मात्र या निर्णयानंतर पेट्रोल पंप (Petrol Pump) चालक पुरते वैतागले आहेत. त्यामुळे आता पेट्रोल भरण्यासाठी दोन हजारांची नोट घेऊन येत असाल तर थेट दोन हजार रुपयांचे इंधन घ्यावेच लागेल, असा निर्णय घेण्यात आला आहे. 


भारतीय रिझर्व्ह बँकेने नुकताच दोन हजार रुपयांची न चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र 30 सप्टेंबरपर्यंत या नोटा बँकेत जमा करता येणार आहेत. शिवाय फक्त एका अर्जाद्वारे हे काम होणार आहे. मात्र या सर्वांचा सारासार विचार केला तर आताच्या घडीला सामान्य नागरिकांकडे (Nashik) दोन हजार रुपयांची नोट गेले अनेक महिने दिसेनाशी झाली आहे. त्यामुळे व्यापारी वर्ग उद्योजक, पेट्रोलपंप धारक इत्यादींना नोटांना व्यवहारात आणून किंवा बँकेत जमा कारवाई लागणार आहे. मात्र अशातच पेट्रोल पंप चालकांना वेगळ्याच समस्येला सामोरे जावे लागत आहे. पन्नास-शंभर रुपयांचे इंधन घेण्यासाठी थेट दोन हजार रुपयांची नोट दिली जात असल्याने पंपचालक दोन दिवसातच त्रस्त झाले आहेत. किमान दोन हजार रुपयांचे पेट्रोल किंवा डिझेल घेतले तरच ही नोट स्वीकारण्यात येईल, अशी भूमिका नाशिकमधील नाशिक जिल्हा पेट्रोल डिलर्स वेलफेअर असोसिएशनने घेतली आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची यापूर्वी केलेली नोटबंदी बरीच गाजली होती. राजकीय पटलावर अजूनही या निर्णयावरुन बरीच टीकाटिप्पणी केली जात आहे, अशा स्थितीत आता दोनच दिवसांपूर्वी म्हणजेच शुक्रवारी दोन हजार रुपयांची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही नोट बदलण्यासाठी सप्टेंबरपर्यंत मुदत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून मूळातच दोन हजार रुपयांची नोट चलनात अल्प प्रमाणात आहे. त्या तुलनेत पाचशे रुपयांची नोटच अधिक चालते. त्यामुळे सामान्य नागरिकांकडे अगदी खूप प्रमाणात दोन हजार रुपयांची नोट आहे, अशातला भाग नाही. मात्र, अल्प प्रमाणात असल्या तरी त्या बदलता येतील, आता असलेल्या नोटा बदलण्यासाठी नागरिकदेखील प्रयत्न करत आहेत. 


तरच नोट स्वीकारली जाईल... 


दरम्यान दोन हजार रुपयांची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक वाहन चालक पन्नास शंभर रुपयांचे पेट्रोल भरण्यासाठी पंपावर येतात आणि दोन हजार रुपयांची नोट देऊन जातात. त्यांना दोन हजार रुपयांचे सुटे पैसे दिले जात असले तरी पंप चालकांकडे या नोटा वाढत असल्याने आता त्यांनी दोन हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेचे पेट्रोल खरेदी करायचे असेल तरच, दोन हजार रुपयांची नोट स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन दिवसांपासून दोन हजार रुपयांच्या नोटांची संख्या वाढल्याने हा निर्णय घेतला असल्याचे नाशिक जिल्हा पेट्रोल डिलर्स वेल्फेअर असोसिएशचे भूषण भोसले यांनी सांगितले.