Airline Plane caught fire : बोईंग विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानंतर विमान विमानतळावर उतरवण्यात आले. विमान सुखरूप उतरले. मात्र C-38 गेटवर उभे राहिल्यानंतर इंजिनमधून धूर निघू लागला, त्यामुळे प्रवाशांना तातडीने बाहेर काढण्यात आले. यावेळी अनेक प्रवासी थेट विमानाच्या पंख्यावर जाऊन उभा राहिले. या विमानातून 172 प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने जिवितहानी झाली नाही. अमेरिकन एअरलाइन्स फ्लाइट 1006 च्या इंजिनला गुरुवारी संध्याकाळी अमेरिकेच्या डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आग लागली. हे विमान डॅलस फोर्ट वर्थ आंतरराष्ट्रीय विमानतळावर जायचे होते, परंतु इंजिनातील बिघाडामुळे ते डेन्व्हरला वळवण्यात आले होते.
विमानात 172 प्रवासी आणि सहा क्रू मेंबर्स
विमानतळ अधिकारी आणि अमेरिकन एअरलाइन्सच्या निवेदनानुसार, विमान उतरल्यानंतर धूर येऊ लागला. घटनेच्या वेळी विमानात 172 प्रवासी आणि सहा क्रू मेंबर्स होते. सर्वांना तातडीने फ्लाइटमधून सुखरूप बाहेर काढून टर्मिनलवर नेण्यात आले. अमेरिकन एअरलाइन्सने म्हटले आहे की, "आम्ही आमचे क्रू मेंबर्स, डेन्व्हर इंटरनॅशनल एअरपोर्ट टीम आणि रेस्क्यू टीमचे आभार मानतो, ज्याने या घटनेत सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्सची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी वेळेवर कारवाई केली."
विमान तांत्रिक समस्या
फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन (एफएए) नुसार, अमेरिकन एअरलाइन्सचे फ्लाइट 1006 कोलोरॅडो स्प्रिंग्स ते डॅलस फोर्ट वर्थ आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाणार होते, परंतु इंजिनमध्ये तांत्रिक समस्येमुळे ते डेन्व्हर विमानतळाकडे वळवावे लागले.
काय म्हणाले प्रवाशांनी?
सीबीएस न्यूजने प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रांमध्ये काही प्रवासी विमानाच्या पंखावर उभे असल्याचे दिसले, तर उड्डाणाच्या आजूबाजूला धूर पसरला होता. मात्र, कोणत्याही प्रवाशाला किंवा क्रू सदस्याला कोणतीही हानी झाली नाही. विमानतळ प्रशासनाने तातडीने आगीवर नियंत्रण मिळवून परिस्थिती नियंत्रणात आणली.