Nashik Crime : नाशिकच्या अंबड औद्योगिक वसाहतीत (Ambad MIDC) इंडियन बँकेत (Indian Bank) दरोड्याचा प्रकार घडला आहे. दरोडेखोरांनी थेट बँकेतील लॉकर रूमच्या वरचा स्लॅबही फोडला. मात्र, याचवेळी अंबड पोलिस ठाण्याच्या (Ambad Police) गस्ती पथकाच्या वाहनांचा सायरन वाजल्याने चोरांनी पळ काढल्याने बँकेतील दरोड्याचा प्रयत्न फसल्याचे पोलिसांनी सांगितले.


नाशिक (Nashik) शहरातील गुन्हेगारी (Crime) वाढतच असून आता दरोड्याची मोठी घटना पोलिसांच्या समयसूचकतेमुळे टळली आहे. शहरातील अंबड औद्योगिक वसाहतीतील इंडियन बँकेत (Indian Bank Robbery) हा प्रकार घडला आहे. इंडियन बँकेतील अधिकारी व कर्मचारी गुरुवारी सकाळी नियमित वेळेत बँकेत पोहोचल्यानंतर त्यांना ही घटना समजल्यानंतर त्यांनी तत्काळ लॉकर व रोकडच्या तिजोरीची तपासणी केली. मात्र, बँकेतील कोणतीही मौल्यवान वस्तू अथवा रक्कम चोरी झाली नसल्याचे प्रथमदर्शनी अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. मध्यरात्रीच्या सुमारास चोरांनी बँकेत पाठीमागून खिडकीचे ग्रील कापून प्रवेश करत बँकेतील रोकड चोरण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी बँकेतील लॉकर रूमच्या वरचा स्लॅबही फोडला. त्यामुळे या भागातून रात्रीच्या वेळी पोलिसांच्या गस्ती पथकाच्या वाहनाच्या सायरनचा आवाज कानावर पडल्याने चोरांनी बँकेतून पळ काढला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबड औद्योगिक वसाहतीतील महामार्गालगत असलेल्या इंडियन बँक येथे अज्ञात चोरांनी लॉकर असलेल्या स्ट्रॉगरूमवरील स्लॅब मशीनच्या साहाय्याने फोडला. त्यानंतर आतील लॉकरही फोडले. इंडियन बँकेत चोरांनी गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास टाकलेल्या दरोडा हा बँकेची संपूर्ण रेखी करूनच टाकण्यात आल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. या बँकेचे सुरक्षा अलार्म बंद असल्याने मध्यरात्री या बँकेत चोरटे दरोडा टाकण्यासाठी आले असल्याची भणकही सुरक्षा प्रणालीला अथवा व्यवस्थापकाला मिळाली नाही. बँक अधिकारी व कर्मचारी आल्यानंतर नेहमीप्रमाणे सकाळी बँक उघडल्यानंतर बँकेच्या स्ट्आँगरुममध्ये काही कर्मचारी गेल्याने छताला पडलेले भगदाड बघताच बँकेत दरोडा टाकण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले. 


रोकड वाचली.....


दरम्यान बँकेत चोरांनी दरोडा टाकल्याचे समजताच बँकेत एकच धावपळ उडली. मात्र, काही वेळातच बँकेतून कोणतीही चोरी झाली नसल्याचे लक्षात आल्याने अधिकाऱ्यांना दिलासा मिळाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखा पोलिस उपआयुक्त प्रशांत बच्छाव, परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहायक आयुक्त गुन्हे सीताराम कोल्हे, शेखर देशमुख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, मनोहर करंदे, गुन्हे शाखा युनिट दोनचे रणजित नलावडे यांच्यासह गुन्हे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते, त्यांनी फॉरेन्सिक टीम व श्वानपथकाला पाचारण करत बँकेत चोरट्यांचे ठसे व अन्य काही माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला.


इतर महत्वाच्या बातम्या : 


भुयार खोदून बँकेवर दरोडा, पोलिसांनी 10 लाखांचं सोनं परत मिळवलं!