सांगली :  मिरज तालुक्यातील  लक्ष्मीवाडी  येथील  आरती अभिनंदन तळदंगे (वय 26) या विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्त्या केली. गुरुवारी रात्री ही घटना उघडकीस आली. या घटनेनंतर आरतीच्या संतप्त नातेवाईकांनी तिच्या सासरी घरासमोरच तिच्यावर अंत्यसंस्कार केले. याबाबत आरतीचा भाऊ सागर मुरगुंडे यांनी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पती अभिनंदन बाळू तळदंगे (वय 33), सासरे बाळू आप्पासो तळदंगे (वय 55), सासू भारताबाई बाळू तळदंगे (वय 50, तिघे रा. लक्ष्मीवाडी), नणंद अश्विनी राहुल भोरे  (रा. नांद्रे) या चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.


आरती व अभिनंदन यांचा विवाह 2012 मध्ये झाला होता. संशयितांकडून वारंवार आरती यांना माहेरीकरुन पैसे आणण्याचा तगादा लावला जात होता. मागणी पूर्ण होत नसल्याने आरती यांचा शारीरिक व मानसिक छळ सुरू होता. यातून आरतीने आत्महत्या केल्याचे त्यांचा भाऊ सागर मुरगुंडे यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे. आरतीला दोन मुले आणि एक मुलगी आहे. आरतीच्या भावाने शेत विकल्याने त्यातील दोन लाख रुपये घेऊन ये असा तगादा नवरा अभिनंदन आणि सासू भारताबाई हे करत होते.


 याबाबत पोलिसांनी घटनास्थळावर भेट देऊन पंचनामा केला. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यात आला. आरतीच्या माहेरच्या संतप्त नातेवाईकांनी मयत आरतीचे अंत्यसंस्कार सासरच्या नव्या बांधलेल्या घरासमोर केले. यावेळी घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सदर घटनेची मिरज ग्रामीण पोलिसात नोंद झाली असून याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत.


संबंधित बातम्या :