Maharashtra News Updates : मुंबईपेक्षा बिहार पोलिसांवर अधिक विश्वास आहे का?  खासदार अरविंद सावंत यांचा सवाल

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 21 Dec 2022 06:56 PM
मुंबईपेक्षा बिहार पोलिसांवर अधिक विश्वास आहे का?  खासदार अरविंद सावंत यांचा सवाल

राहुल शेवाळे यांच्या आरोपानंतर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी टीकास्त्र सोडलं आहे. मुंबईपेक्षा बिहार पोलिसांच्या तपासावर तुमचा जास्त विश्वास आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. 


आदित्य ठाकरे सभागृहात नसताना त्यांचं नाव घेणे हा अनुचित प्रकार आम्ही पिठासीन अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिला. त्यानंतर ते वक्तव्य सभागृहातून वगळण्यात आलं आहे. ठाकरे गटाच्या विरोधानंतर ते वक्तव्य कामकाजातून वगळण्यात आलंय, अशी माहिती अरविंद सावंत यांनी दिलीय. मुळात ज्यांच्या चारित्र्याचा पत्ता नाही त्यांनी अशा गोष्टींवर बोलू नये. सीबीआयने क्लीन चीट दिली त्यांच्यावर तुमचा विश्वास नाही का? मुंबईपेक्षा बिहार पोलिसांवर अधिक विश्वास आहे का? असा सवाल अरविंद सावंत यांनी उपस्थित केलाय.  

Anil Deshmukh: अनिल देशमुखांच्या जामीनावरील स्थगिती हायकोर्टानं वाढवली, सीबीआयची विनंती हायकोर्टानं मान्य केली

Anil Deshmukh: अनिल देशमुखांच्या जामीनावरील स्थगिती हायकोर्टानं वाढवली आहे. सीबीआयची विनंती हायकोर्टानं मान्य केली आहे. जामीन मंजूर केल्याच्या निकालाला मंगळवारपर्यंत स्थगिती दिली आहे. जामीन मंजूर होऊनही अनिल देशमुखांचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे.  सर्वोच्च न्यायालयातील आव्हानावर 27 डिसेंबरपर्यंत सुनावणी करून घेण्याची सीबीआयकडे संधी आहे. 

अनिल देशमुखांच्या जामीनावरील स्थगिती हायकोर्टानं वाढवली

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीनावरील स्थगिती हायकोर्टाने 27 डिसेंबरपर्यंत वाढवली

Anil Deshmukh Bail : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीनावरील स्थगिती हायकोर्टाने वाढवली


सीबीआयची विनंती हायकोर्टाने मान्य केली


जामीन मंजूर केल्याच्या निकालाला मंगळवारपर्यंत स्थगिती


जामीन मंजूर होऊनही अनिल देशमुखांचा कारागृहातील मुक्काम वाढला


सर्वोच्च न्यायालयातील आव्हानावर 27 डिसेंबरपर्यंत सुनावणी करून घेण्याची सीबीआयकडे संधी

Vasai News: इंपोर्टेड सायकली चोरणारा सराईत चोर जेरबंद

Vasai News: बी.एम.डब्लू, जॅग्वार आणि इतर नामांकित कंपनीच्या सायकली चोरी करणारा सराईत चोर आचोळे पोलिसांच्या हाती लागला आहे. त्याच्याकडून नामांकित कंपनीच्या 11 सायकली जप्त केल्या आहेत.


आचोळे पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी आणि अंमलदार नालासोपारा पूर्वेकडील वसंत नगरी येथे गस्त घातलत असताना, आरोपी राजकुमार गिरीष मेवाडा हा विवेलो कंपनीची गियर सायकल घेवून जात असताना आढळून आला. सायकल थांबवून विचारपूस केली असता, त्यांने उडवा उडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी सायकलबाबत चौकशी केली असता. सायकल चोरीची निघाली. पोलिसांनी राजकुमार मेवाडा या 18 वर्षांच्या आरोपीला अटक केली. त्याच्याकडून ११ सायकली पोलिसांना सापडल्या आहेत. या 11 सायकलीची किंमत 98,000 एवढी आहे. आचोळे पोलिसांनी सर्व सायकली ताब्यात घेतल्या आहेत. आणि ओरोपीवर गुन्हा दाखल करुन, तपास सुरु केला आहे. 

Shivsena: बाळासाहेबांच्या शिवसेनेला पनवेलमध्ये बळकटी, शेकडो महिलांचा पक्ष प्रवेश

Shivsena: बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून कळंबोली येथील सुधागड हायस्कूल मध्ये महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी मेळाव्याला हजर शेकडो महिलांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. पनवेल आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर बाळासाहेबाच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश सुरू आहेत. आगामी पनवेल महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिने हे पक्ष प्रवेश पनवेल मध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेला बळकटी देण्यास कामाला येतील. पनवेल जिल्हा संपर्क प्रमुख रामदास शेवाळे यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या ठिकाणी शेकडो महिलांनी उपनेते विजय नाहटा यांच्या उपस्थितीत  पक्षप्रवेश करून बाळासाहेबांच्या शिवसेनेचा भगवा हातात घेतला.

Navi Mumbai Crime News: अंमली पदार्थाच्या विक्रीसाठी आलेली पाच जणांची टोळी जेरबंद

Navi Mumbai Crime News: एपीएमसीतील मॅफ्को मार्केट परिसरात अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या पाच जणांच्या टोळीला एपीएमसी पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे 8 लाख रुपये किंमतीचे 80 ग्रॅम वजनाचे हेरॉईन हे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. या कारवाईत अटक करण्यात आलेले सर्व आरोपी हे मुळचे केरळ राज्यातील असून ते हेरॉईन हे अंमली पदार्थ केरळ येथे घेऊन जाणार असल्याचे तपासात आढळून आले आहे.


एपीएमसीतील मॅफको मार्केट परिसरात काही व्यक्ती हेरॉईन हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती एपीएमसी पोलिसांना मिळाली होती. मॅफको मार्केटमधील यु. पी. कोल्ड स्टोरेज परिसरात सापळा लावला होता. या प्रकरणात 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Bhandara News: 'आरटीओ हटाव, भंडारा बचाव'चे नारे देत आंदोलन; ओव्हरलोड वाहनाला सोडून छोट्या वाहनांवर कारवाई केल्याचा निषेध

Bhandara News: ओव्हरलोड वाहतूक करणारे वाहन चिरीमिरी घेवून सोडून जेवणाचे ऑर्डर घेऊन जाणाऱ्या चालकाचे वाहन भोजन साहित्यासह ताब्यात घेऊन त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यासह अनेक प्रकरणात संशयास्पद कारवाई करणाऱ्या आरटीओला हटविण्याच्या मागणीला घेवून 'आरटीओ भगाओ, भंडारा बचाओ' असे नारे देत भंडारा येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात घोषणाबाजी करून जय जवान जय किसान संघटनेने आंदोलन केले.


आरटीओ कार्यालयात मोठ्या प्रमाणात दलालांचा सुळसुळाट सुरू आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठी आर्थिक लूट करण्यात येत असल्याने ही लुटपाट थांबवावी आणि गोरगरिबांना वाचवावे, अशी मागणी करण्यात आली. मागील अनेक दिवसांपासून भंडारा शहरातून मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड वाहतूक करण्यासाठी पैसे घेऊन वाहने सोडण्यात येत असून जे एन्ट्री देत नाही, अशा वाहनधारकांवर कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. अशाच प्रकारच्या कारवाईत मागील आठवड्यात भंडारा शहरातील काही केटर्स व्यावसायिकांचे वाहने आरटीओ अधिकाऱ्यांनी भोजनाच्या साहित्यासह जप्त करून कारवाई केली. यामुळे जय जवान जवान किसान संघटनेने हे आंदोलन करून आरटीओ अधिकाऱ्यांना हा प्रकार बंद करण्याचा अल्टिमेटम दिला आहे.

Ambernath News: अंबरनाथच्या वालधुनी नदीवर प्रदूषणाचा फेस

Ambernath News: अंबरनाथ शहरातून वाहणाऱ्या बाजूनी नदीत अनेक वर्षांपासून रासायनिक कारखान्यांकडून सांडपाणी सोडलं जातं. या सांडपाण्यामुळे वालधुनी नदीचा रासायनिक नाला झाला असून याचा स्थानिकांना मोठा त्रास होतो. आज सकाळी वालधुनी नदीत प्रदूषणाचा फेस जमा झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यामुळे स्थानिकांनी संताप व्यक्त केलाय. वालधुनी नदीत आजवर झालेल्या प्रदूषणानंतर दरवेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून एमआयडीसीतील रासायनिक कारखान्यांची पाहणी केली जाते. आणि त्यानंतर कारखान्यांना नोटिसा बजावल्या जातात. मात्र यानंतर पुन्हा एकदा कंपन्यांकडून राजरोसपणे नदीत रासायनिक सांडपाणी सोडलं जातं. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या एकंदरीत कार्यक्षमतेवरच नव्हे, तर विश्वासार्हतेवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. 

MNS : मनसेचं मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरासमोर आंदोलन, भाविकांनी दिलेल्या देणगीचा गैरव्यवहार केल्याचा मनसेचा आरोप

MNS :  सिद्धिविनायक मंदिरातील कथित आर्थिक व्यवहाराचा आरोप करत मनसे आक्रमक झाली आहे. आगर बाजार ते सिद्धिविनायक मंदिर मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते  मोर्चा काढण्यात आला.  सिद्धिविनायक मंदिरात भाविकांनी देणगी स्वरूपात दिलेल्या पैशांचा गैरव्यवहार केल्याचा मनसेचा आरोप आहे.  कोरोना काळात शिवभोजन थाळी त्यासोबतच मुख्यमंत्री सहाय्यता निधी व इतर ठिकाणी सिद्धिविनायक मंदिराने दिलेल्या पैशात गैरव्यवहार झाल्याचा आरोप मनसेने केला आहे. या सगळ्या व्यवहाराची चौकशी मनसेने केली असून या विरोधात आज सिद्धिविनायक मंदिर परिसरात मोर्चा काढण्यात आला

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील किमान तापमानात घट, मुंबईतील पारा 19.6 अंश सेल्सिअसवर 

Maharashtra Temperature : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील किमान तापमानात घट 


औरंगाबाद 10.2 अंश सेल्सिअस तर पुणे 11.5 अंश सेल्सिअस 


नागपुरातील किमान पारा 12.9 अंश सेल्सिअसवर तर नाशिकात 13 अंश सेल्सिअसची नोंद 


मराठवाडा आणि विदर्भातील पारा सरासरी 11 ते 14 अंश सेल्सिअसमध्ये 


मुंबईतील किमान तापमानात देखील घट, मुंबईतील पारा 19.6 अंश सेल्सिअसवर 


मागील आठवड्यात मुंबईतील किमान तापमान सरासरी 24 अंश सेल्सिअस, मात्र मागील दोन दिवसांपासून पुन्हा घट दिसण्यास सुरुवात 


ख्रिसमसनंतर मुंबईत हिवाळा जाणवणार, सोबतच उर्वरित महाराष्ट्रात देखील तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज

बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर ट्रक आणि क्रॅश बॅरियारचा अपघात, चालक जखमी

Buldhana News : बुलढाण्यात मध्यरात्री समृद्धी महामार्गावर अपघात झाला. चैनेग नं. 330.7 वरील मुंबई कॉरिडॉरवर आयशर D D 01 F 9657 जमशेदपूरहून भिवंडीकडे जात असताना क्रॅश बॅरियारला धडकला. या अपघातात चालक जखमी झाला असून त्याच्यावर मेहकर इथल्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी तिथे पोहोचून क्रेनच्या मदतीने ते रोडच्या बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली.

नंदुरबारच्या शहादा शहरातील सुपोषघंट मंदिरात चोरी, दानपेठ्या फोडून अडीच ते तीन लाखांचा मुद्देमाल लंपास

Nandurbar News : शहादा शहारातील डोंगरगाव रस्त्यावरील सुघोषाघंट मंदिरात धाडसी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या मंदिरात एकूण आठ दान पेट्या होत्या त्यातील मंदिराच्या वरच्या गाभाऱ्यातील सात दानपेट्या उचलून मंदिराच्या मागील वोट्यावर फोडल्या तर एक मुख्य दानपेटी जागीच फोडल्याची घटना घडली आहे. या दानपेट्यांमध्ये अंदाजित रक्कम अडीच लाखाच्या आसपास असावी असा अंदाज व्यक्त होत आहे. ही घटना डोंगरगाव रोडवरील मुख्य रस्त्याला लागून घडल्याने आश्चर्य होत आहे. विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत तर रस्त्याच्या कडेला देखील सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत तर चोरांच्या तपास कसा लागेल असे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे आहे.

Pune News : मांजरीत पोलिस रात्री रस्त्यावर, दहशत पसरवणाऱ्या गुंडाची धरपकड सुरू

Pune News : अजित पवारांनी पुण्यातील हडपसर भागातील कोयता गँगचा प्रश्न  विधानसभेत मांडला आहे. हातात कोयता घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. गुंडांना मोक्का लावा, तडीपार करा मात्र दहशत मोडून काढा असा सवाल त्यांनी विधानसभेत उपस्थित केला.  त्यानंतर काल रात्री मांजरीत पोलिस रात्री रस्त्यावर उतरले आणि गुंडाची धरपकड सुरू केली. पुण्याचे नवीन पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्यासमोर कोयता गँगची दहशत मोडून काढण्याचं आव्हान असणार आहे...

पीकविम्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा चिखलीत ठिय्या आंदोलन

पीकविम्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा चिखलीत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.  शेतकऱ्यांनी काढलेला पीकविमा मंजूर झाला. परंतु खात्यावर तुटपुंजी रक्कम जमा झाली.  विमा कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन  करणार 

Ahmadnagar Protest:  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आक्रमक पवित्रा, जलसमाधी आंदोलन करणार

Ahmadnagar Protest:  अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या अनेक शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही.. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आक्रमक पवित्रा घेत जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिलाय.. अहमदनगरच्या राहुरी तालुक्यातील मुळा धरणात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते जलसमाधी आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाला ठाकरे गटानं देखील पाठिंबा दर्शवलाय.. 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. याबरोबरच माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांच्या जामीनावर आज हायकोर्टात पुन्हा सुनावणी होणार आहे. तर अहमदनगरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं जलसमाधी आंदोलन होणार आहे.  यासह आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या खालीलप्रमाणे. 


हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस
 
हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी अकरा मोर्चे निघणार असून त्यामध्ये लव जिहाद विरोधी कायद्याच्या मागणीसाठी हिंदू जनजागृती समितीकडून मोर्चा काढला जाणार आहे.  तर मुस्लिम आरक्षण व इतर मागण्यांसाठी एमआयएम पक्षाकडूनही मोर्चा काढला जाणार आहे. याशिवाय इतर नऊ छोटे मोर्चेही असणार आहेत


अहमदनगरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं जलसमाधी आंदोलन


अहमदनगर जिल्ह्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई नाही. त्यामुळे, स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. राहुरी तालुक्यातील मुळा धरणात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते जलसमाधी घेऊन आंदोलन करणार आहेत. जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह शिवसेना - ठाकरे गटही आंदोलन करणार आहे.  


 अनिल देशमुखांच्या जामीनावर आज हायकोर्टात पुन्हा सुनावणी


22 डिसेंबरपर्यंत जामीनाला दिलेली स्थगिती वाढवण्यासाठी सीबीआयची हायकोर्टात याचिका. सीबीआयनं या निकालाला सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या आव्हानावर जानेवारीत सुनावणी होणं अपेक्षित आहे. सर्वोच्च न्यायालयात यंदा सुट्टीकालीन कोर्ट उपलब्ध नसल्यानं 3 जानेवारीपर्यंत स्थगिती वाढवण्याची सीबीआयकडून विनंती करण्यात आली आहे. त्यावर अनिल देशमुखांना जामीन देणा-या न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्यापुढे सकाळी सुनावणी होईल. 


मुंबईत सिद्धीविनायक मंदीर येथे मनसे आंदोलन करणार


मनसे कडून सिद्धीविनायक मंदीर येथे आंदोलन करण्यात येणार आहे.. सिद्धीविनायक मंदिरातील आर्थिक गैरव्यवहार थांबविण्याकरीता समिती अध्यक्ष व इतर अधिकाऱ्यांना श्रींनी सद्बुद्धी द्यावे म्हणून आंदोलन करण्यात येईल. सकाळी 9.30 वाजता  सिद्धिविनायक येथे दर्शन घेऊन हे आंदोलन सुरू केले जाईल.  


मुंबईत टाटा मुंबई मॅरेथॉनच्या मर्चन्डाइसचं अनावरण
 
टाटा मुंबई मॅरेथॉनच्या मर्चन्डाइसचं अनावरण आज पार पडणार आहे. क्रिकेटपटू प्रसिदा क्रिष्णा आणि स्क्वॉश खेळाडू जोस्ना चिन्नप्पा यांच्या उपस्थिती अॅसिस इंडियाच्या स्टोअरमध्ये कार्यक्रम पार पडेल. 


अर्बन आर्ट फेस्टिव्हलला आजपासून सुरुवात


मुंबई अर्बन आर्ट फेस्टिव्हलला आजपासून सुरुवात होते आहे. चित्रकला, भित्तीचित्रे आणि शिल्पेचे हे प्रदर्शन असेल. अनेक दिग्गज चित्रकार आणि कलाकारांची कला येथे बघायला मिळेल. 


 अदर पुनावाला यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांच्या अटकेची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी


 कोरोना लसीमुळे झालेल्या दुष्परिणामांमुळे देशातील जनतेला झालेल्या त्रासाबद्दल सिरम इन्स्टीट्युटचे अदर पुनावाला यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांच्या अटकेची मागणी करणा-या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी. सर्व लसबाधितांना नुकसान भरपाई देण्याचीही मागणी करणा-या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी. 


 कुपोषणाच्या गंभीर समस्येबाबत विविध जनहित याचिकांवर सुनावणी


राज्यातील कुपोषणाच्या गंभीर समस्येबाबत हायकोर्टात दाखल विविध जनहित याचिकांवर सुनावणी होणार आहे. 
 
सोलापुरात ज्योती क्रांती संघटनेतर्फे आंदोलन 


 राज्यात अनेक ठिकाणी गर्भलिंग निदान होत आहे. त्यामुळे सामाजिक प्रश्न निर्माण झाले आहे. सोलापुरातील अनेक मुलांना लग्नासाठी मुलीच मिळत नाहीयेत. गर्भलिंग निदान कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी सोलापुरात ज्योती क्रांती संघटनेतर्फे अनोखे आंदोलन करण्यात येणार आहे. विवाह इच्छुक असलेल्या तरुणांना नवरदेवाच्या वेशात मोर्चा काढण्यात येनार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा जाणार आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.