Dasara Melava: मुंबईत होत असलेल्या शिंदे गटाच्या आणि उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याला सुरवात झाली आहे. तर दोन्ही गटातील नेत्यांची भाषणांना सुरवात झाली आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे भाषण सुरु असतानाच त्यांनी पोलिसांबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. पोलीस खरोखरच चांगले आहेत, मात्र या पोलिसांमध्ये काही हरामखोरांची अवलाद पैदा होत असते असे वक्तव्य अंबादास दानवे यांनी केले आहे. त्यामुळे त्यांच्या या विधानामुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. 


शिवाजीपार्कवरील दसरा मेळाव्यात भाषण करतांना अंबादास दानवे म्हणाले की, कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची ज्यांची जबाबदारी आहे, तेच लोकं महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था बिघडवत आहे. एक आमदार म्हणतो कुणाचेही हातपाय तोड मी टेबल जामीन देतो. आत्ताच देशमुख भाषणात म्हणाले की खरोखर पोलीस चांगले आहेत. मात्र या पोलिसांमध्ये काही हरामखोराची औलाद पैदा होत असते. एक नवी मुंबईचा डीसीपी आपल्या शिवसेनेच्या नगरसेवकाला, 'तू जर शिंदे गटात आला नाही तर तुझा इन्काऊंटर करेल अशी धमकी देतो'. सत्ता आज तुमची आहे, उद्या आमची सुद्धा येईल. त्यामुळे आमचं असं वागणं तुम्हाला चालेल का असा माझा पोलिसांना इशारा असल्याचं दानवे म्हणाले. 


नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता...


अंबादास दानवे यांनी केलेल्या विधानावरून नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. कारण दोन्ही पक्षाच्या मेळाव्यासाठी गेल्या आठवड्याभरापासून जे पोलीस तयारी करत आहे. तसेच गेल्या 24 तासांपासून खडा पहारा देत मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था सांभाळत आहे, त्यांच्याबद्दल दानवे यांनी केलेल्या विधानावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.