Maharashtra News Updates 21 January 2023 : शेतकऱ्यांच्या खात्यावरून परस्पर पैसे उचलल्याप्रकरणी बीड शाखा अधिकाऱ्यांसह लेखपाल आणि तपासणीस निलंबित

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 21 Jan 2023 05:01 PM
Beed: शेतकऱ्यांच्या खात्यावरून परस्पर पैसे उचलल्याप्रकरणी शाखा अधिकाऱ्यांसह लेखपाल आणि तपासणीस निलंबित

बीड जिल्ह्यातील चौसाळा येथील डीसीसी बँकेतून 12 शेतकऱ्यांच्या खात्यावरून परस्पर पैसे उचलणाऱ्या शाखा अधिकारी, लेखपाल आणि तपासणीस या तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळाला होता आणि याच शेतकऱ्यांच्या खात्यावरून प्रत्येकी 50 हजार रुपये या कर्मचाऱ्यांनी संगनमत करून परस्पर उचलले होते. या प्रकरणी बीडच्या जिल्हा उपनिबंधकांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर या तीन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

पालघर : डॉक्टर मारहाण प्रकरणी पालघरच्या मनसे ग्रामीण जिल्हा अध्यक्षाला अटक
बोईसरमधील शिंदे हॉस्पिटलचे डॉक्टर स्वप्निल शिंदे यांना जबर मारहाण केल्याप्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पालघर ग्रामीणचे मनसे जिल्हाध्यक्ष समीर मोरे यांच्यासह नऊ जणांना बोईसर पोलिसांनी अटक केली आहे . स्वप्निल शिंदे यांना रुग्णालयात जाऊन मनसे जिल्हाध्यक्ष आणि काही कार्यकर्त्यांनी जबर मारहाण केली होती यात त्यांच्या डोक्याला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली होती .मारहाण झालेले स्वप्निल शिंदे यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर वापी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत . स्वप्निल शिंदे यांना झालेल्या मारहाणीनंतर मनसे आणि भाजपा आमने सामने आलेली पाहायला मिळाली . त्यातच बोईसर मधील डॉक्टर्स असोसिएशनने आक्रमक पवित्रा घेतल्याने पोलिसांकडून गंभीर स्वरूपाचे कलम लावण्यात आले असून या प्रकरणाचा तपास सध्या बोईसर पोलीस करत आहेत. 
शिवाजीनगर स्थानकात कामामुळे 22 जानेवारीला गाड्या रद्द होणार
पुणे विभागातील शिवाजीनगर स्थानकावर ट्रॅफिक ब्लॉक घेऊन विविध तांत्रिक कामे करण्यात येणार असून, त्यामुळे रविवार, 22 जानेवारी रोजी गाडी क्रमांक 11007/11008 पुणे-मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस रद्द राहणार आहे.
पीक विम्याच्या मुद्द्यावरुन हिंगोली जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, गोरेगाव-जिंतूर महामार्गावर जाळपोळ

Swabhimani Shetkari Sanghatana : पीक विम्याच्या मुद्द्यावरुन हिंगोली जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. पिक विमा परतावा मिळावा यासाठी जिल्ह्यातील गोरेगाव इथे उपोषण सुरू आहे. आज चौथा दिवस असूनही प्रशासनाने अद्याप या उपोषणाची दखल घेतली नाही. उपोषणकर्त्यांची तब्येत खालावत चालल्यामुळं संतप्त शेतकऱ्यांनी आज सकाळी गोरेगाव-जिंतूर महामार्गावर जाळपोळ केली. टायर पेटवून देत शेतकऱ्यांनी प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.

साखर कारखान्यांनी इथेनॉलसह CNG हायड्रोजन उत्पादनाचा विचार करावा, शरद पवारांचा कारखानदारांना सल्ला

Sharad Pawar : भविष्यात साखर कारखान्यांना (Sugar factory) सक्षम होण्यासाठी साखरे व्यतिरीक्त इतर उपपदार्थावर लक्ष केंद्रीत करावं लागणार असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं. सध्या देशात साखरेचं (Sugar) मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत आहे. मागणीपेक्षा जास्त साखर उत्पादीत केली जात आहे. त्यामुळं साखरेला किफायतीश दर मिळत नाही, याचा आर्थिक ताण साखर कारखान्यांना सहन करावा लागतो असेही पवार म्हणाले. कारखान्यांनी सीएनजी आणि हायड्रोजन उत्पादनाचा विचार करावा, असा सल्ला शरद पवारांनी साखर कारखानदारांना दिला.

INS Vagir : भारतीय नौदलाची 'सायलेंट किलर शार्क', 'आयएनएस वागीर' ताफ्यात दाखल होणार, 'ही' आहे खासियत

INS Vagir Submarine Indian Navy : भारतीय नौदलाची (Indian Navy) ताकद आणखी वाढणार आहे. नौदलाच्या ताफ्यामध्ये सोमवारी 23 जानेवारीला 'आयएनएस वागीर' (INS Vagir) पानबुडी (Submarine) सामील होणार आहे. मुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (Mazagon Dock Shipbuilders) या स्वदेशी कंपनीने या पाणबुडीची निर्मिती केली आहे. ही नौदलाच्या ताफ्यातील कलावरी श्रेणीतील पाचवी पाणबुडी आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Ratnagiri News: रत्नागिरीतल्या खेड तालुक्यातील लोटे परशुराम एमआयडीसी परिसरात असलेल्या जंगलाला आग

Ratnagiri News: रत्नागिरीतल्या खेड तालुक्यातील लोटे परशुराम एमआयडीसी परिसरात असलेल्या जंगलाला आग लागल्याची घटना घडलीय. संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तीधाम सेवा संस्थान गोशाळाजवळच ही आग लागलीय. या आगीत संपूर्ण जंगल जळू खाक झालंय. त्यामुळे गाईंच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे गोशाळा चालकांसमोर मोठा प्रश्न उभा ठाकलाय. 

Dhule News: खानदेशातील साहित्य संमेलनानिमित्त निघाली धुळे शहरातून ग्रंथ दिंडी

Dhule News: खानदेश साहित्य संघ धुळे आयोजित दोन दिवसीय अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात होत आहे या साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील गांधी पुतळा ते कैलासवासी चुडामण पाटील साहित्यनगरी हिरे भवन इथपर्यंत भव्य ग्रंथ दिंडी काढण्यात आली या ग्रंथ दिंडीचे माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या हस्ते सपत्नीक ग्रंथाचे पूजन करून उद्घाटन करण्यात आले, यावेळी धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्यासह माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील तसेच धुळे जळगाव नंदुरबार येथून आलेले अहिराणी भाषेचे साहित्यिक अभ्यासक रसिक आणि धुळेकर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या ग्रंथदिंडीत खानदेशातील संस्कृती परंपरा यांचे दर्शन घडविण्यात आले यात कानबाई गुलाबाई तगतराव तसेच लग्न परंपरा यांचे सजीव देखावे साकारण्यात आले होते, यात खानदेशी 12 पावली नृत्य तसेच महिलांनी फुगडी खेळत ग्रंथदिंडीत सहभागी झाल्या होत्या, अहिराणी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने निघालेल्या ग्रंथदिंडीत धुळे ग्रामसे आमदार कुणाल पाटील यांनी देखील ढोल ताशांच्या तालावर ठेका धरत धुळेकर नागरिकांचे लक्ष वेधून घेतलं आहे. 

Accident : ट्रक चालकाला डूलकी आल्यामुळं समृद्धी महामार्गावर अपघात, तीन जण जखमी

Accident : नागपूर शिर्डी समृद्धी महामार्गावर वाशिमच्या कारंजा शहराजवळ आज सकाळी ट्रकचा अपघात झाल्याची घटना घडली. सकाळी साडेसहा वाजता ही घटना घडली. यामध्ये तीन जण जखमी झाले आहेत. नागपूर वरुन मुंबईला जात असताना ट्रक चालकाला डुलकी आल्यामुळं ट्रक समृद्धी हायवेच्या कडेला जाऊन पडली.  रईस अन्सारी  (वय 27) सद्दाम अन्सारी (वय 35) गफान अन्सारी (वय 18) हे सर्व झारखंड येथील आहे. जखमी रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे दाखल केले.

Sangli News: राजकीय पक्ष, संघटनाच्या बंदला पाठिंबा राहणार पण 12 पर्यंतच; इस्लामपूर शहरातील व्यापारी महासंघाच्या निर्णयाची चर्चा

Sangli News: सध्या  उठसुठ शहर बंदची हाक  देण्याचे प्रमाण सर्वत्र वाढले आहे. एखादी अप्रिय घटना असो किंवा वादग्रस्त बाब असो किंवा अन्य काही घटना घडल्या की लगेच एखाद्या संघटनेकडून मग शहर बंदची हाक दिली जाते. या सततच्या बंदला कंटाळूनच सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहरातील व्यापारी महासंघाने  एक निर्णय घेतलाय ज्याची सध्या चर्चा होत आहे. तो निर्णय म्हणजे इस्लामपूर मधील व्यापारी महासंघ यापुढे शहरात कोणत्याही पक्षाचा, संघटनेचा किंवा कुणाचाही कोणत्याही विषयावरुन बंद असला तरी व्यापारी त्या बंदमध्ये फक्त 12 वाजेपर्यंतच सहभागी होतील, 12 नंतर मात्र व्यापारी आपापले व्यवसाय सुरू करतील. या निर्णयाबाबतच्या आशयाचे फलक ही इस्लामपूर  शहरात  व्यापारी महासंघाच्या वतीने लावण्यात आले आहेत.शहर बंदची हाक देण्यावरुन सतत बाजारपेठा बंद करण्याची वेळ येत असल्याने  एखाद्या शहरातील व्यापारी संघटनेने असा निर्णय घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Buldhana News: गरोदर महिलांच्या काळजी बाबत सरकार उदासीन, गर्भपाताच प्रमाण 10% नं वाढलं

Buldhana News: बुलढाणा हा मातृजिल्हा म्हणून ओळखला जातो , गेल्या दहा वर्षात या जिल्ह्यात मुलगा आणि मुलगी यातील जन्मदराची दरी ही 855 वरून कमी होऊन 939 इतकी कमी झाल्याने समाधान व्यक्त करत असतानाच आता गेल्या एक वर्षात म्हणजे 2022 मध्ये 3350 महिलांचा गर्भपात झाला किंवा केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे मुलगा आणि मुलगी यातील दरी आणि यांच्या जन्मदराचे प्रमाण वाढतं की काय अशी भीती व्यक्त होत आहे. गेल्या नऊ महिन्यात बारा आठवड्यांपर्यंत 3216 तर बारा आठवड्यांपेक्षा अधिक 134 महिलांचा गर्भपात विविध कारणांमुळे करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिली आहे. गर्भपाताच्या या प्रमाणामुळे मात्र आता अनेक शंका कुशंका निर्माण होताना दिसत आहेत , जर या सर्व कायदेशीर गर्भपाताच प्रमाण इतकं मोठं असेल तर शासन गरोदर महिलांच्या आरोग्यावर कोट्यवधी रुपये खर्च करत तर प्रशासन त्या महिलांची काळजी घेतंय का...? त्यांच्या गर्भपाताच्या कारणांच्या नोंदी घेतल्या गेल्याय का..? शासकीय स्तरावर हे सर्व गर्भपात वैदयकीय दृष्ट्या वैद्यकीय कारणांमुळे आहेत की अजून काही..? हे सर्व प्रश्न आगामी काळात बाहेर येणे गरजेचे आहे, अन्यथा पुन्हा स्त्री जन्मदर घटण्याची भीती आता तज्ज्ञ व्यक्त करताना दिसत आहेत.

Mumbai News: विना परवानगी कूपनलिका खोदल्यास कठोर कायदेशीर कारवाई

Mumbai News: मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील पाणीपुरवठ्यासाठी गुंदवलीपासून भांडुप संकुल जल शुद्धीकरण केंद्रापर्यंत तलावातील पाणी वाहून नेण्यासाठी भूमिगत जल बोगद्याची व्यवस्था केली आहे. 


तसेच, भांडुप संकुल येथून शहर आणि उपनगरातील विविध सेवा जलाशयापर्यंत व सेवाजलाशयापासून ग्राहकांना पाणीपुरवठा करण्यासाठी भूमिगत जलबोगद्याचे जाळे उभारले आहे. 


मागील काही वर्षात विंधन विहिरी/कूपनलिका खोदताना भूमिगत जलबोगद्यास हानी पोहचून दुर्घटना घडलेल्या आहेत. अशा घटनांमुळे पाणीपुरवठा बऱ्याच कालावधीकरीता विस्कळीत होतो आणि नागरिकांना यामुळे त्रास सहन करावा लागतो.


अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत सर्वांना आवाहन करण्यात येते की, मुंबई व ठाणे जिल्ह्यातील सर्व रहिवाशी/बांधकाम व्यावसायिक/विकासक/सार्वजनिक संस्था/विंधन विहिरी खणणारे कंत्राटदार/विंधन विहिरी खणण्यासाठी यंत्र सामुग्री उपलब्ध करुन देणारे कंत्राटदार आणि इतर सर्व नागरिकांनी वैयक्तिक अथवा सार्वजनिक कूपनलिका खोदण्यापूर्वी बृहन्मुंबई महानगरपालिका/ठाणे महानगरपालिका यांचेकडे असणारी कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण करुन परवानगी घेणे बंधनकारक आहे. तसेच विनापरवानगी कूपनलिका खोदल्याने होणाऱ्या दुर्घटनेसाठी संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे कळविण्यात येत आहे.

Mumbai News: मुंबईच्या वर्सोवा येथे तीन दिवसीय कोळी सी फूड फेस्टिवलला सुरुवात

Mumbai News: मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडील वर्सोवा भागात कोळी समाजाकडून "कोळी सी फूड फेस्टिवलचे" आयोजन करण्यात आले आहे.वीकेंडला तीन दिवस चालणाऱ्या या फूड फेस्टिवलचे उद्घाटन शिक्षण महर्षी अजय कौल सर यांच्या हस्ते करण्यात आले. या महोत्सवात खाद्य प्रेमींसाठी ताज्या ताज्या मासळी सोबतच कर्णमधूर कोळीगीतांचा आस्वाद देखील घेता येणार आहे. हा कोळी फूड फेस्टिवल 20 जानेवारी ते 22 जानेवारी असा तीन दिवस चालणार आहे.वर्सोवा येथील गणेश मंदिर शेजारील मैदानावर हा महोत्सव सुरू करण्यात आला आहे. तब्बल दोन वर्ष राज्यामध्ये कोरोनाच्या सावट असल्यामुळे वर्सोवा गावात कोळी सी फूड फेस्टिवलचा आयोजन करता आला नव्हता मात्र यावर्षी राज्यामध्ये निर्बंध मुक्त झाल्यामुळे पुन्हा मोठा उत्साहाने कोळी सी फूड फेस्टिवलचा आयोजन वर्सोवा गावंमध्ये करण्यात आला आहे. 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


दिवसभरात काय काय होणार आहे, हे जाणून घेण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते... राजकीय, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रासह इतर क्षेत्रात दिवसभरात काय काय महत्वाच्या घडामोडी घडणार आहेत, याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यातील एका कार्यक्रमात एकाच मंचावर असणार आहेत. दोघांच्या भाषणाकडे पुणेकरांचं लक्ष लागलेय. त्याशिवाय आज वर्षातील पहिलीच शनी अमावस्या आहे. तर मुंबईतील गोखले ब्रिजसाठी पश्चिम रोल्वेवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.. पाहूयात आज दिवसभरात कोणत्या घडामोडी घडणार आहेत.... 







शरद पवार आणि एकनाथ शिंदे एकाच मंचावर 






पुणे – वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 46 वी सर्वसाधारण सभा आज पुण्याजवळील मांजरी इथल्या संस्थेच्या आवारात सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आलीय... या सभेला संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सहकारमंत्री अतुल सावे, विरोधी पक्ष नेते अजित पवार, संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्यासह राज्याच्या साखर उद्योगातील नेते हजेरी लावणार आहेत. यावेळी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटतर्फे 2021 - 2022 या वर्षासाठी सर्वोत्कृष्ट कार्यक्षमतेसाठी दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. राज्याच्या साखर उद्योगात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही मध्यवर्ती संस्था म्हणून काम करते.


वर्षातील पहिली शनी अमावस्या 




 



अहमदनगर  - 2023 या वर्षातील पहिली शनी अमावस्या आज आहे. या दिवशी पौष महिन्यातील मौनी अमावस्याही असेल. पौष महिन्यातील शनिवारी अमावस्येचा योग विशेष मानला जातो. अमावस्यामुळं मध्यरात्रीपासूनच भाविक दर्शनासाठी गर्दी करतात.  


गोखले ब्रिजसाठी पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक 
 
मुंबई - अंधेरी येथील गोखले ब्रिजच्या पाडकामासाठी पश्चिम रेल्वेवर दोन रात्री मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे... 21 आणि 22 च्या रात्री तसेच 24 आणि 25 च्या मध्यरात्री साडेचार तासांचे हे मेगाब्लॉक असणार आहेत. यामुळे पश्चिम रेल्वे वरील काही लोकल आणि एक्सप्रेस गाड्या या रद्द करण्यात आलेल्या आहेत... तसेच काहींच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आलेला आहे... गोखले ब्रिज काढून त्या जागी लवकरात लवकर नवीन ब्रिज तयार करण्यासाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात येत आहेत. 


चिंचवड पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरद पवारांना भेटणार 


पुणे - कसबा पेठ आणि चिंचवड या दोन्ही विधानसभांची पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही हे आता निश्चित झालय... चिंचवड विधानसभेची निवडणुक लढण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा एकमुखाने निर्णय झाला असून निवडणूक लढवावी यासाठी पिंपरी-चिंचवडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधीकारी शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यांना सकाळी मांजरी इथे जाऊन भेटणार आहेत...


साने खून प्रकरणातील दोन्ही आरोपींची कोठडी संपणार -
मुंबई -  एमबीबीएस 22 वर्षीय विद्यार्थीनी सदिच्छा साने खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना शनिवारी न्यायलायत हजार करणार आहेत... या दोन्ही आरोपीने जबाबात कबुली दिली की त्यांनी साने या मुलीला मारून तिला समुद्रात फेकले आहे... या आरोपीना मुंबई गुन्हे शाखाने अटक करून ते 21 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडीत होते... त्यांची कोठडी संपत असून पोलिस आणखी कोठडीची मागणी करण्याची शक्यता.


ठाणे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे सकाळी 8 वाजता ठाण्यात येत आहेत... यावेळी ते जैन मंदिराला भेट देणार आहेत. 


किरीट सोमय्या यांची पत्रकार परिषद -
मुंबई – भाजप नेते किरीट सोमय्या आज सकाळी 11 वाजता मुंलुंडच्या घरी पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यात ते आणखी एका नेत्याच्या भ्रष्टाचाराचे कागदपत्रे समोर आणणार आहेत. त्यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे.  


ब्रिजभुषण सिंह यांची चौकशी -
दिल्ली – भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभुषण सिंह यांच्या विरोधात लावलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी इंडियन ऑलिंम्पिक असोसिएशननं सात सदस्याची चौकशी समिती स्थापन केली आहेय  या समितीत मेरी कोम, योगेश्वर दत्त, डोला बॅनर्जी, अलकनंदा अशोक, सहदेव यादव आणि दोन विकील असतील. आजपासून चौकशीला सुरुवात होणार आहे. 
 


दिल्ली – काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल आणि जयराम रमेश सकाळी 11.30 वाजता काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेणार आहेत. 


भाजपची विजय संकल्प यात्रा -
बेंगलुरू – येत्या काही महिन्यात निवडणुका होणाऱ्या कर्नाटक राज्यात भाजपची विजय संकल्प यात्रा... भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आज या संकल्प यात्रेला हिरवा झेंडा दाखवतील... विजयपुरा मधून सुरू होणारी ही यात्रा पुर्ण राज्यात फिरेल. 


भारत-न्यूझीलंड दुसरा सामना -
रायपुर – न्युझीलंड विरोधात तीन वनडे मॅचच्या सिरीजमधील दुसरी मॅच आज होणार आहे. दुसरा सामना जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. तर बरोबरी करण्यासाठी न्यूझीलंडचा संघ मैदानात उतरले. शुभमन गिल याच्या कामगिरीकडे सरर्वांचं लक्ष असेल. 
 
पुणे - महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि हिंद केसरी अभिजीत कटके यांचा विरोधी पक्ष नते अजित पवार आणि पुणे राष्ट्रवादीकडून संध्याकाळी 5 वाजता सत्कार होणार आहे.


पिंपरी - भोसरीत खासगी हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी शरद पवार आणि चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती आहे. सायंकाळी 4 वाजता कार्यक्रम होणार आहे.
 
मिरजेतील तंतुवाद्यांना जीआय मानांकन मिळणार -
सांगली - ‘तंतुवाद्याचे माहेरघर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिरजेतील तंतुवाद्यांना आता जीआय मानांकन मिळणार आहे. जीआय मानांकन मिळणारा तंतुवाद्य हा देशातील पहिलाच वाद्यप्रकार आहे. यामुळे येथे तयार होणाऱ्या विविध वाद्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःची ओळख मिळणार आहे. येथील वाद्यांची नक्कल आता कोणालाही करता येणार नाही. कॉपीराईटचा हक्क त्यांना प्राप्त होईल. वाद्यांच्या परदेशी निर्यातीला मोठा वाव मिळेल. जीएस म्युझिकल्सचे तंतुवाद्यनिर्माते अलताफ मुल्ला, झाकीर मुल्ला यांनी यासाठी पंतप्रधान कार्यालयापर्यंत पाठपुरावा केला होता.


सांगली - खानापुर गावचे सुपुत्र नायब सुभेदार जयसिंग शंकर भगत लेह लडाख मध्ये शहीद झालेत... त्यांच्यावर त्यांच्या मुळगावी सकाळी 11 वाजता शासकिय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.


परभणी -  अभाविपचे देवगिरी प्रांताचे 57 वे अधिवेशन परभणीत सुरु आहे... अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे...  दुपारी 3 ते 5 दरम्यान भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे आणि 5 वाजता सभा होणार आहे.


नाशिक - प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद... पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत वंचीत बहुजन आघाडीचे रतन बनसोडे याच्या प्रचारार्थ पत्रकार परिषद घेत जाहीरनामा प्रकाशीत करणार आहेत. 


महंत शाम चैतन्य महाराज पत्रकार परिषद 
जळगाव -  येत्या पंचवीस ते तीस जानेवारी दरम्यान जामनेर तालुक्यात गोड्री येथे हिंदू गोर बंजारा समाज कुंभ मेळावा आयोजित करण्यात आला आहे... या मेळाव्यावर बंजारा समाजामधील काही संघटना आणि नेत्यांनी आक्षेप घेतला आहे... आज आयोजन समिती मधील महंत शाम चैतन्य महाराज हे पत्रकार परिषद घेणार आहे... मंत्री गिरीश महाजनही या ठिकाणी दुपारी 12 वाजता पाहणी करणार आहेत 


सहावं अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन 
धुळे - खानदेश साहित्य संघ महाराष्ट्र राज्य धुळे आयोजित सहावं अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन आजपासून दोन दिवस होणार आहे.. या साहित्य संमेलनाचं उद्घाटन होणार असून सकाळी साडेआठ वाजता ग्रंथदिंडी निघणार आहे...  अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनाचे मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून या कार्यक्रमाला इटली येथील हेडलबर्ग युनिव्हर्सिटी मधील खानदेश साहित्य संस्कृतीच्या अभ्यासक अलीचे डिफ्लोरियान यांची विशेष उपस्थिती असणार आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.