Aurangabad Crime News: गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहरातील (Aurangabad City) वाढती गुन्हेगारी चिंतेचा विषय बनला आहे. हत्या, महिला अत्याचार, मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मात्र असे असतानाच आता वाळूज महानगर परिसरात दुचाकीवरुन जाणाऱ्या एका कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीला रस्त्यात अडवून लूटमार करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे धारदार शस्त्राने त्याच्यावर प्राणघातक हल्ला करुन खिशातील 17 हजार रुपये देखील काढून घेण्यात आले आहे. या घटनेने वाळूज परिसरात खळबळ उडाली असून, या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमेश्वर दगडूबा वानखेडे (वय 27 वर्षे, रा. गट नं 6 , श्रीराम नगर वडगाव कोल्हाटी) असे लूटमार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी की, वाळूज औद्योगिक वसाहतीतील मेटल मॅन ऑटो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत परमेश्वर वानखेडे हे लेबर कॉन्ट्रॅक्टर सुपरवायझर म्हणून काम पाहतात. दरम्यान सोमवारी (16 जानेवारी) नेहमीप्रमाणे कंपनीतील काम संपल्यावर ते रात्री सात वाजेच्या सुमरास आपल्या दुचाकीवरून घराकडे निघाले होते. याचवेळी वडगाव कोल्हाटीच्या गट नंबर जवळील खदानीत सात-आठ जणांनी त्यांना अडवले. त्यानंतर त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. एवढंच नाही तर धारदार शस्त्राने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला देखील केला. तसेच त्यांच्या खिशात असलेले 17 हजार रुपये काढून घेतेले. 


मोटारसायकलही पेटवून दिली...


अज्ञात सात-आठ लोकांनी गाडी अडवून मारहाण करताच, परमेश्वर यांनी कसाबसा आपला जीव वाचवत तेथून पळ काढला. तसेच आपल्या मित्रांना फोन करुन घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यामुळे त्यांचे मित्र त्यांच्या मदतील धावून आले. मित्र आल्यावर परमेश्वर पुन्हा घटनास्थळी गेले असता, मारहाण करणाऱ्या अज्ञात व्यक्तींनी त्यांची दुचाकी पेटवून दिली होती. त्यामुळे या आगीत त्यांची मोटारसायकल पूर्णपणे जळून खाक झाली आहे. त्यानंतर परमेश्वर दगडूबा वानखेडे यांच्या तक्रारीवरुन वाळूज एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


औरंगाबाद म्हणावे की बिहार! 


दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद शहर पोलीस दलातील सहायक पोलीस आयुक्त विशाल ढुमे यांच्यावर एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना समोर आली होती. त्यामुळे शहरातील महिलेच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला होता. दरम्यान फक्त महिला सुरक्षेचाच नाही तर इतर गुन्ह्यात देखील औरंगाबाद शहरात वाढ झाली आहे. 2022 वर्षे खुनांच्या, मंगळसूत्र चोरी, मोटारसायकल चोरीच्या घटनांनी गाजला. तर 2023 वर्षाची सुरुवात खुद्द पोलीस अधिकाऱ्याच्या कारनाम्याने झाली आहे. त्यात आता रस्त्यावरुन जाणाऱ्या लोकांची लुटमारीची घटना समोर आली आहे. त्यामुळे या शहराला औरंगाबाद म्हणावे की बिहार असा प्रश्न औरंगाबादकरांना पडला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


धक्कादायक! पाठलाग करणाऱ्या नागरिकांवर मंगळसूत्र चोरट्यांनी रोखली पिस्तुल; औरंगाबादेतील घटना