Maharashtra News Live Updates : राज्यात आज कोरोनाच्या 40 नव्या रूग्णांची नोंद, एकही मृत्यू नाही
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ आज युवक काँग्रेस कडून पुण्यातील टिळक चौकात लावण्यात आले बॅनर , शिस्तप्रिय अधिकारी म्हणून चर्चेत असलेले तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली झाली, मुंढे यांची बदली रद्द झाली पाहिजे या मागणीसाठी काँग्रेस कडून राबवण्यात येतेय सह्यांची मोहीम, मुंढे यांची आता शिर्डी साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली, मुंढे हे कुटुंबकल्याण संचालक चे आयुक्त तसेच, राष्ट्रीय आरोग्य अभियान चे प्रभारी म्हणून काम पाहत होते मात्र काही दिवसांपूर्वी त्यांना या पदावरुन पदमुक्त करण्यात आलं, तुकाराम मुंढे यांची १६ वर्षात १९ वेळा बदली करण्यात आली आहे, धडाकेबाज कामांसाठी प्रसिध्द असलेले तुकाराम मुंढे हे २००५ च्या आयएएस बॅचचे अधिकारी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे की, जी 20 बैठकीसाठी मी दिल्लीमध्ये आलो आहे. पंतप्रधान यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. निवडणूक आयोगाकडे आम्ही सर्व कागदपत्र सादर केली आहेत. मी आजच दिल्लीमध्ये आलो आहे, गाठीभेटी बाबत बघू , मुख्यमंत्र्यांचे सूचक वक्तव्य. दानवे यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी हात जोडले.
दिल्लीत उद्या आणि परवा भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची दोन दिवसांची बैठक
एकीकडे गुजरातचं मतदान होत असतानाच दुसरीकडे लोकसभा 2024 च्या दृष्टीने भाजपच्या तयारीला सुरुवात
भाजपचे सर्व प्रदेशाध्यक्ष प्रभारी या बैठकीसाठी दिल्लीत असण्याची शक्यता
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे बैठक
लोणावळा -लोणावळ्यातील दुधीवरे खिंडीत बसला अपघात, काही विद्यार्थी सहलीसाठी मावळ तालुक्यात आले होते,लोहगडवरून पवना धरण मार्गे लोणावळ्याकडे जात असताना बस गेली 10 ते 15 फूट खड्ड्यात
-सुदैवाने कुठलीही जीवित हानी नाही,ह्या बस मध्ये 30 जण प्रवास करत होते त्यापैकी 3 जखमी
-2 महिला शिक्षक तर चालक किरकोळ जखमी झाले असून त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केलं आहे
-लोणावळा ग्रामीण पोलीस आणि शिवदुर्ग रेस्क्यू टीम यांनी रेस्क्यू करून सर्व सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 42 गावाच्या पाणी प्रश्न पेटला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाणी योजने बाबत निर्णय घेतल्या नंतर जत तालुका पाणी संघर्ष समितीच्या सदस्यांनी आज बंद खोलीत मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेल्या घोषणेवर चर्चा केली. यात 42 गावातील लोकांची चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाणार आहे. 24 तारखेला 42 गावाचा ग्रामस्थांना बोलावून व्यापक बैठक बोलावली जाणार आहे.. या कालावधीत सरकारने कामाला गती द्यावी. त्वरित पैसे मंजूर करावेत. आतापर्यंत अनेक मुख्यमंत्री यांनी या उमदी भागातील गावाच्या पाणी प्रश्नांवर घोषणा केल्या पण यातील योजना आमलात आल्या नाहीत. त्यामुळे विस्तारित म्हैसाळ योजनेबाबत सरकारने ठोस असे निर्णय घ्यावेत आणि या भागातील गावाच्या पाण्याचा प्रश्न संपवावा अन्यथा गावे कर्नाटकात जाण्याचे हे आंदोलन अजून उग्र होईल असा इशारा कृती समितीकडून देण्यात आलाय. ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे व्यापक बैठकीत बदल करून जत तालुका पाणी संघर्ष समितीचे 10 ते 12 सदस्य एकत्र बंद खोलीत बसून सरकारने घेतलेल्या निर्णयाबाबत पुढील भूमिका ठरवली. येत्या 24 तारखेला 42 गावाचा ग्रामस्थांना बोलावून व्यापक बैठक बोलावली जाणार असून या कालावधीत सरकारने कामाला गती द्यावी अशी मागणी सरकारकडे उमदी मधील जत तालुका पाणी संघर्ष समितीच्या बैठकीत करण्यात आलीय.
Maharashtra Corona Update : राज्यात आज कोरोनाच्या 40 नव्या रूग्ण आढळले आहेत. तर 75 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज एकाही मृत्यूची नोंद नाही. कोरोनाची आकडेवारी कमी होत असल्यामुळे राज्यासाठी ही दिलासादायक बाब आहे.
आपण सोशियल मीडियाचा वापर करता का? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची नवीन वर्षाला निरोप देताना सोशल मिडियावर "तुका म्हणे" असा शब्द प्रयोग करून मेसेज व्हायरल केले जातात. दरवर्षी अशा आशयाचे शुभेच्छा, मित्र परिवार आणि आप्तेष्टांना देऊन महाराष्ट्रातील संतांचा अपमान केला जात असतो. त्यामुळेच देहु संस्थानने आता कडक पावले उचलली असून सोशियल मीडियाचा वापर करणाऱ्यांना इशारा दिलाय. नव वर्षासाठी शुभेच्छा देताना "तुका म्हणे" हा शब्दप्रयोग केला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. केवळ संत तुकाराम महाराज यांच्या "तुका म्हणे" या शब्दाचे विडंबन केल्यावरच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह; महाराष्ट्रात असणाऱ्या संत, महापुरुष यांचा वापर केल्यास आणि विडंबन केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा देहु संस्थानने दिला आहे. त्यामुळे महापुरुष आणि संतांची नावे वापरुन कोणताही मॅसेज सोशल मिडियावर व्हायरल करु नये असं आवाहन देहु संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी केले आहे.
सोलापूरमध्ये ब्रेक फेल झालेल्या एसटीचा बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला आहे. वैराग ते मोहोळ जाणाऱ्या एसटीचा मोहोळ जवळ ब्रेक फेल झाला होता होता. मात्र, एसटी चालक दिगम्बर शिंदे यांनी सावधगिरी बाळगत एसटी बस थेट शेतात नेल्याने अपघात टळला. बसमध्ये जवळपास 70 ते 80 प्रवासी प्रवाशी असल्याची माहिती चालकाने दिली.
Crime News : लग्न समारंभात वधूचे दागिने चोरी करणाऱ्या चोरट्याला टिटवाळा पोलिसांनी गजाआड केलंय. लग्न समारंभानंतर वधू जेव्हा सासरी जाण्यास निघाली तेव्हा तिचे दागिने गायब असल्याचे लक्षात आले आणि एकच धावपळ उडाली. याबाबत टिटवाळा पोलिसांना माहिती दिली. टिटवाळा पोलिसांनी घटना स्थळी धाव घेत तपास सुरू केला असता 9 लाख रूपयांच्या दागिन्यांची लॉन्समध्ये डेकोरेशनचे काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने चोरी केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी पोलिसांनी करण परिहार याला अटक केली आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील पदवी व पदव्युत्तर भाग-2 व 3 परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. सुधारित तारखा विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. विद्यापीठ हिवाळी सत्र परीक्षांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. सुधारित तारखेनुसार महाविद्यालय, पदव्युतर अधिविभागात विद्यार्थ्यांना 10 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. परीक्षा अर्ज 12 डिसेंबरपर्यंत approve करता येणार आहे. महाविद्यालयांनी विद्यापीठात परीक्षा अर्जाच्या याद्या 14 डिसेंबरपर्यंत जमा करणे आवश्यक आहे.
दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत स्थापित बचत गटांना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत अन्नप्रक्रिया उद्योगांसाठी बीज भांडवल देण्याची तरतूद आहे. या योजनेची अंमलबजावणी कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे. शहरातील 11 बचत गटांना याचा लाभ मिळाला आहे. या सर्व बचत गटांना 22,10,000 कर्जरुपी बीज भांडवल उपलब्ध करुन दिले आहे.
यासाठी स्थापित बचत गटांमध्ये दोन किवा त्यापेक्षा अधिक महिला किंवा संपूर्ण बचत गट एकच खाद्य पदार्थाशी निगडीत व्यवसाय करत असेल तर प्रती सदस्य 40,000 प्रमाणे बीज भांडवल शासनामार्फत वार्षिक 6 टक्के व्याजदराने उपलब्ध होत आहे. या अनुदानाच्या चेकचे वितरण प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पांबाबत कोकणातील वातावरण तापत असताना दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी रिफायनरी ( Konkan Refinery Project) बाबत भूमिका स्पष्ट केली आहे. विनाशकारी प्रकल्प कोकणात नको मात्र राज्यात येणारे प्रकल्प बाहेर जाणे हे देखील योग्य नाही, असेही राज ठाकरे यांनी म्हटले. रिफायनरी विरोधक आणि समर्थकांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
Prasad Lad : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. छत्रपती शिवराय हे संपूर्ण विश्वाचे आराध्य दैवत आहेत. अनावधानाने माझ्याकडून दुसरा शब्द प्रयोग झाला. परंतू त्वरित चूक दुरुस्त केली. पण कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करत असल्याचे प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला असल्याचे वक्तव्य प्रसाद लाड यांनी केलं होतं.
चंद्रपूर : चंद्रपूर शहरातल्या इंदिरा नगर परिसरात एका युवकाने शालेय विद्यार्थिनींची छेड काढली. यावेळी विद्यार्थिनींनी शाळेच्या आवारातच आरोपीला पकडून त्याची बेदम धुलाई केली. चंद्रपूरच्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडीओवरून ठिकाण शोधून पोलिसांनी याप्रकरणी दोन्ही बाजूच्या लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. या भागात सातत्याने शालेय विद्यार्थिनी विरोधात छेडखानीचे प्रकार होत असताना विद्यार्थिनींनी स्वतःचं पाऊल उचलत छेडछाड करणाऱ्या तरुणाला जागरूक युवकांच्या मदतीने पकडून त्याची धुलाई केली.
Kolhapur : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर सीमा भागात पोलीस बंदोबस्त तैनात
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील टोलनाक्यावर कर्नाटक पोलिसांचा खडा पहारा
समन्वयक मंत्र्यांच्या दौऱ्या आधी कर्नाटक पोलिसांकडून बंदोबस्त
मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराजे देसाई मंगळवारी बेळगावमध्ये जाण्याची शक्यता
मात्र कर्नाटक सरकारकडून दोन्ही मंत्र्यांना बेळगावमध्ये न येण्याची करण्यात आलीये विनंती
दोन्ही मंत्री मात्र बेळगावला जाण्यावर आहेत ठाम
त्याच पार्श्वभूमीवर तणाव टाळण्यासाठी वाढवला बंदोबस्त
बीड जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायतच्या निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे जिल्ह्यातील पंचवीस हजार नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना नवीन कर्ज घेण्यासाठी आणखी पंधरा दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. नियमित कर्ज देणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांच नवीन कर्ज देण्यात येणार आहे मात्र निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने नवीन कर्ज घेण्यासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाही त्यामुळे 50 हजार रुपयांचे कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
पालघर जिल्ह्यातील 63 ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली असून 63 थेट सरपंच पदांच्या जागांसाठी 309 तर 606 सदस्य पदांच्या जागांसाठी 1489 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. 63 पैकी 32 ग्रामपंचायती ह्या पालघर तालुक्यातील असून वाडा आणि वसई तालुक्यात प्रत्येकी 15 तर तलासरी तालुक्यात एका ग्रामपंचायतची निवडणूक पार पडणार आहे
शिंदे गटातील नेते यशवंत जाधव यांनी उर्दू सेंटर बनवण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र या उर्दू सेंटरला स्थानिकांचा आणि भाजपचा आता विरोध होतोय. यावर भाजप नेते नितेश राणे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, हिंदुत्त्वांच्या मुद्द्यावर तडजोड नाही. उर्दू भवन कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही. यशवंत जाधव बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते आणि नेते आहेत. मात्र यशवंत जाधव यांच्या प्रयत्नाने उभे राहणारे उर्दू भवनला विरोध करत, त्यात तडजोड नाही.मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री निर्णय घेतील अशी राणेंची भूमिका आहे. यशवंत जाधव आता नितेश राणे यांच्या भूमिकेनंतर काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 डिसेंबरला समृद्धी महामार्गाचे लोकार्पण होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज समृद्धी महामार्गावर नागपूर ते शिर्डी दरम्यान 520 किलोमीटरचा टेस्ट ड्राईव्ह घेतला.
कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील भामटे इथल्या दोन सख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय...राजवीर महादेव पाटील आणि समर्थ महादेव पाटील अशी त्यांची नावं आहेत.... सकाळी 12 च्या सुमारास गाव तळ्यात आंघोळ करण्यासाठी गेले असताना ही घटना घडलीय... राजवीर हा पहिलीत तर समर्थ दुसरीच्या वर्गात शिकत होता...यामुळे भामटे परिसरात शोककळा पसरली आहे...
मिरजेत चोरट्याने चक्क ग्रामपंचायत निवडणुकीच्या उमेदवारांच्या अनामत रकमेवरच डल्ला मारल्याची घटना घडली आहे. मिरजेतील शासकीय धान्य गोदाम वैरण बाजार येथे मिरज तालुक्यातील छत्तीस ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामनिर्देशित पत्र स्वीकारण्याचे काम निवडणूक प्रशासनाकडून सुरू आहे. यादरम्यान ही विचित्र घटना समोर आली आहे. चक्क चोरट्याने उमेदवारांची भरलेली अनामत रक्कमच लंपास केल्याने मिरज शहरात एकच खळबळ उडाली आहे. शासकीय धान्य गोदाम वैरण बाजार येथे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांकडून भरण्यात आलेली अनामत रक्कम 7200 रुपये इतकी बेडग विभागाच्या टेबलला असलेल्या बेडग ग्रामपंचायत निवडणूक अधिकारी सदाशिव तुकाराम मगदूम वय 42 राहणार समडोळी तालुका मिरज यांच्याकडील पिशवीतून लंपास केली. सदरची घटना 30 नोव्हेंबर 2022 रोजी घडली आहे याबाबत महसूल कर्मचारी सदाशिव तुकाराम मगदूम यांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात मिरज शहर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. याबाबत अज्ञात चोरट्याच्या विरोधात मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबतचा पुढील तपास मिरज शहर पोलीस करीत आहेत.
धर्मांतर विरोधी कायदा देशभरात लागू करावा या प्रमुख मागणीसाठी आज माजलगाव शहरांमध्ये हिंदू धर्म रक्षण मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. दिल्लीमध्ये घडलेल्या घटनेमुळे देशात संताप व्यक्त केला जात आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत आणि धर्मांतर विरोधी कायदा देशभरात लागू करावा ही प्रमुख मागणी या आंदोलनकर्त्यांची होती. शहरामध्ये लहान मुलांसोबत अस्तरून आणि महिला मोठ्या प्रमाणात या मूक मोर्चामध्ये सहभागी झाले होत्या माजलगाव शहरातील झेंडा चौक इथून हिंदू धर्म रक्षण मूक मोर्चाला सुरुवात झाली.
वसमत शहरांमध्ये हिंदू समाज बांधवांच्या वतीने भव्य मूक मोर्चा काढण्यात आला आहे. दिल्लीमध्ये झालेल्या श्रद्धा वालकर चाहते नंतर लव्ह जिहादवर बंदी आणावी धर्मांतर विरोधी कायदा लागू करावा या मागणीसाठी हा मूक मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू धर्मातील विद्यार्थिनी महिला युवक त्याचबरोबर नागरिकांनी सहभाग नोंदवला आहे. वसमत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून हा मोर्चा निघाला आहे. संपूर्ण शहरातून हा मोर्चा जाणार असून तहसील कार्यालयावर हा मोर्चा संपन्न होईल विशेष म्हणजे या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महिलांचा सहभाग दिसून येतो/.
Nagpur : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर- शिर्डी समृद्दी महामार्गाच्या टेस्ट राईडवर रवाना झाले असून सध्या त्यांचा ताफा वर्धेत दाखल झाले आहे. काही वेळापूर्वीच ताफा नागपूरच्या झिरो माईलवरुन निघाला होता. ताफा अमरावती जिल्ह्यातून पुढे प्रवास करणार आहे. समृद्धी महामार्गाच्या मार्गातील विविध जिल्ह्यांमध्ये नागरिकांकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा स्वागत करण्यात येत आहे.
Nagpur : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर- शिर्डी समृद्दी महामार्गाच्या टेस्ट राईडवर रवाना. दोघेही एकाच वाहनात असून उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हाती स्टिअरिंग आहे. वायफळ गावाच्या टोल बुथपासून दौरा पुढे् निघाला.
अनिल परब, शिवसेनेतला बडा नेता आणि उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी थेट अनिल परब यांना टार्गेट केले. कारण होतं रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील मुरुड या गावच्या किनाऱ्यावर उभारला गेलेला साई रिसॉर्ट. दरम्यान, या प्रकरणात आता ईडीने मुरुड ग्रामपंचायतीमध्ये दाखल होत काही कागदपत्रे ताब्यात घेतले आहेत. शिवाय विद्यामान आणि तत्कालीन सरपंच यांची देखील चौकशी करत त्यांना मुंबईत बोलावल्याची माहिती सामोर आहे. मागील आठवड्यातच बुधवार आणि गुरुवारी ईडी मुरुड येथे दाखल झाली होती. त्यानंतर काही कागदपत्र घेत अधिकारी मुंबईत रवाना झाले. त्यामुळे आता विविध चर्चांना सुरुवात झाली आहे. साई रिसॉर्ट प्रकरणी काहीच दिवसांपूर्वी सोमय्या यांनी दापोलीत येत रिसॉर्ट तोडण्याचा दावा केला होता. पण सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून त्याबाबत कोणतीही कारवाई करता येणार नाही. अशा या घडामोडींमध्ये आता ईडीने काही कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत.
नंदुरबार जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात गुजरात राज्यात दारूचे तस्करी होत असल्याचा उघड होत आहे अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या पथकाने आणि तालुका पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत नंदुरबार तालुक्यातील कोपर्ली येथे आठशे बॉक्स अवैध मद्यसाठा जप्त केला आहे. अप्पर पोलीस अधीक्षक तांबे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांच्या विरोधात कारवाईचे संकेत दिले असून पोलीस स्टेशन प्रभारीने आपल्या हद्दीतील अवैध धंदे नष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. अप्पर पोलीस अधीक्षकांनी केलेल्या कारवाईमुळे अवैध तस्करांचे धाबे दणाणले आहे.
समृद्धी महामार्गाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपुरात दाखल झाले आहेत.
Beed News: बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण करणाऱ्या एका इसमाचा पहाटे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वासनवाडी येथील आप्पाराव पवार हे आपल्या कुटुंबीयांसह घरकुलाचे हप्ते मिळावे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले होते. गेल्या चार दिवसापासून प्रशासनानं त्यांच्या आंदोलनाची दखल न घेतल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमावर्ती भागातील नागरिकांच्या भौतिक सुविधां विषयी विशेष पॅकेजची घोषणा केल्या नंतरही नांदेड जिल्ह्यातील महाराष्ट्र तेलंगणा सीमावर्ती भागातील नागरिक त्यांच्या तेलंगणा जाण्याच्या निर्णयावर मात्र ठाम आहेत. तेलंगणा राज्यात जाण्या संदर्भात 7 डिसेंबर रोजी देगलूर तालुक्यातील ऐतिहासिक जागतिक वारसा असणाऱ्या चालुक्य कालीन होट्टल मधून देगलूर, बिलोली, धर्माबाद,उमरी, संगम अशी संवाद यात्रा काढून सीमावर्ती भागातील नागरिकांशी संवाद साधला जाणार आहे.दरम्यान या अगोदर" प्रश्न सीमावर्ती भागातील नागरिकांचे या कृती समितीकडून तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची भेट घेऊन तेलंगणा राज्यात येण्या विषयी चर्चा झाल्याची माहिती देण्यात आलीय.या भेटी दरम्यान मुख्यमंत्री के सी आर यांनी सीमावर्ती भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना तेलंगणात येण्या संदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती कृती समितीने दिली आहे.
बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण करणाऱ्या एका इसमाचा पहाटे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे वासनवाडी येथील आप्पाराव पवार हे आपल्या कुटुंबीयांसह घरकुलाचे हप्ते मिळावे त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमर उपोषणाला बसले होते गेल्या चार दिवसापासून प्रशासनानं त्यांच्या आंदोलनाची दखल न घेतल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे आणि यातच पहाटे आप्पाराव पवार यांचा मृत्यू झाला आहे.. गिला अनेक वर्षापासून अप्पाराव पवार हे घरकुलाचे हप्ते मिळावेत आणि जमिनीवर ताबा मिळावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वेळोवेळी आंदोलन करत आहेत तरी देखील त्यांना प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून शेवटी आंदोलन करताना अप्पाराव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
बदलापूर पालिकेनं 90 अनधिकृत घरांवर कारवाई केलीये. या घरात राहणाऱ्या नागरिकांना बीएसयूपी योजनेत इमारतीत घरं देऊनही हे नागरिक त्यांची जुनी घरं सोडत नव्हते. त्यामुळं अखेर बदलापूर पालिकेनं नोटीस देत ही घरं तोडली. बदलापूर पूर्वेच्या सुभाष नगर परिसरात फुटपाथवर नागरिक अनधिकृतपणे राहत होते. त्यामुळं या नागरिकांना बदलापूर पालिकेनं बीएसयूपी योजनेंतर्गत बांधलेल्या इमारतींमध्ये घरं दिली. त्यानंतर त्यांची फुटपाथवरील घरं पाडण्यासाठी पावसाळ्यापूर्वी या घरांना नोटीस देण्यात आली होती. मात्र तरीही रहिवाशांनी घरं रिकामी न केल्यानं अखेर पालिकेनं या घरांवर तोडक कारवाई केली. या कारवाईत 90 अनधिकृत घरं तोडण्यात आली. काही दिवसांपूर्वीच बदलापूर पालिकेनं रेल्वे स्टेशन परिसरातील 32 अनधिकृत गाळे तोडले होते. त्यानंतर बदलापूर पालिकेची महिन्याभरातली ही दुसरी मोठी कारवाई आहे.
राजकीय उलथापालथीनंतर मी निष्ठावंत राहिलो म्हणून मला ACB ची नोटीस बजावण्यात आली, असं वक्तव्य राजन साळवी यांनी केलं आहे. यंत्रणाचा वापर करत नोटीस दिल्या जात आहेत. ज्यांच्यावर बेहिशेबी मालमत्ताचा आरोप ते भाजपमध्ये जातात. मला तुरुंगात टाकू अशा धमक्या आल्या. मी चौकशीला समोर जाणार. जेलमध्ये गेलो तरी मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार असं वक्तव्य राजन साळवी यांनी केलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा जन्म कोकणात झाला असल्याचे वक्तव्य भाजपाचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी केलं आहे. भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे असे विधान केले. कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवाजी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादीने ट्वीट करत प्रसाद लाड यांचा तो व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच दुसऱ्यांना इतिहास शिकवण्यापेक्षा स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या, असंही त्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा.
Bharat Jodo Yatra: राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) नेतृत्वाखाली काँग्रेसची (Congress) भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) आता मध्य प्रदेशातून राजस्थानमध्ये येणार आहे. या दरम्यान राहुल गांधी सातत्याने केंद्र सरकारवर हल्लाबोल करत आहेत. तसेच संपूर्ण भारताला एकत्र आणणार असल्याचे सांगत आहेत. दरम्यान, राहुल गांधींनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. राहुल गांधींनी प्रश्न उपस्थित केला आहे की, कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने घसरत असताना पेट्रोल आणि डिझेलच्या किमती का कमी होत नाहीत? यासाठी राहुल गांधींनी ट्विटरवर काही आकडेही शेअर केले आहेत.
केंद्र सरकारकडून आता पुढील वर्षांपासून औषधांवर बारकोड अथवा क्यूआर कोड लावणे (Bar Codes On Medicines) अनिवार्य होणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून याबाबतच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. देशात विक्री होणाऱ्या औषधांच्या पाकिटांवर बारकोड अनिवार्य करण्यासाठी केंद्र सरकारने मागील वर्षी Drugs and Cosmetic Rules, 1945 कायद्यात दुरुस्ती करत त्यात अनुसूची एच2 (Schedule H2) जोडली. या निर्णयामुळे उत्पादन आणि वितरण साखळीच्या माध्यमातून औषधांची सत्यता पडताळता येणे शक्य होणार आहे. यातून बनावट औषधांना आळा बसणार असल्याचे म्हटले जात आहे.
Aurangabad News: छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपालांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. आज राजकीय नेत्यांच्या घरासमोर शिवभक्तांकडून ढोल बजाव आंदोलन करण्यात येणार आहे. औरंगाबादमध्ये राज्याचे मंत्री अतुल सावे यांच्या घराबाहेर मराठा क्रांती मोर्चाने ठिय्या आंदोलन केले.
धर्माची ओळख लपवून आपल्यावर वेळोवेळी अत्याचार केल्याचा आरोप धुळे शहरातील एका तरुणीने केला आहे. पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात एका 24 वर्षीय तरुणीने अर्शद सलीम मलिक या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित तरुणीने गुन्हा दाखल करताना 'आफताब श्रद्धा वालकरचे 35 तुकडे केले, मी तुझे 70 तुकडे करील' अशी धमकी दिल्याचा देखील आरोप केला आहे, याप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
रायगड : मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर कार पलटी, एका प्रवाशाचा मृत्यू..
मुंबईच्या दिशेने येणाऱ्या कारचा बोरघाटात अपघात..
अपघातात ५७ वर्षीय विजय पाटील यांचा मृत्यू , मुंबईतील कांजूरमार्ग येथील रहिवासी...
कार अपघातात तीन प्रवासी किरकोळ जखमी...
गोरेगाव येथील राजेशा ग्राउंड रोड येथे रविवारी ‘स्वेट ऑन स्ट्रीट’ हा कार्यक्रम पार पडला. आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अंकित प्रभू युवासेना कार्यकर्णी सदस्याने यांनी आयोजित केलेला हा कार्यक्रम मुंबई ओन्ली फिटनेस बेस्ड झोन स्ट्रीट इव्हेंट म्हणून ओळखल्या जाणारा आहे आणि सर्व वयोगटातील शेकडो लोक सहभागी झाले होते. योग, कराटे, व्यायामशाळा, स्केटिंग, नृत्य, लाइव्ह कॉन्सर्ट आणि गायन यासारखे विविध कार्यक्रम आणि पथनाट्य आणि मुलांचे मनोरंजन यासह इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आजूबाजूच्या सोसायटीतील बहुतेक मुले आणि तरुणांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला आणि या क्षणाचा आनंद लुटला. हाच कार्यक्रम 11 डिसेंबर, रविवारीही आयोजित करण्यात येणार आहे. माजी मंत्री आदित्य ठाकरे 11 डिसेंबरला या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या अंकित प्रभू म्हणाले की, हा कार्यक्रम प्रतिभावंतांना एका व्यासपीठावर येण्यासाठी मदत करतो. आम्ही यापूर्वीही अशा समस्यांचे आयोजन करायचो. पण कोविड आणि लॉकडाऊनमुळे याला ऑल्ट लागला आणि आम्ही ते पुन्हा सुरू केले. सर्व वयोगटातील लोक कार्यक्रमाचा आनंद घेतात.
औरंगाबाद : गोवरच्या प्रादुर्भावणे औरंगाबादकरांची चिंता वाढवली
शहरानंतर आता ग्रामीण भागातही गोवर प्रादुर्भाव
औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यात दोन गोवर संशयित रुग्ण आढळले
शहरातील शनिवारी 11 रुग्ण संशयित आढळले
शहरातील गोवर संशयित बालकांची संख्या पोहोचली 99 वर
दापोली, रत्नागिरी : अनिल परब यांच्याशी संबंधित साई रिसॉर्ट प्रकरणी आता मुरुड ग्रामपंचायत ईडीच्या रडारवर
बुधवार आणि गुरुवारी ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुरुड ग्रामपंचायतीतून काही दस्तावेज घेतले ताब्यात
विद्यमान आणि तत्कालीन सरपंचांची देखील केली गेली चौकशी
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमी परिसरात देशभरातून अनुयायी मुंबईत यायला सुरुवात झाली आहे. मागील तीन वर्षात कोरोना असल्यामुळे देशभरातील अनुयायांना चैत्यभूमी परिसरात येणे अवघड झालं होतं. यंदा मात्र मोठ्या प्रमाणात दोन दिवस आधीच मुंबईत येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने देखील भव्य व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाजी पार्क परिसरामध्ये भला मोठा मंडप घालण्यात आला असून येणाऱ्या सर्वांची राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. या व्यवस्थेचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधींनी
उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली जात असते या वर्षी नंदुरबार जिल्ह्यात एक लाख 25 हजार पेक्षा अधिक क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली आहे .सुरुवातीला कापसाला चांगला दर मिळत होता कापसाचा भाव 9000 ते 9 हजार 700 रुपये प्रति क्विंटल पर्यंत गेला होता मात्र गेल्या पंधरा दिवसात कापसाच्या दरात पंधराशे ते दोन हजार रुपयाची घसरण झाली आहे. कापसाचे दर कमी झाल्याने शेतकऱ्यांनी तात्पुरती कापसाची विक्री बंद केल्यास चित्र जिल्हाभरात पाहण्यास मिळत आहे. कापूस खरेदीच्या मुख्य बाजारपेठा मध्य प्रदेश आणि गुजरात मध्ये आहेत गुजरातमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कापसाची खरेदी विक्री मंदावली आहे. त्याचा परिणाम कापसाच्या दरावर होत असल्याची माहिती या क्षेत्रातील जाणकारांनी दिली आहे गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरात मध्ये कापूस मार्केटमध्ये व्यवहार मंदावले आहेत त्यामुळे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील बाजारपेठांमध्ये कापसाची आवक वाढल्याने दर कमी झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे मात्र गुजरात निवडणुकीच्या नंतर कापसाचे दर वाढण्याचा अंदाज लावला जात आहे.
Ratnagiri News: अनिल परब यांच्याशी संबंधित साई रिसॉर्ट प्रकरणी आता मुरुड ग्रामपंचायत ईडीच्या रडारवर आली आहे. बुधवार आणि गुरुवारी ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुरुड ग्रामपंचायतीतून काही दस्तावेज ताब्यात घेतले. त्याशिवाय, तत्कालीन आणि विद्यमान सरपंचांदेखील चौकशी करण्यात आली आहे.
वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेसला सतत जनावरांची धडक झाल्याच्या घटना घडल्या आहेत. रेल्वे मार्गावर येणाऱ्या या गुरांच्या बंदोबस्तासाठी आता पश्चिम रेल्वेने ६२० किलोमीटर रेल्वे मार्गावर तारेचे कुंपण उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या कामाकरिता पश्चिम रेल्वेने निविदा मागवण्यात आली आहे.
उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात नेहमीच वेगवेगळ्या पक्षांचा वावर असतो.. सध्या उजणीमध्ये रोजी स्टारलिंग म्हणजेच गुलाबी मैना या पक्षांचा वावर आहे.. याला ग्रामीण भाषेत साळ बोर्डी अस म्हणतात.. हे पक्षी युरोपातून उजनीच्या पाणलोट क्षेत्रात येत असतात.. या पक्षांना पाण्यातल्या झाडामध्ये बसवायला आवडतं.. पाऊस पडून गेला की भारतात येतात..सकाळी एकाच वेळी सगळे उडतात. सकाळी आणि संध्याकाळी अशा पध्दतीने पक्षी आकाशात घिरट्या मारणे सुरू असत. हे पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते... सूर्योदय आणि सुर्यास्तावेळी साळ बोर्डी या पक्षांचा चिवचिवाट सुरू असतो.. हा चिवचिवाट पाहण्यासाठी लोकांची गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते..
रत्नागिरी - ग्रामपंचायत निवडणुका तोंडावर आलेल्या असताना आता उदय सामंत यांनी ठाकरे गटाला धक्का दिला आहे. ठाकरे गटातील उपतालुकाप्रमुख आणि विभागप्रमुखांसह अनेकांनी शिंदे गटात उदय सामंत यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला आहे. रत्नागिरी तालुक्यातील करबुडे विभागाचे उपतालुकाप्रमुख प्रवीण पांचाळ आणि गोळप गटाचे विभागप्रमुख नंदा मुरकर यांच्यासह अनेकांनी शिंदे गटात प्रवेश केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज समृद्धी महामार्गाची पाहणी करणार आहेत.
पार्श्वभूमी
ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आज समृद्धी महामार्गाची पाहणी करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज समृद्धी महामार्गाची पाहणी करणार आहेत.
राज ठाकरे रत्नागिरी दौऱ्यावर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. आज सकाळी 11 वाजल्यापासून मान्यवरांच्या भेटीगाठी, रत्नागिरी विधानसभा कार्यालयाचं उद्घाटन, पदाधिकाऱ्यांची बैठक, असे त्यांचे कार्यक्रम आहेत.
दिल्ली महापालिका निवडणुकीसाठी मतदान
आज दिल्ली महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यापूर्वी दिल्लीत तीन महापालिका होत्या. मात्र आता केंद्र सरकारने तिन्ही महापालिकांची मिळून एक महापालिका केली आहे.
मुंबईत नेव्ही विक सोहळा
नेव्ही विक सोहळ्याचा सर्वात थरारक आणि प्रेक्षणीय असा बिटिंग दी रिट्रीट हा कार्यक्रम गेट वे ऑफ इंडियाच्या समोर होणार आहे. प्रात्यक्षिके आणि शिस्तबद्ध कवायती या सोहळ्याचे वैशिठ्य मानले जाते. मावळत्या सूर्याच्या साक्षीने नेव्ही जवान सादरीकरण करतील.
छत्रपती संभाजीराजे किल्ले विशाळगडला भेट देणार
छत्रपती संभाजीराजे किल्ले विशाळगडला भेट देऊन सद्यस्थितीची पाहणी करणार आहेत.
उदय सामंतांची पत्रकार परिषद
उद्योग मंत्री उदय सामंत नाशिक दौऱ्यावर आहेत. दिवसभर विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावतील. दुपारी 12 वाजता उद्योजक बरोबर बैठक आहे. दुपारी दीड वाजता उदय सामंतांची पत्रकार परिषद होणार आहे.
विजयकुमार गावित यांची पत्रकार परिषद
आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांची पत्रकार परिषद होणार आहे. दुपारी 12 वाजता. बोगस आदिवासी प्रकरणावर माजी मंत्री के सी पाडवी यांनी केलेल्या आरोपांना ते उत्तर देणार आहेत.
डॉ. भागवत कराड परभणी दौऱ्यावर
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड परभणी दौऱ्यावर आहेत. भाजपा लोकसभा प्रवास योजना अंतर्गत भाजप नेते, पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. भाजपा प्रवास योजनेअंतर्गत भाजपनेते पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -