Maharashtra LIVE Updates : कोल्हापूरमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा, कोणावर टीकेची तोफ डागणार?

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये..

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 27 Apr 2024 03:35 PM
नैनितालच्या जंगलात भीषण वणवा

नैनिताल जंगलातील भीषण वणवा नियंत्रणात. लष्कराच्या हवाई दलाच्या MI-17 हेलिकॉप्टरमधून पाण्याचा मारा. नैनिताल हायकोर्ट कॉलनीपर्यंत आगीची धग. उत्तराखंडमधील नैनितालच्या जंगलात लागली होती आग. अनेक नागरिकांना दिला होता इशारा . तब्बल चौथ्या दिवशी आगीवर थोडं नियंत्रण मिळवण्यात यश

बीड जिल्ह्यात अवकाळी पावसाचे संकट

बीड जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. परिणामी शेतकऱ्यांना या पावसाचा सामना करावा लागतोय. आधीच अडचणीत असणारे शेतकरी आता अवकाळीच्या संकटाला सामोरे जात आहेत. आष्टी तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने फळबागेसह पशुधन मृत्युमुखी पडले आहेत. सांगवी पाटण या ठिकाणी शेख दगडू यांच्या पोल्ट्री फार्ममधील 500 कोंबड्या मरण पावल्या आहेत. प्रशासनाने या नुकसानग्रस्त परिस्थितीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी केली जात आहे.

मतदान न करणाऱ्यांविरोधात नागपूरमध्ये बॅनरबाजी

नागपूर लोकसभा मतदार संघात 10 लाख 15 हजार 937 मतदारांनी मतदान केले नाही. त्यामुळे त्यांच्या निषेधाचे होर्डिंग सध्या नागपूर शहरात लागले आहेत. नागपूरच्या ट्राफिक पार्क चौकात लागलेल्या या होर्डिंग वर 'शेम ऑन यु' असा उल्लेख करण्यात आला. नागपूर लोकसभा मतदार संघात एकूण 22,23,281 मतदार आहे. त्यापैकी प्रत्यक्षात 12,07,344 मतदान केले. त्यामुळे नागपूर हे निषेधाचे होर्डिंग झळकत आहेत.

वाशिममध्ये बिबट्या विहिरीत पडला

वाशिमच्या मानोरा तालुक्यातील भुली शेतशिवारात एका विहिरीत बिबट्या पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अन्न पाण्याच्या शोधत हा बिबट्या पडल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. सकाळपासून विहिरीत पडलेल्या बिबट्याला काढण्यासाठी वनविभागाच्या रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहचली आहे.विहीर परिसरात माकडाचा पाठलाग करतांना  बिबट्या विहिरीत पडल्याचा अंदाज याठिकाणी व्यक्त केला जात आहे. त्याच विहिरीत माकडं मृत अवस्थेत पडल्याचं आढळून आले आहे.

समृद्धी महामार्गामुळे राज्य सरकारच्या तिजोरीत विक्रमी महसूल

नागपूर ते मुंबई या दोन शहरांमधील अंतर कमी करणाऱ्या समृद्धी महामार्गाने वेगवान वाहतुकीचे नवे विक्रम स्थापित केले आहेत. उद्घाटनानंतर गेल्या १६ महिन्यांत या महामार्गावरून ८२ लाख वाहनांनी प्रवास केला असून दरमहा ६ लाख ७६ हजार वाहने (दररोज सरासरी २० ते २५ हजार) या महामार्गावरून धावत आहेत. त्यातून या प्रकल्पाची कार्यान्वयन यंत्रणा असलेल्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) तिजोरीत ६३१ कोटींचा महसूल जमा झाला आहे. नागपूर-मुंबई या ७०१ किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाचा सद्या ६२५ किमी लांबीचा मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते डिसेंबर, २०२२ मध्ये नागपूर ते शिर्डी या ५२० किमीच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले होते. त्यानंतर गेल्या वर्षी इगतपुरीपर्यंतचा प्रवास सुरू झाला. नागपूर - मुंबई महामार्ग नागरिकांच्या सेवेत दाखल झाल्यास यात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे

तानाजी सावंतांना ओमराजे निंबाळकर यांनी दिला थेट इशारा

ठाकरे गटाचे उस्मानाबाद लोकसभेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा जोरदार समाचार घेतलाय. 
मी ४० वर्षे मंत्री राहिलेल्या डॉ.पद्मसिंह पाटील आणि राणा पाटलांना गार करून आलोय, 'तू किस झाड की पत्ती है', अशा शब्दांत ओमराजे निंबाळकर यांनी सावंत यांचे नाव न घेता सावंतांना इशारा दिलाय. 

क्रिकेट सट्टेबाजांवर कारवाई

नागपूरच्या  पन्नासे ले-आऊटमध्ये चालणाऱ्या यवतमाळच्या क्रिकेट बेटिंग अड्ड्यावर छापा टाकून नागपूर गुन्हे शाखेने तीन बुकींना अटक केली आहे. दहा महिन्यांपासून सुरू असलेल्या या अड्ड्यावरून कार, लॅपटॉप, मोबाइलसह ३५ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या घरफोडी विरोधी पथकाने ही कारवाई केली.


सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पन्नासे ले आऊट येथील पर्ण अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक ३०१ मध्ये सट्टेबाजीचा अड्डा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी गुरुवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास धाड टाकली असता तेथे हरिओम उमेश बत्रा , रवी नंदकिशोर बोरेले आणि अयफाज शेख कादीर हे आढळले. रॉयल चॅलेंजर बंगळुरू व सनरायझर्स हैदराबाद यांच्यादरम्यान सुरू असलेल्या सामन्यावर ते लगवाडी-खायवाडी करत होते. त्यांच्या ताब्यातून एलसीडी टीव्ही, रेकॉर्डर, लॅपटॉप, २३ मोबाईल फोन, दोन कार व एक दुचाकी असा ३५.६१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तीनही आरोपींविरोधात सोनेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना तेथील पथकाच्या हवाली करण्यात आले आहे

रानटी हत्तीच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू
गडचिरोली: महिनाभरापूर्वी कळपातून भरकटलेल्या या हत्तीने तेलंगणा राज्यात दोन शेतकऱ्यांना ठार करून तीन दिवसांपूर्वी भामरागड तालुक्यात प्रवेश केला.  भामरागड तालुक्यातील हिदूर येथील एका महिलेचा रानटी हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. २५ एप्रिल रोजी कियर येथील एका शेतकऱ्यास दुपारी ठार केल्यानंतर काल रात्री त्याच रानटी हत्तीने हिदूर गावात धुडगूस घालून तीन महिलांना गंभीर जखमी केले. त्यापैकी राजे कोपा हलामी (५०) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर महारी देवू वड्डे (५०) आणि वंजे जुरू पुंगाटी (४७) या दोघी गंभीर जखमी आहेत.
15 मे पर्यंत मुंबईतील नाल्यांची सफाई पूर्ण होईल: महापालिका आयुक्त भुषण गगराणी

मान्सूनपूर्व नालेसफाई करण्यासाठी वॉर्डनुसार आम्ही बैठका घेतलेल्या आहेत. आतापर्यंत 50% मुख्य नाले आणि तीस ते पस्तीस टक्के छोटे नाल्यांची सफाई झालेली आहे. 15  मे पर्यंत ही सर्व कामे पूर्ण होतील. सर्व राज्यस्तरीय यंत्रणांची बैठक घेऊन मानसुनपुर्व तयारीचे आदेश दिलेले आहेत. 

धुळे तालुक्यात पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी पायपीट

धुळे जिल्ह्यात यंदाच्या वर्षी कमी पर्जन्यमान झाल्यामुळे प्रकल्पांमधील जल साठ्यामध्ये पाणी पातळी घटली आहे. यामुळे धुळे तालुक्यातील दह्याने, बह्याने, सडगाव, पाळद या गावातील ग्रामस्थांना पाण्यासाठी दोन ते पाच किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. ग्राम पंचायतीच्या विहिरींनी तळ गाठल्यामुळे गावाबाहेरील शेतामधील विहिरींमध्ये पाणी नेण्यासाठी जावे लागते. ग्रामस्थ आपल्या बैलगाडीच्या माध्यमातून पाणी घेऊन जात आहे. प्रशासनाच्या वतीने या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करावी अशी मागणी देखील ग्रामस्थांनी केली.

कांदिवली,बोरिवलीमध्ये गुरुवारपासून 24 तास पाणीपुरवठा बंद

जलवाहिनी बदलण्याच्या कामामुळे पुढील आठवड्यात कांदिवली आणि बोरिवली परिसरात 24 तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. गुरुवार, 2 मे रोजी रात्री 10 वाजल्यापासून शुक्रवार, 3 मे रोजी रात्री 10 वाजेपर्यंत आर दक्षिण आणि आर मध्य विभागातील काही परिसरांतील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

कोल्हापूरमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा, कोणावर टीकेची तोफ डागणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज कोल्हापूरमध्ये जाहीर सभा होत आहे. महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्यासाठी ही सभा होत असून या सभेची संपूर्ण तयारी झाली आहे. साधारण चार वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी कोल्हापूरमध्ये दाखल होतील. त्यानंतर तपोवन मैदानावर ही सभा होणार आहे. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत. 

रवींद्र धंगेकरांच्या प्रचारासाठी पुण्यात राहुल गांधींची सभा

पुण्यात 3 मे रोजी राहुल गांधी यांच्या प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी पुण्यातील एस.एस.पी एम.एस महाविद्यालयाच्या मैदानावर सभा घेणार आहेत. या सभेला महाविकास आघाडीचे इतर नेतेही उपस्थित राहणार. संध्याकाळी पाच वाजता ही सभा होणार आहे. 

चौथ्या टप्प्यातील निवडणूक, उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर राज्यातील 369 अर्ज वैध

Maharashtra Lok Sabha Election : राज्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे 2024 रोजी होणार आहे. यासाठी राज्यातील 11 लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण 447 उमेदवारांचे 618 अर्ज दाखल झाले होते. आज या अर्जांची छाननी केल्यानंतर एकूण 369 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे. चौथ्या टप्प्यातील उमेदवारी अर्जांची छाननी केल्यानंतर नंदुरबार लोकसभा मतदारसंघात 16,  जळगाव - 20, रावेर - 29, जालना - 35, औरंगाबाद - 44, मावळ - 35, पुणे - 42, शिरूर - 35, अहमदनगर - 36, शिर्डी - 22 आणि बीड लोकसभा मतदारसंघात 55 असे एकूण 369 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

पार्श्वभूमी





 




 







- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.