Maharashtra News LIVE Updates : जरांगेंचं नाटक मराठा समाजालाही कळलं, मंत्री भुजबळांची जरांगे पाटलांवर टीका

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 03 Mar 2024 02:56 PM
Nalegaon Dead Leopard : विहिरीत मृत अवस्थेत आढळला बिबटया

Ahmednagar News : अहमदनगरच्या नालेगाव परिसरातील गायके मळा येथे पांडुरंग पाठक यांच्या विहिरीत बिबट्या मृत अवस्थेत सापडला आहे. विहिरीत बिबट्या पडलेला असल्याची माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन या बिबट्याला बाहेर काढले. मृत बिबट हा नर असून साधारण पाच ते सहा वर्षाचा असावा असा अंदाज पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.  अहमदनगर शहराच्या जवळील केडगाव येथील अंबिका नगर भागात भरवस्तीत गेल्या आठ दिवसापूर्वी वन विभागाने एक बिबट्या जेरबंद केला होता. शहराच्या मध्यवर्ती भागातच बिबट्यांचा संचार वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Dombivali News : वातानुकूलित मच्छी मार्केटचे आज भूमिपूजन

Dombivali News : डोंबिवली पश्चिमेकडील मच्छी मार्केटची अत्यंत दुरावस्था झाली होती. व्यवसाय करताना मच्छी विक्रेत्यांना येणाऱ्या ग्राहकांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. गेल्या अनेक वर्षापासून मच्छी मार्केट उभारण्याचे मागणी स्थानिक कोळी बांधवांकडून केली जात होती. युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी  खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून मच्छी मार्केट उभारण्याचा पाठपुरावा करत होते. आज या अद्यावत मच्छी मार्केटच्याकामाचा भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हस्ते  होणार आहे.

Supriya Sule : सुप्रिया सुळेनी बॅडमिंटन खेळाचा आनंद लुटला




Baramati News : खासदार सुप्रिया सुळे आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. बारामती येथील देसाई इस्टेट क्रीडा संकुल येथे सुरू असलेल्या खुल्या बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेला आज खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली. काही खेळाडूंसोबत त्यांनी यावेळी बॅडमिंटन खेळाचा आनंद लुटला.

 

 



 


Bhandara News :काँग्रेस निवडणूक प्रभारी भंडाऱ्यात, कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याशी चर्चा

Bhandara News : आगामी लोकसभा निवडणुक तोंडावर आली असल्यानं काँग्रेस पक्षानं उमेदवाराबाबत सावध पवित्रा घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी भंडाऱ्यात भाजपच्या निवडणूक निरीक्षक चित्रा वाघ आणि आमदार प्रवीण दटके हे आले होते. त्यानंतर आज भंडारा - गोंदिया लोकसभा क्षेत्राचे काँग्रेसचे निवडणूक प्रभारी सतीश चतुर्वेदी हे भंडाऱ्यात दाखल झालेत. यावेळी ते आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील. या आढावा बैठकीचा अहवाल प्रदेश काँग्रेस कमिटीकडं सोपविण्यात येणार आहे.

CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात 'शासन आपल्या दारी'

Dombivali News : आज मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात शासन आपल्या दारी कार्यक्रम होत आहे,. या कार्यक्रमासाठी 20 हजार पेक्षा जास्त लोकांची आसनव्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येकाला 1 लिटर पाण्याची बॉटल, ओ आर एस चे पाकीट, अल्पोपहार देण्यात आला आहे, उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून मोठे पंखे आणि छत लावण्यात आले आहे. सहा महानगरपालिका, आणि ग्रामीण ठाण्याचा मिळून मोठा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला आहे.

Jalgaon Rasta Roko : जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई
Jalgaon News : यंदा पाऊस कमी झाल्याने जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव तालुक्यात काही गावात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई जाणवत आहे. सर्व सामान्य जनतेला पिण्याच्या पाण्याचा तर, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा ही प्रश्न गंभीर झाला आहे. यामुळे या परिसरात असलेला पाणी प्रश्न सोडविण्यासाठी शासनाने त्वरित उपाययोजना करण्यात याव्या, या मागणीसाठी चिंच गव्हाण, कळवडी,धामणगाव, खेडगाव परिसरातील शेतकऱ्यांनी चाळीस गाव, मालेगाव रस्त्यावर गिरणा धरण फाट्यावर रस्ता रोको आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
Washim News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या वाशिम जिल्हा दौऱ्यावर

Washim News : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या वाशिम जिल्हा दौऱ्यावर येणार असून वाशिम शहरात उभारल्या जाणारा शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण करण्यात येणार आहे. वाशिमच्या जिल्हा क्रीडा संकुल महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महिला मेळाव्याला एकनाथ शिंदे संबोधित करणार आहेत. या महिला मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे.

Nashik Leopard CCTV :
Nashik Leopard CCTV : नाशिकच्या जय भवानी रोड परिसरात पुन्हा एकदा बिबट्याने दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. मध्यरात्री पावणे तीन वाजेच्या सुमारास लोणकर मळ्यात भक्ष्याच्या शोधात एक बिबट्या आला असता भटक्या कुत्र्यांनी भूंकण्यास सुरुवात केली आणि अखेर बिबट्याने इथून पळ काढला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे, वनविभागाने बिबट्याचा शोध घेऊन त्याचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिकांकडून केली जाते आहे. 
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांचं धाराशिव जिल्ह्यात आगमन

Manoj Jarange Patil : धाराशिव जिल्ह्यातील भुम येथे मनोज जरांगे पाटील यांचं आगमन


भुम येथे मराठा बांधवाच्या विवाह सोहळ्याला मनोज जरांगे पाटील यांनी लावली उपस्थिती


भुम तालुक्यातील देवळाली येथील तांबे कुटुंबीयांच्या विवाह सोहळ्याला लावली उपस्थिती


जरांगे पाटील याचं तांबे कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आले स्वागत


मराठा आरक्षणाच्या लढ्यात आपल्या लेकरा बाळासाठी आपण ही सहभागी व्हा: जरांगे याचं लग्नासाठी आलेल्या समाज बांधवांना आवाहन 


थोड्याच वेळात भुम येथील चौंडेश्वरी नाट्यगृहात संवाद बैठकीसाठी जरांगे पाटील होणार रवाना

BJP Yuva Sammelan : भारतीय जनता युवा मोर्चा चा "नमो युवा राष्ट्रीय संमेलन

BJP Yuva Sammelan : नागपुरात 4 मार्च रोजी भारतीय जनता युवा मोर्चाचं "नमो युवा राष्ट्रीय संमेलन" होत असून या संमेलनात तब्बल एक लाख तरुण सहभागी होतील असा भाजयूमोचा दावा आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या अध्यक्षतेत हे संमेलन होणार असून लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील तरुणांपर्यंत पोहोचण्याचा हा भाजपचा मोठा प्रयत्न आहे. विशेष म्हणजे या संमेलनात येणाऱ्या तरुणांना गेल्या दहा वर्षात मोदी सरकारने केलेली काम सांगितली जाणारच आहे. शिवाय पुढील पाच वर्षात मोदी सरकारकडून विकसित भारत या संकल्पनेसाठी त्यांच्या काय अपेक्षा आहेत, या संदर्भात सूचनाही घेतल्या जाणार आहेत. या संमेलनाच्या माध्यमातून तरुणांनी दिलेल्या सूचनांचा भाजपच्या जाहीरनाम्यात समावेश करण्याचा भाजपचा नियोजन आहे. नमो युवा संमेलन यशस्वी करण्यासाठी भाजयुमो ने पूर्ण शक्ती पणाला लावली असून सध्या नागपूर विद्यापीठाच्या पटांगणात संमेलनाची मोठी तयारी सुरू आहे.

Hemant Patil meet Devendra Fadnavis : माझी तिकीट जर कापली तरी, मोठी संधी मिळू शकते : हेमंत पाटील

Hemant Patil : शिवसेना हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. हेमंत पाटील यांनी सांगितलं की, माझ्या जिल्ह्यात अनेक जलसंपदाची कामे आहेत त्यांची उद्घाटन करायचं आहे, त्यामुळे त्याची वेळ मागण्याकरिता मी आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी आलो होतो. माझ्या मतदार संघावर भाजपकडून दावा केला जात आहे. पण, आम्ही शिवसेना म्हणून आमची जागा आम्ही लढवणार आहोत. पण माझी तिकीट जर कापली गेली तर, त्याहुन मोठी संधी मला मिळू शकते. पण आम्ही शिवसेना म्हणून 18 लोकसभेच्या जागा नक्की लढू. भाजप आम्हाला संपवत नाही आहे, असं हेमंत पाटील यांनी म्हटलं आहे.



Dombivli News : डोंबिवलीत 'शासन आपल्या दारी' कार्यक्रम

Dombivli News : 'शासन आपल्या दारी' हा महाराष्ट्र सरकारचा महत्वकांक्षी कार्यक्रम आज मुख्यमंत्री यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच ठाणे जिल्ह्यात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात संपूर्ण जिल्ह्यातून लाभार्थी आणि कार्यकर्ते येण्याची शक्यता असल्याने मोठी गर्दी होण्याची शक्यता सांगितली जात आहे. दुपारी 2 वाजता कार्यक्रम असल्याने येणाऱ्या प्रत्येकाच्या आरोग्याची जबाबदारी शासनाने घेतली आहे. ज्या ठिकाणी कार्यक्रम आहे त्याला लागूनच 2 तात्पुरते हॉस्पिटल उभारण्यात आले आहेत. एका आय सी यू हॉस्पिटलमध्ये 20 बेड आहेत, व्हेंटिलेटर सहित सर्व व्यवस्था तिथे आहे. तर, दुसरे सामान्य हॉस्पिटल आहे. तिथे 70 बेड आहेत, इथे उष्माघात, भुरळ येणे, पाण्याची कमतरता, पोट दुःखी, डोके दुखी, ई एन टी आजार यांवर उपचार होतील.

Chandrapur Crime : निर्दयी पतीने केली पत्नी आणि दोन मुलींची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या

चंद्रपूर : निर्दयी पतीने पत्नी आणि दोन मुलींची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागभिड तालुक्यातील मौशी गावातील घटना आहे. अंबादास तलमले (50) असं आरोपीचं नाव असून अल्का (पत्नी, वय 40), प्रणाली (मोठी मुलगी/वय 19) आणि तेजू (लहान मुलगी/ वय 17) अशी मृतकांची नावं आहेत. पती-पत्नीत कडाक्याचं भांडण झालं. त्यानंतर सर्व झोपले असताना आरोपीने तिघींवर कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. घरगुती वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक संशय आहे. आरोपीला नागभीड पोलिसांनी अटक केली असून घटनेचा तपास सुरू आहे.

Amravati News : अयोध्येला विशेष रेल्वे रवाना, युवा स्वाभिमान पार्टीकडून विशेष रेल्वेचं नियोजन

अमरावती : प्रभू श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे जाणारी रामलल्ला दर्शन आस्था विशेष रेल्वे रवाना झाली. आस्था विशेष रेल्वे राणा दाम्पत्य यांच्या युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने आज रविवारी, सकाळी ठीक 8 वाजता मॉडेल रेल्वे स्थानक अमरावती येथून सुटली. यावेळी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी विशेष रेल्वेला झेंडा दाखवून रवाना केली. यावेळी राणा दाम्पत्यांनी सर्व श्रीराम भक्तांना प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या.

Madha Ranjit Singh Naik-Nimbalkar News : माढा भाजप खासदार निंबाळकर यांच्या गाडीसमोर संतप्त मतदारांनी टाकली गाजरे

Solapur News : माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे शनिवारी माढा तालुक्याच्या दौऱ्यावर होते. रांझणि आलेगाव गारअकोले टाकळी आढेगाव या रस्त्याच्या भुमिपूजन प्रसंगी ते माढ्याचे आमदार बबनराव शिंदे सोबत रांझणीच्या मार्गावर असतानाच त्यांच्या वाहनापुढे संतप्त ग्रामस्थांनी गाजरे टाकून निषेध व्यक्त केला. याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमात व्हायरल होऊ लागल्याने भाजप समोरील अडचणी वाढणार आहेत. यात काही भाजपाच्या कार्यकर्त्यांचा समावेश असल्याची चर्चा आहे. एकाबाजूला देशातील टॉप 10 खासदारांमध्ये निंबाळकर असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष करीत असताना खुद्द माढा तालुक्यात निंबाळकर यांना सुरू झालेल्या विरोधामुळे भाजप अडचणीत येणार आहे. सध्या माढा लोकसभेसाठी निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यात उमेदवारीसाठी काट्याची टक्कर असताना हा प्रकार निंबाळकर यांच्या अडचणी वाढवणारा आहे. दरम्यान, या प्रकाराबाबत निंबाळकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकलेला नाही.

Buldhana Accident News : दुचाकी आणि कंटेनरच्या समोरासमोर धडकेत दोन युवक ठार

बुलढाणा : दुचाकी आणि कंटेनरच्या समोरासमोर धडकेत दोन युवक ठार


नागपूर पुणे मुंबई महामार्गावर मेहकर जवळ भीषण अपघात


रामेश्वर कांबळे आणि पंडित भरसाखले असं मृतांचं नाव


अपघातानंतर कंटेनर चालक अपघात स्थळावरून फरार

Bhiwandi News : भिवंडी मतदार संघांचे संभाव्य उमेदवार काँग्रेस नेते दयानंद चोरगे संतप्त

Lok Sabha Election 2024 : भिवंडी मतदार संघांचे संभाव्य उमेदवार काँग्रेस नेते दयानंद चोरगे यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाला मिळावा यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. दयानंद चोरगे यांनी सांगितले की, दिल्लीत मी कोणाचीही तक्रार करण्याकरिता आलो नाही. राज्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आमचे मार्गदर्शक असून नाना पटोले यांची तक्रार करण्याकरिता मी बिलकुल आलो नव्हतो. ज्यांनी खोडसाळ बातमी दिल्याने दयानंद चोरगे संतप्त झाले. त्यांनी ही वृत्त देणाऱ्या विरोधात नोटीस देणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

Chandrapue News : दोन विद्यार्थ्यांचा नाल्यातील पाण्यात बुडुन मृत्यू

चंद्रपूर : राजुरा तालुक्यातील सास्ती येथे दोन विद्यार्थ्यांचा नाल्यातील पाण्यात बुडुन मृत्यू झाला आहे. स्थानिकांनी आर्थिक मदतीची मागणी केली आहे. ही मुलेसकाळी शाळा सुटल्यानंतर पोहायला गेली होती, या दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे. पियुष राकेश सिडाम (17) आणि साहिल रमेश कुंदलवार (15) अशी मृतांची नावे आहेत. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या इनटेक विहीरीजवळ नाल्याचे बाजुला वेकोलिच्या चड्डा या कंत्राटी कंपनीने माती टाकल्याने पाणी जमा होऊन तलाव तयार झालाय. या तलाव सदृश्य पाण्यात हे दोन विद्यार्थी पोहायला गेल्यावर पाण्याचा आणि तेथील मातीच्या गाळाचा अंदाज न आल्याने ते फसले आणि त्यातच त्या दोन्ही मित्रांचा दुर्देवी मृत्यू झाला. कंपनीने नाला रोखून अनाठायी तलाव निर्माण केला, त्यामुळे कंपनीने तातडीने आर्थीक सहायता द्यावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.