ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकाच्या पुलावर फेरीवाल्यांकडून महिलेला मारहाण करण्यात आलीय. वर्षा पाटील (वय 52) असे मारहाण झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. रविवारी सायंकाळी ठाणे रेल्वे स्थानकावर ही घटना घडली आहे. पोलिसांनी मध्यस्थी करून महिलेला टोळक्याच्या तावडीतून सोडवले. 


ठाणे रेल्वे स्थानकाच्या पुलावर काही फेरीवाले बसतात. त्यामुळे तेथून येणारे-जाणारे प्रवाशी आणि खरेदीसाठी आलेले लोक यामुळे रेल्वे स्थानकावर गर्दी होते. या गर्दीमुळे प्रवाशांना येता-जाता अडचण होते.  यातील एका फेरीवाल्याच्या बाकड्याला वर्षा पाटील यांचा धक्का लागला त्यामुळे फेरीवाल्यांच्या टोळीने पाटील यांना बेदम मारहाण केली. पाटील यांच्यावर चार ते पाच जणांच्या टोळक्याने हल्ला केला. त्यामुळे त्यांना आपली सुटका करून घेत आली नाही. परंतु, मदतीसाठी त्यांनी आरडा ओरडा केल्यानंतर रेल्वे स्थानकावरील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाटील यांना टोळक्याच्या तावडीतून सोडवले. पाटील यांनी याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे.


वर्षा पाटील या रविवारी सायंकाळी दादरहून ठाण्यात परतत होत्या. त्या प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवरून जुन्या रेल्वे पुलावर येत असताना प्लॅटफॉर्म क्र. 7 ते 8 वरील पुलावर एका फेरीवाल्याच्या बाकड्याला धक्का लागला. त्यावेळी त्यांनी फेरीवाल्याला बाकडे बाजूला करण्यास सांगितले. मात्र, त्याने अरेरावी सुरू केली. त्यामुळे वर्षा पाटील यांनी रेल्वे पोलिसांना फोन करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांना संबंधित फेरीवाल्याकडून शिविगाळ करण्यात आली. घटनास्थळावरील आवाज ऐकून संबंधित फेरीवाऱ्याचा साथीदार बाळू डोकरे तेथे आला. त्यानंतर डोकरे आणि त्याच्या चार ते पाच साथीदारांनी वर्षा यांना शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली. 


पाटील यांना फेरीवाल्यांच्या टोळक्याकडून मारहाण करण्यात येत असताना रेल्वे स्थानकावरील एकही प्रवासी त्यांच्या मदतीला धावून आला नाही. त्यावेळी कोपरीतील एका रहिवाशाने स्थानिक महिला असल्याचे सांगून फेरीवाल्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु, फेरीवाल्यांनी मारहाण सुरूच ठेवली. अखेर काही वेळानंतर रेल्वे पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पाटील यांनी फेरीवाल्यांच्या टोळक्यातून सुटका केली. पोलिस येत असल्याचे समजताच बाळू डोकरे याने इतर सहकाऱ्यांना इशारा केला. त्यामुळे सगळेजण घटनास्थळावरून पळून गेले. या प्रकारानंतर पोलिसांनी बाळू डोकरे आणि मारहाणीत सहभागी नसलेल्या एका वृद्ध फेरीवाल्याला अटक केली. या प्रकारात वर्षा पाटील यांचे 75 हजार रूपयांचे मंगळसूत्रही चोरीला गेल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली आहे. 


 दरम्यान, या हल्याची पोलिसांनी दखल घेतलनी नसल्याचा आरोप वर्षा पाटील यांनी केलाय. "माझ्यावर झालेला हल्ला दडपण्याचा प्रयत्न रेल्वे पोलिसांकडून केला जात आहे. या प्रकारनांतर केवळ दोघा जणांवर गुन्हा दाखल केला. पलंतु, त्यातील एक फेरीवाला निर्दोष आहे. तर मारहाण करणारे आणखी चार जण फरार आहेत. मुख्य आरोपी बाळू डोकरे याची पार्श्वभूमी गुन्हेगारी आहे. त्याला पोलिसांकडून पाठीशी घातले जात आहे, असा आरोप करीत वर्षा पाटील यांनी केला असून घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तपासून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पाटील यांनी पोलिसांकडे केली आहे.