Nashik Trimbakeshwer : काळजाचा ठोका चुकविणारी, मन सुन्न करणारी घटना रायगडच्या इर्शाळवाडीत घडली. दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्री, वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मदतीचा ओघ सुरु झाला. मात्र जो पर्यंत उपाययोजना करण्याची संधी असते, तोपर्यंत उदासीन प्रशासन हालचाल करत नाही. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. त्र्यंबकेश्वरमधील (Trimbakeshwer) सुपलीची मेटचे ग्रामस्थ जीव मुठीत धरून जगत आहेत. स्थलांतरित होण्याची त्यांची तयारी आहे. मात्र लाल फितीच्या  कारभारापुढे गतिमान सरकारचे चाकेही जागचे हलत नसल्याचं चित्र नाशिकमधे आहे.  


ब्रम्हगिरी (Bramhgiri) पर्वताच्या कुशीतील ही आहे, सुपलीची मेट. 60 ते 65 उंबऱ्याच्या या गावात 400 ते 500 नागरिक राहतात. ब्रह्मगिरी पर्वताच्या वरच्या टप्य्यात गाव असल्यानं पर्वताच्या मोठं मोठ्या चिरा नजरेस पडतात. आजवर ज्या पर्वताच्या आश्रयाने नागरिक निर्धास्तपणे राहत होते. आज त्याच पर्वताची भीती वाटते आहे. कधी दरड कोसळेल (Landslide), याचा नेम नसल्यानं ग्रामस्थ जीव मुठीत धरून जगत आहेत. इथेच शाळा आहे. लहान मुले खेळतात बागडतात. मात्र त्यांच्या डोक्यावर केवढे मोठे संकट आहे, त्याचा त्यांना अंदाज नाही. पावसाळ्याच्या दिवसात तर ग्रामस्थ रात्र रात्र जागून काढतात. मागील दोन वर्षापासून ब्रह्मगिरी पर्वत (Bramhgiri Mountain) परिसरात अवैध उत्खनन सर्रास सुरु असल्यानं डोंगराला हादरे बसतात आणि त्यामुळे दरड कोसळण्याच्या घटना वाढत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. 


मागील वर्षी पर्वतावरून मोठा दगड खाली घरंगळत आला. सुदैवाने कोणाच्या घरावर तो गेला नाही, नाहीतर मोठी जीवित हानी झाली असती. त्यानंतरच ग्रामस्थांनी दुसरीकडे पुनर्वसनाची तयारी दाखवली. वनविभागाने 1.82 आर हेक्टर जागा वनविभागाने देऊ केल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे. मात्र  वर्षभरात सरकारी कार्यालयांत खेटा मारून साधी मोजणी सुद्धा प्रशासनाने केली नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. सरकारी विभाग एकमेकांकडे टोलवाटोलवी करत आहेत. माळीण, इर्शाळवाडी (Irshalvadi) प्रमाणे मोठी दुर्घटना घडल्यानंतरच सरकारचे आमच्याकडे लक्ष जाणार का? सरकार दुर्घटनेची वाट बघताय का? दुर्घटना घडल्यानंतर मदत देऊन काय उपयोग, आधी सरकार का लक्ष देत नाही, असे असंख्य प्रश्न स्थानिक नागरीक, महिला उपस्थित करत आहेत.


नागरिकांची भिस्त नशिबाच्या भरवश्यावर 


भीतीच्या सावटाखाली जगणाऱ्या ग्रामस्थांचा संताप अनावर होत असून इथले रहिवासी पोट तिडकीने ते बोलत आहेत. मात्र, उदासीन प्रशासनाला त्याचे सोयरसुतक नाही. मागील वर्षी दरड कोसळल्यानंतर एबीपी माझाने सुपलीची मेटच्या (Suplichi Met) ग्रामस्थांच्या व्यथा मांडल्या होत्या. त्यानंतर स्थानिकांच्या पुनर्वसनाचा मुद्दा चर्चेत आला होता. त्यासाठी जागाही शोधण्यात आली. पावसाळ्या आधी तिथे काही उपाययोजना केली असती तर आतापर्यंत अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला असता, सरकारी काम सहा महिने थांबचा प्रत्यय इथंही आला. दरम्यानच्या काळात अधिकारी बदलून गेलेत. नव्याने आलेल्या अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा  पहिल्यासुन सुरवात करावी लागत आहे. इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर सुपलीची मेट पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नशिबाच्या भरवश्यावर ग्रामस्थ एकेक दिवस अक्षरशः ढकलत आहे. दुर्घटनेनंतर अश्रू ढाळण्यापेक्षा आधीच निर्ढावलेल्या प्रशासनाला पाझर फुटला तर संभाव्य दुर्घटनां टळू शकतील, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या :