Maharashtra News Updates 30 November 2022 : Nagpur Crime: नागपूर पोलिसांची सेंट्रल जेलमध्ये मोठी कारवाई

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 30 Nov 2022 11:22 PM
साकीनाका जंक्शनचे रुंदीकरण, मोठी वाहतूक कोंडी होणार कमी
अंधेरी घाटकोपर आणि अंधेरी कुर्ला मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना दिलासा देणारी बातमी आहे.गेले अनेक वर्षे या मार्गावर साकीनाकावरून अंधेरीकडे येणाऱ्या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत असे. त्यातून आता काही अंशी सुटका होणार आहे.साकीनाका जंक्शनवर वाहतुकीला अडथळा ठरणारे काही हॉटेल आणि दुकाने मुंबई मनपाने निष्कासित केली आहेत. स्थानिक आमदार दिलीप लांडे यांनी वारंवार या रस्त्याच्या रुंदीकरणाची मागणी लावून धरली आहे.यातूनच आज पालिकेने कुर्ला अंधेरी मार्गावर साकीनाका जंक्शन वरही कारवाई केली आहे.यामुळे कुर्ल्याकडून अंधेरी ला येताना आता सिग्नल लागण्याची गरज लागणार नाही आणि थेट वाहने अंधेरीच्या दिशेने जातील आणि यामुळे या जंक्शनवर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणत कमी होणार आहे.नागरिकांनी ही या कारवाईचे स्वागत केले आहे.
Nagpur Crime: नागपूर पोलिसांची सेंट्रल जेलमध्ये मोठी कारवाई

नागपूर पोलिसांची सेंट्रल जेलमध्ये मोठी कारवाई... गोपनीय माहितीच्या आधारावर करण्यात आलेल्या या कारवाईत नागपूर पोलिसांना जेलमधील काही गुन्हेगार जेलच्या आतूनच आपले गुन्हेगारी कार्य चालवत असल्याचे उघड झाले आहे... जामिनावर सुटलेल्या काही गुन्हेगारांच्या मार्फत जेल मध्ये कैदेत असलेल्या सराईत गुन्हेगारांसाठी अमली पदार्थ जेलच्या आत पाठवले जात असल्याचे उघड झाले आहे... धक्कादायक बाब म्हणजे जेलचे बाहेरून जेलमध्ये अमली पदार्थ नेण्यासाठी जेल प्रशासनातील काही कर्मचारी मदत करत असल्याचेही या कारवाईत उघड झाले आहे...


अमली पदार्थ शिवाय जेलमध्ये कैदेत असलेल्या गुन्हेगारांसाठी बिर्याणी आणि इतर चमचमीत खाद्य पदार्थ तसेच थंडीच्या दिवसात गरम कपडे पाठवण्यासाठी ही जेलमधील काही भ्रष्ट कर्मचारी मदत करत असल्याचे उघड झाले आहे...यासाठी मोठे आर्थिक व्यवहार झाल्याचे पोलिसांना वाटत असून त्या दृष्टीने तपास सुरू करण्यात आले आहे...नागपूर पोलिसांनी या प्रकरणी आज सात जणांविरोधात गुन्हा नोंदवला असून त्यापैकी पाच जणांना आज रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले... त्यामुळे नागपूरातील गुन्हेगारीचा नागपूर सेंट्रल जेल एक प्रमुख केंद्र बनल्याचे या कारवाईनंतर समोर आले आहे...

चंद्रपुरात एका वैद्यकीय सेवेतील उच्चपदस्थ अधिकाऱ्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवलं
चंद्रपुरात एका वैद्यकीय सेवेतील उच्चपदस्थ अधिकाऱ्याला हनी ट्रॅपमध्ये अडकविण्यात आल्याचं खळबळजनक प्रकरण पुढे आलं आहे. या अधिकाऱ्याला एका फ्लॅटवर बोलावून एका महिलेसोबतचे व्हिडिओ चोरून चित्रित करण्यात आले. यातील काही भाग दाखवून डॉक्टर कडून 3 लाख वसूल कऱण्यात आले मात्र अजून पैसे उकळण्याच्या उद्देशाने अश्लील चित्रफितीतल्या महिलेने आपल्या नवऱ्यासोबत मिळून खंडणीचा कट रचला. या कटात सादिक खान व इतर दोन महिलांना सामील कऱण्यात आले. सादिक खान याने पीडित अधिकाऱ्याची अश्लील चित्रफीत सार्वजनिक करण्याची धमकी दाखवून ५० लाखांच्या खंडणीची मागणी केली. मात्र पीडित डॉक्टरने पोलीस अधीक्षकांना तक्रार करत आपबीती सांगितल्यावर स्थानिक गुन्हे शाखेने चार पथके तयार करून आरोपींवर सापळा रचला. पाच लाख रुपयांचा चेक व तीस हजार रुपये रोख रक्कम घेताना पोलिसांनी आरोपी सादिक खान व इतर आरोपींना अटक केली. या प्रकरणात दोन पुरुष व तीन महिला आरोपींना अटक करत पोलिसांनी वैद्यकीय अधिकाऱ्याची हनीट्रॅप मधून सुटका केली आहे.

 
मराठी भाषा विभागाचे बोधचिन्ह आणि घोषवाक्य निश्चित करण्यासंदर्भातला शासन निर्णय जाहीर
मराठी भाषा विभागाचे बोधचिन्ह आणि घोषवाक्य निश्चित करण्यासंदर्भातला शासन निर्णय जाहीर झाला आहे. 

 

 

मराठी भाषा विभागाकडून मराठी भाषेचा प्रचार ,प्रसार आणि संवर्धनाच्या दृष्टीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा, वाचन प्रेरणा दिन, मराठी भाषा गौरव दिन अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते

 

 हे विविध उपक्रम लोकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचण्यासाठी आकर्षक भित्तिपत्रके ,पताका यांचा वापर केला जातो ...तसेच या उपक्रमाची माहिती विविध जाहिरात द्वारे लोकांपर्यंत पोहोचली जाते 

 

आता भितीपत्रके जाहिराती प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मराठी विभागाचे बोधचिन्ह आणि घोषवाक्य बनवण्याची बाब विभागाकडे विचाराधीन होती 

 

त्यामुळे आता या विभागाने या नव्या बोधचिन्ह आणि बोधवाक्य याचा वापर करण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता दिली आहे
शिवशक्ती, भीमशक्ती आणि लहू शक्तीचे ठाकरेंकडून संकेत

शिवशक्ती भीम शक्ती आणि लहू शक्ती जर एकत्र आली तर देशात एक मोठी ताकद आपण उभी करू शकतो. आणि आता मी अनुभवतोय आहे कि गद्दार मूठभर सुद्धा नाहीत आणि निष्ठावान डोंगराएवढे आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

बुलढाणा जिल्ह्यात सात बालकांना गोवरची लागण.

बुलढाणा जिल्ह्यात सात बालकांना गोवरची लागण.


विशेष म्हणजे सातही बालकांनी यापूर्वी गोवरची लस दिलेली होती.


जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र पाटील यांची माहिती.


जिल्हा आरोग्य प्रशासन तत्काळ गोवर नियंत्रण कक्ष स्थापन करणार.

जामखेड पोलिसांनी तांदळाचा ट्रक पकडला

जामखेड पोलिस गस्तीवर असताना हिमालय पेट्रोल पंपासमोर 15 हजार किलो तांदूळ घेऊन जाणारा ट्रक पकडला...या तांदळाची किंमत अडीच लाख रुपये रुपये , तर आठ लाख रुपयांचा ट्रक जप्त केला आहे...याबाबत  पोलीस काॅन्स्टेबल अरुण पवार यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलिसात ट्रक चालक शिवाजी गफाट याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ट्रक चालकाकडे या तांदळाबाबत कोणतेही बिल नसल्याने हा तांदूळ रेशन दुकानातील असल्याचा पोलिसांना संशय आहे...ट्रक चालकाने हा ट्रक सुपा येथील कंपनीत घेवुन जात असल्याचे सांगितले.दरम्यान पोलिसांनी याबाबत पुढील तपास सुरू केला असून हा तांदूळ अत्यावश्यक सेवेतील आहे का? हे पोलीस तपासानंतर समोर येणार आहे.

जामखेड पोलिसांनी तांदळाचा ट्रक पकडला

जामखेड पोलिस गस्तीवर असताना हिमालय पेट्रोल पंपासमोर 15 हजार किलो तांदूळ घेऊन जाणारा ट्रक पकडला...या तांदळाची किंमत अडीच लाख रुपये रुपये , तर आठ लाख रुपयांचा ट्रक जप्त केला आहे...याबाबत  पोलीस काॅन्स्टेबल अरुण पवार यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलिसात ट्रक चालक शिवाजी गफाट याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ट्रक चालकाकडे या तांदळाबाबत कोणतेही बिल नसल्याने हा तांदूळ रेशन दुकानातील असल्याचा पोलिसांना संशय आहे...ट्रक चालकाने हा ट्रक सुपा येथील कंपनीत घेवुन जात असल्याचे सांगितले.दरम्यान पोलिसांनी याबाबत पुढील तपास सुरू केला असून हा तांदूळ अत्यावश्यक सेवेतील आहे का? हे पोलीस तपासानंतर समोर येणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना श्रद्धांजली

समाजजीवनाशी एकरूप होऊन आपल्या लेखनातून मराठी साहित्यात मोलाची भर घालणारा स्वतंत्र प्रतिभेचा, कृतीशील साहित्यिक गमावला आहे,अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे.


शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, डॉ. कोत्तापल्ले यांचा मराठीचे शिक्षक ते कुलगुरू, साहित्य संमेलनाध्यक्ष आणि मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विविध भूमिका बजावणारे व्यक्तीमत्व हा प्रवास महत्त्वाचा आहे. मराठी साहित्य चळवळ समृद्ध व्हावी यासाठी त्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. यासाठी शासनाच्या विविध समित्यांच्या माध्यमातून काम केले. होतकरू, नवोदित साहित्यिकासाठी मार्गदर्शनसाठी ते आधारवड होते. भूमिका घेऊन लिहिण्याची स्वतंत्र शैली यामुळे त्यांची साहित्य संपदा निश्चितच पुढच्या पिढीला प्रेरणादायी ठरेल. अशा आपल्या वैविध्यपूर्ण साहित्यकृतींनी त्यांनी मराठी साहित्य विश्व समृद्ध केले आहे.  त्यांच्या निधनामुळे साहित्यिक क्षेत्राची हानी झाली आहे, त्यांच्या सारख्या व्यासंगी आणि कृतीशील साहित्यिकाची उणीव भासत राहील.ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना भावपूर्ण श्रद्धांजली!'

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर 1 डिसेंबरपासून रस्ता ‘सुरक्षा’ उपक्रम

मुंबई-पुणे द्रुतगती नवीन व जुन्या महामार्गावर अपघाताचे प्रमाण कमी करणे, वाहन चालकांमध्ये शिस्त निर्माण व्हावी यासाठी १ डिसेंबर पासून पुढील ६ महिन्यांसाठी २४ तास ‘सुरक्षा’ या रस्ता सुरक्षा जनजागृती व अंमलबजावणी उपक्रमाचे आयोजन परिवहन विभागामार्फत करण्यात येत आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत १७ ऑक्टोबर २०२२ रोजी झालेल्या बैठकीत रस्त्यावरील जीवीत व वित्त हानी टाळण्यासाठी विविध उपाययोजना अंमलात आणण्यासाठी सर्व संबंधित विभागांना आदेश देण्यात आले होते. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग तसेच जुना महामार्गावर अपघाताचे प्रमाण कमी करणे व वाहन चालकांमध्ये शिस्त निर्माण होण्याकरीता दीर्घकालीन जनजागृती व अंमलबजावणी करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले होते.

Udayanraje Bhosale : शिवाजी महाराजांनी अफजल खानची कबर बांधली हा त्यांचा मोठेपणा : उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosale : आज तीन शिवजयंती साजरी केली जाते. ही अवहेलना नाही का महाराजांची? श्रेय वादासाठी काही करत असतील तर मला काही बोलायचे नाही. असे उदयनराजे पत्रकार परिषदेत म्हणाले. तसेच, अफजल खान हा काही संत नव्हता, शिवाजी महाराजांनी त्यांची कबर बांधली, हा त्यांचा मोठेपणा होता असेही ते म्हणाले. 

Udayanraje Bhosale : प्रत्येक जाती धर्माचे लोकं पक्षात असले पाहिजेत : उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosale : छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण देशात एक लोकशाहीचा ढाचा घालून दिला. अजूनही काही देश आहेत जिथे राजेशाही आहे. त्यावेळसुद्धा त्यांनी जर विचार केला असता की राजेशाही अबाधित ठेवायची तर आजसुद्धा या देशात राजेशाही अस्तित्वात असती. असे उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे. 

कोविड काळात कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या परिचारिकांना आरोग्य विभागाचा मोठा दिलासा

कोविड काळात कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या परिचारिकांना आरोग्य विभागाचा मोठा दिलासा



597 परिचारिकांना कायमस्वरुपी शासनात समावेश करून घेण्याचा मोठा निर्णय


कोविड काळात 11 महिन्यांचा करार केला होता. मात्र तो संपुष्टित आल्यानंतर या सर्व परिचारिकांना घरी जावे लागणार होतं


राज्य सरकारने केंद्र सरकारशी पत्रव्यवहार करून या सर्व परिचारिकांना कायमस्वरूपी शासनात घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय

नाचताना धक्का लागल्याचा जाब विचारल्याने पोटात खूपसला चाकू! उल्हासनगरच्या सुभाष टेकडी भागातील प्रकाराने खळबळ

 उल्हासनगरच्या कॅम्प ४ मधील सुभाष टेकडी परिसरात मंगळवारी रात्री राजू बनकर यांच्या नातवाचा वाढदिवस होता. त्यानिमित्त सागर गायकवाड यांच्या घरासमोर सागर याच्यासह रोशन बनकर सोनू गायकवाड आणि इतर मित्र नाचत होते. यावेळी त्यांच्याच ओळखीतला कुणाल वाहुळ हा तिथे आला आणि सागर आणि त्याच्या मित्रांना धक्काबुक्की करू लागला. त्यामुळे सागर याने त्याला धक्काबुक्की करू नको, नीट नाच, अन्यथा इथून निघून जा, असं सांगितलं. मात्र कुणाल याला त्याचा राग आल्याने तो तिथून निघून गेला आणि काही वेळाने पुन्हा आला आणि त्याने सागर याच्या पोटात धारदार चाकू खुपसला. या हल्ल्यात सागर हा गंभीर जखमी झाल्याने त्याला आधी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यात आलं. तिथून कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आणि तिथून मुंबईच्या केईएम हॉस्पिटलला त्याला हलवण्यात आलं. त्याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करत आरोपी कुणाल वाहुळ याला बेड्या ठोकल्या आहेत.

भाडेकरूला काढण्यासाठी मालकानेच पाठवले गुंड! उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रकार

उल्हासनगरच्या कॅम्प ४ मधील ओटी सेक्शनमध्ये संजय गुप्ता यांचा कपड्यांचा कारखाना आहे. या कारखान्याची जागा मुकेश वाधवा यांची आहे. मात्र वाधवा आणि भाडेकरू गुप्ता यांच्यात सुरू असलेल्या वादामुळे हे प्रकरण कोर्टात गेलं असून गुप्ता हे मागील तीन महिन्यांपासून कोर्टात या जागेचं भाडं भरत आहेत. त्यामुळे ही जागा रिकामी करून घेण्यासाठी वाधवा यांच्याकडून गुप्ता यांना वारंवार धमक्या दिल्या जात असल्याची गुप्ता यांची तक्रार आहे. अशातच मंगळवारी २९ नोव्हेंबर रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास गुप्ता यांच्या कारखान्यात ८ ते १० गुंड घुसले. त्यांनी कारखान्याची तीन कुलूपं तोडून आतमध्ये प्रवेश केला आणि ऑफिसमध्ये येऊन बसले. ऑफिसमध्ये त्यांनी कागदपत्रं चाळली. त्यानंतर कारखान्यात जाऊन कपडे अस्ताव्यस्त फेकले. हा सगळा प्रकार गुप्ता यांच्या कारखाना आणि ऑफिसमधील सीसीटीव्हीत कैद झाला. याप्रकरणी संजय गुप्ता यांच्या तक्रारीवरून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात घुसखोरी, धमकी देणे आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी यापैकी काही जणांना अटक सुद्धा केली आहे. या प्रकरणात जागामालक वाधवा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी फिर्यादी संजय गुप्ता यांनी केली आहे. तर पोलिसांनी तूर्तास या प्रकरणात प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

साताराकडून पुण्याकडे येणारी वाहतूक नवीन कात्रजबोगद्यातून दरीपूलमार्गे

पुणे कात्रज- शिंदेवाडी रस्ता राज्य मार्ग क्र. १२६ अर्थात जुना कात्रज घाट रस्त्याच्या डांबरी पृष्ठभागाचे मजबुतीकरणाचे काम सुरु असल्याने एकेरी वाहतूक करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केले आहेत.  ३ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत सातारा ते पुणे जुना कात्रज घाट रस्त्यावरील वाहतूक बंद करुन वाहतूक नवीन बोगद्यातून पुण्याकडे वळविण्यात येणार आहे.


जुना कात्रज घाट रस्त्याच्या कि.मी. २२/०० ते २०/२०० या लांबीत डांबरी पृष्ठभागाचे मजबुतीकरणाचे काम सुरु असल्याने दुहेरी वाहतुकीमुळे वाहतूक कोंडी व अपघाताच्या शक्यता लक्षात घेऊन या उपाययोजन करण्यात आल्या आहेत. त्यानुसार ३ ते ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत या रस्त्यावर एकेरी वाहतूक करुन साताराकडून येणारी वाहतूक नवीन बोगद्यातून दरीपूल मार्गे पुण्याकडे वळविण्यात येणार आहे.


पुणे मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम ११५ मधील तरतूदीनुसार व गृह विभागाचे १९ मे १९९० च्या अधिसूचनेनुसार जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी हे आदेश जारी केले आहेत.

नवाब मलिक यांच्या आरोग्याची जे जे रुग्णालयातील तज्ञ डॉक्टर करणार तपासणी

नवाब मलिक यांच्या  आरोग्याची जे जे रुग्णालयातील तज्ञ डॉक्टर करणार तपासणी


ईडीनं याबाबत दाखल केलेला अर्ज कोर्टानं स्वीकारला


नवाब मलिकांच्या आरोग्याची  तपासणी करण्याकरता विशेष पथक स्थापन करण्याची ईडीने केली होती मागणी

पालघरमध्ये मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू

 मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी तीन वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला असून या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला . तर एक जण गंभीर जखमी आहे . मालवाहू ट्रक आणि ब्रिझा कार मध्ये धानिवरी येथे हा भीषण अपघात झाला असून या अपघातात दीपक अग्रवाल , सुमित्रा अग्रवाल ,  सत्यनारायण अग्रवाल अशा तिघांचा मृत्यू झाला तर केतन अग्रवाल हा जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.  समोरील वाहनाचा अंदाज न आल्याने ब्रीझा कारणे मागून धडक दिल्याने हा अपघात झाला असून अपघातानंतर काही वेळातच जखमींना कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.  मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केलं .

मी फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचं उदाहरण दिले, तुलना केली नाही - मंगलप्रभात लोढा यांचं स्पष्टीकरण

मी फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचं उदाहरण दिले, तुलना केली नाही -  मंगलप्रभात लोढा यांचं स्पष्टीकरण

नवाब मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळला

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचा जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला आहे.

उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांवरील बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपांचं प्रकरण, पुढील आठवड्यात सुनावणी घेण्याचं हायकोर्टाकडून निश्चित

उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांवरील बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपांचं प्रकरण


गौरी भिडे यांच्या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी घेण्याचं हायकोर्टाकडून निश्चित


8 डिसेंबर रोजी न्यायमूर्ती धीरज ठाकूर आणि न्यायमूर्ती वाल्मिकी मेनेझेस यांच्या खंडपीठासमोर होणार सुनावणी


माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा गंभीर आरोप करत 


गौरी भिडे यांनी हायकोर्टात याचिका करत सीबीआय अथवा ईडी चौकशीची मागणी केली आहे. 

बीएमसी प्रभाग संख्या आणि पुर्नरचनेवरील काम तूर्तास थांबवणार का? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल

Mumbai News : बीएमसी प्रभाग संख्या आणि पुर्नरचनेवरील काम तूर्तास थांबवणार का?


मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल, दुपारपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश


शिवसेनेचे माजी नगरसेवक राजू पेडणेकरांच्या याचिकेवरील सुनावणी दुपारपर्यंत तहकूब


याचिका गुणवत्तेच्या आधारावर ऐकण्यास हायकोर्टाची तयारी


मविआनं 236 वर नेलेली प्रभागसंख्या शिंदे-फडणवीस सरकारनं पुन्हा 227 केल्याचा विरोध करत याचिका


प्रभाग संख्या 9 नं वाढवण्याचा निर्णय योग्य कसा होता?, हे पटवून देण्याचे याचिकाकर्त्यांना निर्देश

किरकोळ वादातून महिलेची हत्या, दोन जण गंभीर जखमी; परभणीच्या जिंतुर तालुक्यातील पांगरी इथली घटना
Parbhani News : गावात पाणी भरण्यावरुन झालेल्या वादातून एका महिलेची हत्या झाली असून दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना परभणीच्या जिंतुर तालुक्यातील पांगरी गावात घडली आहे. पांगरी गावात पाणी भरण्यावरुन काही जणांमध्ये वाद झाला. हा वाद हाणामारीत परावर्तित झाला आणि यातच तीक्ष्ण हत्याराने मार लागल्याने सत्यभामा नागोराव मुंडे या 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून आशामती फकीरराव बुधवंत आणि ऋषिकेश नाथराव सांगळे यांच्या डोक्याला मार लागला. या दोघांवर प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी शासकीय  परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच रुग्णालयात पो.नि.दिपक दंतुलवार यांच्यासह पथक पोहोचले. नेमकं काय झालं होतं तसेच कुणी मारहाण केली याचा तपास पोलीस करत आहेत.
देवस्थानची जमीन बळकवल्याप्रकरणी आमदार सुरेश धस यांच्यासह पत्नी आणि भाऊ देविदास धस यांच्यावर अपहार आणि फसवणुकीचा गुन्हा
Beed News : देवस्थानची जमीन बळकवल्याप्रकरणी भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यासह त्यांच्या पत्नी, धस यांचे भाऊ देविदास धस त्यासोबत मनोज रत्नपारखी आणि असलम नवाब खान अशा पाच जणांवर आष्टी पोलीस ठाण्यामध्ये अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लातूर उत्पादक विभागाच्या तक्रारीनंतर धस यांच्यावर कलम 13 (1) अ ब आणि कलम 13 (2) यासह कलम आयपीसीनुसार 465/67/68/71 कलम 120 ब आणि 109 या कलमाअंतर्गत अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी राम खाडे यांनी हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठांमध्ये याचिका दाखल केली होती. यावर हायकोर्टाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिले होते मात्र सुप्रीम कोर्टाने सुरेश धस यांची याचिका फेटाळली होती. देवस्थानच्या जमिनीमध्ये अपहार केल्याप्रकरणी आणि फसवणूक करुन या जमिनी बळकावल्याप्रकरणी लाचलुचपत विभागाने आमदार सुरेश धस यांच्याविरोधात तक्रार दिली होती आणि याच तक्रारीनंतर आता आष्टी पोलीस ठाण्यामध्ये सुरेश धस यांच्यासह इतर पाच जणांवर आष्टी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अल्पवयीन मुलीसोबत विवाह करणाऱ्या पतीविरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल; सासू-सासरे, आई-वडिलांवरही गुन्हा

Beed News : अल्पवयीन मुलीसोबत विवाह केल्याने तिच्या पतीवर बीडच्या गेवराई तालुक्यातील चकलांबा पोलीस ठाण्यात पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेवराई तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. ती गर्भवती होती आणि औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात तिची प्रसुती झाली. त्यावेळी तिच्या आधार कार्डवर वय 17 वर्षे असल्याने डॉक्टरांनी ही माहिती पोलिसांना दिली. याच माहितीच्या आधारावर अल्पवयीन मुलीशी विवाह करणाऱ्या पतीवर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोबतच सासू-सासरे आणि तिच्या आई-वडिलांवर देखील बालविवाह प्रतिबंधक अधिनियम कायद्यानुसार चकलंबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Raigad Sarpanch Election 2022: सरपंच पदासाठी 111 तर सदस्यासाठी 253 अर्ज

Raigad Sarpanch Election 2022: रायगड जिल्ह्यातील 240 सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकींसाठी सरपंच आणि सदस्य पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 28 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली असून सरपंच पदासाठी आतापर्यंत 111 तर सदस्यपदासाठी २५३ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज  भरण्यात आले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतीम तारीख 2 डिसेंबर असून 240 ग्रामपंचायतीच्या 18 डिसेंबरला मतदान प्रक्रिया पुर्ण होणार आहे. महाड विधानसभा मतदासंघात सर्वाधिक ग्रामपंचायत निवडणुका होणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Raigad Sarpanch Election 2022: सरपंच पदासाठी 111 तर सदस्यासाठी 253 अर्ज

Raigad Sarpanch Election 2022: रायगड जिल्ह्यातील 240 सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकींसाठी सरपंच आणि सदस्य पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 28 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली असून सरपंच पदासाठी आतापर्यंत 111 तर सदस्यपदासाठी २५३ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज  भरण्यात आले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतीम तारीख 2 डिसेंबर असून 240 ग्रामपंचायतीच्या 18 डिसेंबर ला मतदान प्रक्रिया पुर्ण होणार आहे. महाड विधानसभा मतदासंघात सर्वाधिक ग्रामपंचायत निवडणुका होणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाच्या तज्ञ समितीच्या अध्यक्षपदी खासदार धैर्यशील माने यांची नियुक्ती

Maharashtra News: महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयातील दाखल याचिकेसाठी तज्ञ समितीच्या अध्यक्षपदी खासदार धैर्यशील माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काल सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार माने यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं अभिनंदन केलं गेलं.


या समितीच्या सदस्यपदी ॲड. राम आपटे, दिनेश ओऊळकर तर विशेष निमंत्रीत म्हणून ॲड. र. वि. पाटील, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव हे विशेष निमंत्रीत असून सीमा प्रश्न विषयी काम पाहणाऱ्या विभागाचे सचिव हे समितीचे सदस्य सचिव आहेत. 

Mumbai-Pune Expressway Accident : मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर वाहनांचा अपघात, एक ट्रक दरीत कोसळला

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


प्रतापगडावर शिवप्रताप दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहे. शिवप्रताप दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यासाठी सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री शिंदे हे प्रतापगड येथे पोहोचणार आहे.  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रतापगडावरील मुख्य बुरुजावर ध्वजारोहण करण्यात येणार आहे.  


राज ठाकरे यांचा कोकण दौरा


मनसे अध्यक्ष आज कोकण दौऱ्यावर असणार आहे. सकाळी 10 वाजता राज ठाकरे कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतील.  संध्याकाळी 5 वाजता ते सावंतवाडी येथे पोहोचतील आणि कुडाळ येथे मुक्काम करतील.


नवाब मलिकांच्या जामीनावर आज मुंबई सत्र न्यायालय देणार निर्णय


प्रकृती अस्वस्थ्यामुळे न्यायलयीन कोठडीत असलेल्या नवाब मलिकांवर गेल्या काही महिन्यांपासून कुर्ल्यातील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ईडीनं त्यांना गोवावाला कंपाऊंडमधील जमीन खरेदीच्या व्यवहारात केलेल्या मनी लॉड्रिंग प्रकरणी अटक केली होती. दाऊद इब्राहिमच्या टोळीसोबत केलेल्या व्यवहारातून दहशतवादाला अर्थसहाय्य केल्याचाही आरोप मलिकांवर आहे. त्यांच्या जामीनावर आज मुंबई सत्र न्यायालयात सकाळी 11 वाजता सुनावणी सुरु होईल. 


महाविकास आघाडीची बैठक


हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गटाची बैठक होणार आहे. ही बैठक अजित पवारांच्या दालनात सकाळी 11 वाजता होणार आहे. 


अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम हे आज ईडी कार्यालयात जबाब देण्यासाठी उपस्थित राहतील


मुंबई- माजी मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम आणि दापोलीच्या सरपंचांना ईडीच्या अधिकाऱ्याने समन्स बजावले होते. त्यांना आज ईडी कार्यालयात जबाब देण्यासाठी उपस्थित रहायचं आहे. दापोली रिसॉर्ट, मनी लाँड्रिंग आणि दापोली येथे दाखल झालेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यासंदर्भातली चौकशी करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. 


राज्यात गोवरचा वाढत प्रभाव, उपाययोजनांसाठी आज होणार बैठक   


मुंबई- राज्यात गोवरची साथ मोठ्या झपाट्याने वाढतीये. या बाबत चर्चा करण्यासाठी बैठक होणार आहे. नेमकी साथ आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकार काय प्रयत्न करतंय, कशा प्रकारची स्ट्रॅटेजी आखलेली आहे. यावर आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची पत्रकार परिषद दुपारी 12 वाजता होणार आहे.


महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष संजयकुमार सिंह यांची पत्रकार परिषद


पुणे- अस्थायी समिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष संजयकुमार सिंग यांची पत्रकार परिषद होणार आहे. संजयकुमार सिंग हे भारतीय कुस्ती महासंघाकडून नियुक्त समितीचे अध्यक्ष आहेत. बाळासाहेब लांडगे यांच्या नेतृत्वाखालील कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आल्यानंतर ही अस्थाई समिती स्थापन करण्यात आलीय. या समितीकडून यावेळच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 11 ते 15 जानेवारी दरम्यान होणार असल्याचं नक्की करण्यात आलंय. सह्याद्री कुस्ती संकुल, वारजे, दुपारी 12 वाजता


आज राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचं वितरण 


आज दिल्लीला राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचं वितरण केलं जाणार आहे. नेमबाज प्रशिक्षक सुमा शिरुर आणि रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांना यावेळी द्रोणाचार्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे, राष्ट्रपती भवन, दुपारी 4 वाजता 


मुंबई महानगरपालिका प्रभाग 227 की 236 यावर आज मुंबई उच्च न्यायालयात होणार सुनावणी


मुंबई- मुंबई महानगरपालिका प्रभाग 227 की 236 यावर आज मुंबई उच्च न्यायालयात होणार सुनावणी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नगरसेवक राजू पेडणेकर यांनी प्रभाग रचनेत 236 प्रभाग असावे याकरिता केली आहे याचिका. शिंदे सरकारने 236 वरून पुन्हा 227 ची प्रभाग रचना केली होती.


शेतकरी दिंडीच्या तयारीसाठी शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार 


मुंबई- राष्ट्रवादीकडून काढण्यात येणाऱ्या शेतकरी दिंडीच्या तयारीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. शेतकरी दिंडीमध्ये राष्ट्रवादीचे सर्व वरिष्ठ नेते सहभागी होणार. शेवटच्या दिवशी शरद पवार यात्रेला संबोधित करणार, यशवंतराव चव्हाण सेंटर, दुपारी 4 वाजता. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.