Nanded News: तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची उद्या नांदेड जिल्ह्यात जाहीर सभा होणार असून, त्यासाठी बीआरएस पक्षाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. मात्र सुरुवातीपासूनच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आलेल्या के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekar Rao) यांच्या याच सभेला आता मनसे (MNS) विरोध केला आहे. नांदेड जिल्ह्याच्या (Nanded District) धर्माबादजवळील बाभळीच्या पाण्याचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही, तोपर्यंत मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नसल्याचा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे. तर के. चंद्रशेखर राव यांची सभा उधळून लावण्याचा इशारा देखील मनसेचे नांदेड जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंग जहागीरदार यांनी दिला आहे.


तेलंगणातील भारत राष्ट्र समिती या पक्षाने आता महाराष्ट्राच्या राजकारणात आपली पाळेमुळे रोवण्यास सुरुवात केली. याचीच सुरुवात म्हणून,  उद्या 5 फेब्रुवारी रोजी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची नांदेडमध्ये जाहीर सभा होणार. बाभळीच्या पाणी प्रश्नावर महाराष्ट्रातील नेत्यांना दोषी ठरवत बीआरएस पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणात श्रीगणेशा करणार असल्याची चर्चा आहे. तर महाराष्ट्रातील सीमा भागांतील मराठी माणसांच्या समस्यांसाठी नांदेड जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांना दोषी ठरवत, या गावातील प्रश्न समोर ठेवून ही सभा होणार आहे. ज्यात धर्माबादजवळील बाभळीच्या पाण्याचा प्रश्न महत्वाचा ठरणार आहे. पण आता याच सभेला मनसेकडून विरोध करण्यात येत आहे. 


अन्यथा सभा होऊ देणार नाही...


दरम्यान, याबाबत बोलताना मनसेचे नांदेड जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंग जहागीरदार म्हणाले की, सीमेवरील गावांमधील मराठी भाषिकांवर अन्याय, बाभळी पाणी प्रश्नापासून ते रेल्वे प्रश्नापर्यंत जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकार अपयशी ठरले असल्याचा ठपका स्थानिक नेत्यांच्या माथी ठेवून बीआरएस महाराष्ट्राच्या राजकारणात उतरत आहे. बीआरएस पक्षाच्यावतीने जनतेचे हे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देऊन, राज्यात आपला जम बसवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र जोपर्यंत नांदेड जिल्ह्याच्या धर्माबादजवळील बाभळीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार नाही, तोपर्यंत बीआरएस आणि त्यांचे मुख्यमंत्री केसीआर यांना नांदेड जिल्ह्यात पाय ठेवू देणार नसल्याचा इशारा मनसेचे नांदेड जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंग जहागीरदार यांनी दिला आहे. बाभळीच्या पाण्याचा प्रश्न आजच्या आज सुटला नाही, तर उद्या त्यांची सभा होऊ देणार नसल्याचा इशारा देखील यावेळी मनसेने दिला आहे. 


सभेसाठी जोरदार तयारी... 


भारत राष्ट्र समिती या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पक्ष विस्तारासाठी महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केले असून, उद्या नांदेडमध्ये जाहीर सभा घेणार आहे. त्यांच्या याच सभेच्या दृष्टीने भारत राष्ट्र समिती या पक्षाचे महत्वाचे नेते नांदेडमध्ये तळ ठोकून आहे. तर चंद्रशेखर राव यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी देखील सभास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. त्यामुळे महराष्ट्रात आपली ताकद वाढवण्यासाठी भारत राष्ट्र समितीकडून जोरदार प्रयत्न केले जात आहे. विशेष सीमा भागातील गावांवर त्यांचे सर्वाधिक लक्ष असणार आहे. 


महत्वाच्या इतर बातम्या : 


धक्कादायक! जिल्हा परिषदेच्या शाळेत आसाराम बापूच्या प्रचाराचे धडे; शिक्षण विभागात खळबळ