नवी दिल्ली: संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्धाटनाचा मुहूर्त ठरला असून 28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या नव्या इमारतीचं उद्धाटन होणार आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही माहिती दिली आहे. 






कशी असणार आहे संसदेची नवी इमारत?



  • संसदेच्या या नव्या इमारतीला 4 मजले, 6 प्रवेशद्वार असतील

  • लोकसभेचे 1 हजार, तर राज्यसभेचे साधारण 400 खासदार बसू शकतील अशी बैठक व्यवस्था

  • सध्या खासदारांना प्रत्येकाच्या आसनासमोर टेबल नाहीत, नव्या संसदेत प्रत्येकासमोर छोटे बाक

  • या बाकांमध्ये हजेरी नोंदवण्यासाठी, मतदान करण्यासाठी, भाषातंर ऐकण्यासाठी अत्याधुनिक व्यवस्था असेल

  • याशिवाय 120 कार्यालयं, म्युझियम, गॅलरीही या इमारतीत असणार आहे.


काही दिवसांपूर्वीच स्वत: पंतप्रधानांनी या कामाचा आढावा घेतला होता. त्याचवेळी नव्या संसदेचा पहिला लूक समोर आला होता. सध्या या इमारतीच्या बांधकामाचा वेग वाढला आहे. आजूबाजूचे ढिगारे स्वच्छ करण्याचं काम चालू आहे. आता उद्धाटनाची तारीख निश्चित झाली आहे.


नव्या संसदेच्या इमारतीचं कंत्राट टाटा प्रोजेक्ट्सला 2020 मध्ये 861.9 कोटी रुपयांना देण्यात आले होते. त्याची किंमत नंतर वाढवून सुमारे 1,200 कोटी रुपये करण्यात आली. नवीन संसद भवनातील लोकसभेच्या तळाचा आराखडा राष्ट्रीय पक्षी मोर या थीमवर ठेवण्यात आला आहे. नवीन इमारत जुन्या संसद भवनापेक्षा 17,000 चौरस मीटर मोठी आहे.  ही इमारत पूर्णपणे भूकंप प्रतिरोधक आहे, तिचे डिझाइन 'HCP डिझाइन, प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड' ने तयार केले आहे. त्याचे शिल्पकार विमल पटेल आहेत.


एकूण 13 एकरावर नवीन इमारत बांधली गेली आहे. हे राष्ट्रपती भवनापासून हाकेच्या अंतरावर आहे. सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पांतर्गत बांधण्यात आलेल्या चार मजली नवीन संसद भवनात लाउंज, लायब्ररी, कमिटी हॉल, कॅन्टीन आणि पार्किंगची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्वातंत्र्याचं अमृतमहोत्सवी वर्ष सध्या सुरु आहे. त्यामुळे याच वर्षात या इमारतीचं उद्धाटन करण्यात येणार आहे. 


10 डिसेंबर 2020 मध्ये पंतप्रधान मोदींनी संसदेच्या इमारतीचं भूमीपूजन केलं होतं. सुरुवातीला 2022 च्या हिवाळी अधिवेशनापर्यंत इमारत पूर्ण होईल असं सांगितलं जात होतं. पण कोरोनामुळे डेडलाईन थोडी पुढे गेली. आता ही इमारत जवळपास पूर्ण असून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधी ती वापरायला तयार असेल