Maharashtra News Updates 20 October 2022 : 40 हजारांची लाच घेताना उस्मानाबादेत अधिकारी अटकेत, ACB ची कारवाई 

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 20 Oct 2022 10:16 PM
दिवाळी पूर्वी एफडीएचे अनेक ठिकाणी छापे, 20 लाखांहून अधिक किमतीची मिठाई जप्त

दिवाळी पूर्वी एफडीएचे अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. एफडीएने मुंबईच्या चेंबूर मानखुर्द लिंक रोड , चेंबूर छेडा नगर भागातील मिठाईच्या दुकानावर छापा टाकत केली धडक कारवाई केली आहे. या कारवाईत जवळपास  20 लाखांहून अधिक किमतीची मिठाई जप्त केली आहे.

IPS Transfer : उपायुक्त नुरूल हसन यांची वर्धा पोलिस अधिक्षक म्हणून बदली

Nagpur News : नागपूर पोलिस दलात तरुण आणि तडफदार उपायुक्त म्हणून प्रसिद्ध, झोन चारचे उपायुक्त नुरुल हसन यांची वर्धा येथे पोलिस अधिक्षक म्हणून बदली झाली आहे. गुरुवारी सायंकाळी या संदर्भात परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

IPS Transfer : लोहमार्ग पोलिस अधिक्षक एम.राजकुमार यांची जळगाव पोलिस अधिक्षकपदी बदली

Nagpur News : नागपूर लोहमार्ग पोलिस अधिक्षक एम. राजकुमार यांची जळगाव येथे पोलिस अधिक्षकपदी बदली झाली आहे. गुरुवारी सायंकाळी या संदर्भात परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

IPS Transfer : पोलिस अधिक्षक राकेश ओला यांची अहमदनगरला बदली

Nagpur News : नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधिक्षक राकेश ओला यांची अहमदनगर पोलिस अधिक्षकपदी बदली झाली आहे. गुरुवारी सायंकाळी या संदर्भात परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

IPS Transfer : उपायुक्त बसवराज तेली यांची पोलिस अधिक्षक सांगली पदी बदली

Nagpur News : विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त बसवराज तेली यांची सांगलीचे पोलिस अधिक्षकपदी बदली झाली आहे. गुरुवारी सायंकाळी या संदर्भात परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

IPS Transfer : नागपूर ग्रामीणच्या पोलिस अधिक्षकपदी सिंगुरी विशाल आनंद

Nagpur News : राज्यपाल यांचे परिसहायक सिंगुरी विशाल आनंद यांची नागपूर ग्रामीणच्या अधिक्षकपदी बदली झाली आहे. गुरुवारी सायंकाळी या संदर्भात परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

IPS Transfer : ठाण्याचे पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांची नागपूर पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य म्हणून बदली

Nagpur News : ठाणे शहर येथील पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांची नागपूर पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य म्हणून बदली झाली आहे. गुरुवारी सायंकाळी या संदर्भात परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

IPS Transfer : श्रीकांत परोपकारी यांची ठाणे शहर पोलिस उपायुक्त म्हणून बदली

Nagpur News : पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य श्रीकांत परोपकारी यांची ठाणे शहर पोलिस उपायुक्तपदी बदली झाली आहे. गुरुवारी सायंकाळी या संदर्भात परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

IPS Transfer : वाहतूक शाखेचे उपायुक्त सारंग आव्हाड यांची बुलढाण्याचे पोलिस अधिक्षक म्हणून बदली

Nagpur News : नागपूर पोलिस दलात वाहतूक शाखेचे उपायुक्त म्हणून जबाबदारी सांभाळत असलेले उपायुक्त सारंग आव्हाड यांची बुलढाण्याचे अधिक्षक म्हणून बदली झाली आहे. गुरुवारी सायंकाळी या संदर्भात परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

नेरळ - माथेरान मिनी ट्रेन सर्व्हिस पुन्हा सुरू होणार 

नेरळ - माथेरान मिनी ट्रेन सर्व्हिस पुन्हा सुरू होणार 


मध्य रेल्वेचे पर्यटकांना मोठे गिफ्ट, 22 तारखेपासून सुरू होणार रोजच्या फेऱ्या 


ऑगस्ट 2019 पासून बंद होती नेरळ माथेरान मिनी ट्रेन 


प्रचंड पावसामुळे घाटातील ट्रॅक पूर्णतः वाहून गेले होते, जमीन उरली नव्हती, त्यामुळे संपूर्ण मार्ग पुन्हा नव्याने बांधावा लागला, 


नेरळ ते माथेरान 2 आणि माथेरान ते नेरळ 2 अश्या 4 फेऱ्या दिवसभरात चालणार, 


तर अमन लॉज ते माथेरान दरम्यान दिवसाला 12 फेऱ्या चालणार, 


आज मध्य रेल्वेचे महाप्रबंधक यांनी जाऊन पाहणी केल्या नंतर दिला हिरवा कंदील

गुजरात बर्फीचा ५ लाख ९० हजार रुपयांचा साठा जप्त

पुणे : अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्यावतीने पुणे शहरातील विविध मिठाईच्या दुकानांनी मागवलेला 5 लाख 90 हजार 400 रुपये किंमतीचा गुजरात बर्फीचा साठा जप्त केला आहे.


अन्न व औषध प्रशासन पुणे कार्यालयाने मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने सोमवारी (ता. 17) रोजी  अशोक राजाराम चौधरी यांच्या वाहनातून गुजरात बर्फी - स्वीट हलवा (व्हानवटी), रिच स्वीट डिलाईट (ब्रिजवासी), स्वीट हलवा (ब्रिजवासी), स्वीट हलवा (पारस), स्पेशल बर्फी व स्वीट हलवा या अन्न पदार्थाचे 6 नमुने तपासणीसाठी घेवून हा साठा जप्त केला.


हा गुजरात बर्फी अन्न पदार्थ पुणे शहरातील मे. अग्रवाल स्वीट मार्ट, बुधवार पेठ, मंडई, मे. कृष्णा डेअरी फार्म, मानसरोवर अॅनेक्स, कोंढवा बु., मे. अशोक राजाराम चौधरी, गहुंजे, देहुरोड व हिरसिंग रामसिंग पुरोहित, बालेवाडी यांनी गुजरात व वसई  येथून मागविला असल्याचे आढळून आले. या विक्रेत्याकडे त्यांनी मागवलेल्या गुजरात बर्फीचा वापर कशासाठी करण्यात येत होता याबाबत अधिक तपास करून त्याअनुषंगाने संबंधितांविरुद्ध नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे.

 30 जून पर्यंतचे राजकीय, सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेणार, राज्य सरकारचा निर्णय

राजकीय आणि सामाजिक आंदोलनातील 30 जून 2022 पर्यंतचे सर्व खटले आता मागे घेण्याचा निर्णय एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यापूर्वी हे खटले मागे घेण्यासाठी 31 मार्च 2022 ची कालमर्यादा होती.  ती आता 30 जूनपर्यंत वाढविण्यात आली असून 5 लाखापेक्षा जास्त नुकसान न झालेल्या तसेच जिवीतहानी न झालेले खटले मागे घेण्याची कार्यवाही केली जाईल.  यासंदर्भात शासन निर्णयातील इतर सर्व अटी, शर्ती, तरतुदी कायम ठेवण्यात आलेल्या आहेत.

नांदेड जिल्ह्यातील बाजारपेठा नागरिकांच्या दिवाळसणाच्या खरेदीच्या लगबगीने फुलल्या.

तब्बल दोन वर्षांच्या प्रदीर्घ कालावधी नंतर दिवाळसण हा पहिल्यांदाच निर्बंध मुक्त वातावरणात साजरा होत असल्यामुळे सामान्य नागरिकांत उत्साहाचे वातावरण आहे.दरम्यान कोरोना महामारीमुळे दोन वर्षे बाजारपेठा बंद असल्यामुळे व्यावसायिकांचे व्यवसाय डबघाईला आले होते.आणि यावर्षी निर्बंध मुक्त वातावरणात दिवाळी साजरी होत असताना व्यापारी आणि नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय.


दरम्यान दिवाळीच्या कालावधीत बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची मोठी रेलचेल बाजारपेठेत पाहायला मिळतेय. ज्यात मातीचे दिवे, आकाश कंदील, कानातील बाळी ,रांगोळी विक्रेते या स्थानिक व्यावसायिकांना मोठा रोजगार उपलब्ध झालाय. 
दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच निर्बंधमुक्त वातावरणात दिवाळी साजरी होत असल्याने  खरेदीदार नागरिक हे रंगीबेरंगी खेळणी, मुर्त्या,बांगड्या कंदील,दिवे,पणत्या, कपडा,बूट,ग्रोसरी,मोबाईल, टीव्ही, फ्रीज,कंदील,दिवे,मोटारसायकल ह्या छोट्यामोठ्या वस्तू खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी करताना दिसत आहेत. तर महिला,पुरुष आबालवृद्ध ग्राहक हे  दिवाळीचा फराळ, कपडे, बूट,टीव्ही, मोबाईल खरेदीसाठी स्थानिक बाजारपेठेत मोठी गर्दी करत आहेत.

नांदेड जिल्ह्यात हंगामातील प्रतिकूल परिस्थिती नुसार नुकसानीच्या 25 टक्के आगाऊ पीक विमा मंजूर  

नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सोयाबीन, कापूस, तूर व ज्वारी या पिकांसाठी हंगामातील प्रतिकुल परिस्थिती अधिसूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी लागू केली. या अधिसुचनेद्वारे सर्व महसूल मंडळातील विमाधारक शेतकऱ्यांना पीक नुकसानीच्या प्रमाणात 25 टक्के रक्कम आगाऊ देण्यात येते. त्याअनुषंगाने आज जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीमध्ये विमा कंपनीस दिलेल्या निर्देशानुसार वर नमूद पिकांसाठी विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे विमा कंपनीने मान्य केले. यामुळे नांदेड जिल्ह्यास जवळपास 400 कोटी रुपये नुकसान भरपाई रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

Osmanabad : 40 हजारांची लाच घेताना उस्मानाबादेत अधिकारी अटकेत, ACB ची कारवाई 

उस्मानाबादमध्ये एका अधिकाऱ्याला 40 हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडलं आहे.  कळंब भूमी अभिलेख कार्यालयातील भूमापक प्रशांत अरुणकुमार खरात याला पोलिसांनी अटक केली आहे. तक्रारदार यांनी त्यांच्या वडिलांच्या नावे असलेल्या जमिनीची लवकरात लवकर मोजणी करून हद्द कायम करून नकाशा देण्यासाठी आरोपी लोकसेवक प्रशांत अरुणकुमार खरात याने 50 हजार लाचेची मागणी करुन 40 हजार घेतले.

Amravati : अमरावतीत पुन्हा शस्त्रसाठा जप्त, आरोपी अटकेत

अमरावती येथील कंवर नगर झोपडपट्टी या ठिकाणी राहत असलेल्या इसम राजेश उर्फ सोनू सुभाष चावरे (वय 25 ) याचे घरी पोलीसांनी छापेमारी केली असता त्याच्या घरात विविध आकाराच्या 10 तलवारी तसेच वेगवेगळ्या आकाराचे 9 चाकू/ सुरे अशी एकूण 19 शस्त्रं अवैधरित्या आढळून आली. पोलीस आयुक्त अमरावती शहर यांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली. पोलीसांनी आरोपीला शस्त्रासह ताब्यात घेऊन पुढील कारवाई करिता पोलीस स्टेशन राजापेठ यांच्या स्वाधीन केलं. 

पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात

पुण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. कालपर्यंत पुण्याला यलो अलर्ट जारी करण्यात आलं होतं. त्यामुळे काल रात्रीदेखील मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. मात्र सकाळपासून ढगाळ वातावरण होतं. त्यातच साडे तीनच्य सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे दिवाळी खरेदीसाठी बाहेर पडल्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

CM Eknath Shinde : राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

CM Eknath Shinde : संयुक्त पत्रकार परिषदेत 7 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याची घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे. तसेच, मुख्य विकास बॅंकेचे 964 कोटी ही रक्कम देखील कर्जमाफी शेतकऱ्यांना दिलेली आहे. असे शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचे निर्णय या परिषदेत घेण्यात आले. लवकरच यावर अंमलबजावणी होईल असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. या संयुक्त पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.     

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांचे कट्टर विरोधक संजय घाडीगावकर करणार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश

Maharashtra Politics : सेना भवनात आज ठाण्यातील प्रवेश, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश 


एकनाथ शिंदे यांचे कट्टर विरोधक संजय घाडीगावकर करणार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश 


2019 च्या विधानसभेत घाडीगावकर काँग्रेसकडून एकनाथ शिंदे यांच्या विरोधात लढले होते. मात्र पराभव झाला, त्याआधी नगरसेवक म्हणून पालिकेत निवडून आले होते. 


मुख्यमंत्री यांना शह देण्यासाठी घाडीगावकर यांचा प्रवेश करण्याची रणनीती 


क्लस्टर योजनेतील आणि महापालिकेतील मोठे घोटाळे घाडीगावकर यांनी बाहेर काढले आहेत, त्यांचाच आज प्रवेश होत आहे. 

शेतकऱ्यांच नुकसान पाहण्यासाठी याव की नाही हा ज्या त्या मंत्राचा प्रश्न, मी राजवाडे सोडून शेतकऱ्यांच्या बांधावर आलोय : छत्रपती संभाजीराजे

Beed News : माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आज बीड जिल्ह्यातल्या अतिवृष्टीची पाहणी करून जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांची भेट घेतली आहे. खासदार संभाजीराजे हे पावसामुळे पडलेले सोयाबीन घेऊन जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी अशा सूचना प्रशासनाला केल्या आहेत. 


गेल्या चार दिवसांपासून बीड जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसानं थैमान घातलं आहे. तरीदेखील अद्याप एकही मंत्री आणि बीडचे पालकमंत्री हे नुकसान पाण्यासाठी बीड जिल्ह्यात आले नाहीत, यावर संभाजी राजे यांना विचारलं असता नुकसान पाहणी साठी यावं की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र मी राजवाडे सोडून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा जाणून घेत आहे, असं संभाजी राजे म्हणाले आहेत. 


परतीच्या पावसानं बीड जिल्ह्यात मोठे नुकसान झालं आहे. त्यामुळे एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या विशेष बाबीतून बीड जिल्ह्याच्या शेतकऱ्यांसाठी तात्काळ मदत जाहीर करावी, असं देखील संभाजी राजे म्हणाले आहेत. आणि आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारकडून शेतकऱ्यांना मोठी मदत मिळेल अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे. 

मुंबईत रेशन दुकानांवर आनंदाचा शिधासाठी मुंबईकरांची गर्दी 

मुंबईत रेशन दुकानांवर आनंदाचा शिधासाठी मुंबईकरांची गर्दी 


मात्र, योजनेतील संपूर्ण वस्तु रेशन दुरानांवर उपलब्ध नसल्यानं वाटप रखडले 


रवा, साखर, तेल, डाळ हे 4 पदार्थ 100 रुपयांत देण्याची घोषणा शिंदे-फडणविस सरकारनं केलीय. 


मात्र, अनेक रेशन दुकानांवर अद्याप सर्व वस्तु एकत्रीत उपलब्ध नाहीयेत.


येत्या 2-3 दिवसांत आनंदाचा शिधा लाभार्थ्यांना मिळू शकेल अशी आश्वासन दिले जातेय

जलमय झालेल्या रस्त्यावरुन जाण्याचं धाडस अंगलट, कर्नाटक परिवहन मंडळाची बस अडकली

 


Ahmednagar : अहमदनगर जिल्ह्यात परतीच्या पावसानं धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला आहे. शिर्डीनजीकचा नगर-मनमाड महामार्ग पाण्याखाली गेला आहे. या मार्गावर कर्नाटक-शिर्डी बस अडकली आहे.  ही बस कर्नाटक परिवहन मंडळाची आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या ओढ्याला पूर आला आहे. पाण्यातून जाण्याचं धाडस अंगलट आलं आहे. जवळपास एक तास बसमध्ये अडकले होते प्रवासी. स्थानिक नागरिकांनी ट्रक्टरच्या सहाय्याने बस सुखरूप बाहेर काढली आहे. अनेक वाहनधारक पाण्यातून जीवघेणा प्रवास करत आहेत. अद्याप स्थानिक प्रशासनाकडून उपाययोजना नाहीत.

ठाण्यात दूध विक्रेत्यांचा एक दिवसीय लाक्षणिक बंद, आज रात्री 12 वाजल्यापासून उद्या रात्री 12 वाजेपर्यंत दूध विक्री बंद

Thane Milk Sellers Strike : ठाण्यात दूध विक्रेत्यांनी एक दिवसीय लाक्षणिक बंद पुकारला आहे. गुरुवारी रात्री 12 पासून शुक्रवार रात्री 12 पर्यंत दूध विक्री करणार नसल्याचे दूध विक्रेता संघाकडून जाहीर करण्यात आलं आहे. 2015 पासून आतापर्यंत एका लिटर मागे 20 रुपयांनी दूध दर वाढले, पण दूध विक्रेत्यांना त्यांच्या कमिशनमध्ये 10 पैसे देखील वाढवून दिलेले नाहीत. त्यामुळे एक दिवस लाक्षणिक बंद ठेवण्यात येणार आहे. या बंदामुळे तब्बल दहा लाख लिटर दूध विकले जाणार नाही. ऐन दिवाळीच्या तोंडावर दूध विक्री बंद राहिल्याने लहान मुलांपासून, वयोवृद्धांपर्यंत याचा परिणाम होणार आहे. लिटरमागे10 टक्के कमिशन देण्याची मागणी दूध विक्रेता संघाने केली आहे. ठाण्यानंतर मुंबई आणि पनवेलमध्ये देखील संपाच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. 

ठाण्यानंतर नवी मुंबईतही शिवसेना शाखा ताब्यात घेण्यावरुन वाद, तुर्भे विभागातील तीन शाखांवर ताबा घेण्यावरुन शिंदे आणि ठाकरे गटात वाद

Navi Mumbai News : ठाण्यानंतर नवी मुंबईतही शिवसेना शाखा ताब्यात घेण्यावरुन वाद


तुर्भे विभागातील तीन शाखांवर ताबा घेण्यावरुन शिंदे आणि ठाकरे गटात वाद


शिंदे गटाचे माजी नगरसेवक सुरेश कुलकर्णी आणि ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांच्यात वाद


सध्या शाखेला दोन्ही गटाने आपाआपले टाळे लावले आहेत

शिर्डी पावसाची जोरदार हजेरी, नगर-मनमाड महामार्गावर वाहतूक विस्कळीत

Nagar Rain : शिर्डी शहरात पहाटे पासून सुरु असलेल्या पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. नगर-मनमाड महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे. रस्त्याच्या एका बाजूला पाणी साचल्यानं वाहतुकीचा खोळंबा होत असून अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं रस्त्यावरून पायी चालणं कठीण झालं आहे.

 Mumbai Builder Suicide:  मुंबईतले प्रसिद्ध बिल्डर पारस पोरवाल यांची आत्महत्या

 Mumbai Builder Suicide:  मुंबईतले प्रसिद्ध बिल्डर  पारस पोरवाल यांनी आत्महत्या  केली आहे.  दक्षिण मुंबईतले सर्वांत प्रसिद्ध बिल्डर म्हणून ओळख होती. भायखळा येथे राहत्या घरी पोरवाल यांनी आत्महत्या केली. 

अजित पवार यांचे पुण्यातील आजचे सगळे कार्यक्रम रद्द, तब्येत बिघडल्याने कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय

Ajit Pawar Program Cancelled : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे आजचे सगळे कार्यक्रम रद्द झाले आहेत. अजित पवार यांची तब्येत बिघडल्याने ते कोणत्याही नियोजित कार्यक्रमांना जाणार नाहीत. त्यांचे पुण्यातील आजचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

मुसळधार पावसाने सांगलीच्या पलुस तालुक्यातील आमणापूर ते येळावी रेल्वे भुयारी पुलाखाली पाणी आल्याने वाहतूक ठप्प

Sangli News : गेल्या काही दिवसात परतीच्या मुसळधार पावसाने झोडपल्याने सांगली जिल्ह्यातील आमणापूर येथील रेल्वे गेटच्या भुयारी पुलाखाली पाणी साचले आहे. त्यामुळे दोन तालुक्यांना जोडणारा येळावी आमणापूर रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. मात्र रेल्वे प्रशासनाकडून वाहतूक बंदचे कोठेही बोर्ड न लावल्यामुळे अनेक दुचाकी, चारचाकी वाहने थेट पुलाखाली पाण्यात येऊन बंद पडत आहेत. या वाहनांना पुन्हा ट्रॅक्टरने खेचून बाहेर काढावे लागत आहे. शिवाय वाहतूक ठप्प असल्याने पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्यामुळे शेतकरी, नियमित प्रवासी, विद्यार्थी यांचे मोठे हाल होत आहेत.

जून ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागपुरातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा

जून ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईचे पैसे जमा.


नागपूर जिल्ह्यातील 1 लाख 97 हजार 273 शेतकऱ्यांच्या खात्यात 273 कोटी 10 लाखांचा निधी नुकसानभरपाई म्हणून जमा.


सरासरीने प्रत्येक शेतकऱ्याला नुकसानभरपाई म्हणून 13 हजार 773 रुपये मिळाले...


स्थानिक प्रशासनाने 2 लाख 67 हजार शेतकऱ्यांसाठी नुकसानभरपाई मागितली होती. त्यापैकी 75 टक्के शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसानभरपाईचे पैसे जमा झाले.


उर्वरित शेतकऱ्यांना बँकेच्या तांत्रिक कारणामुळे दिवाळीनंतर खात्यात पैसे मिळतील...

पालघरमध्ये बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यात पुन्हा वाद, शाखा कार्यालयावर दोन्ही गटांकडून दावा

Palghar News : पालघरमध्ये बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातला वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. बोईसरमधील नवापूर नाका येथे असलेल्या शाखा कार्यालयावर दोन्ही गटांनी दावा केला असून यामुळे काल मध्यरात्रीच्या सुमारास तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यांनी या शाखेत प्रवेश करत अपंगांना मारहाण करुन 25 हजार रुपयांची रोकड चोरी केल्याचा आरोप बाळासाहेबांची शिवसेना गटाकडून करण्यात आला आहे. काल मध्यरात्रीच्या सुमाराच्या दोन्ही गटात वाद झाल्याने शाखा आणि बोईसर पोलीस ठाण्यात कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. या संदर्भात बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.

Aurangabad Rain: औरंगाबाद जिल्ह्यात सकाळपासून पावसाला सुरवात

Aurangabad News: औरंगाबाद जीळ्य्ता सलग चौथ्या दिवशी पावसाने हजेरी लावली आहे. सकाळपासून सर्वत्र ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. तर वैजापूर शहरात मुसळधार पावसाला सुरवात झाली आहे. तसेच गंगापूर,लासूर स्टेशन, तुर्काबाद-लिंबेजळगाव,चित्तेगावमध्ये सकाळपासून पावसाला सुरवात झाली आहे.

Maharashtra Breaking : महाराष्ट्र एटीएसची पनवेलमध्ये कारवाई, पीएफआयशी संबंधित 2 जणांना अटक

वाहनाच्या धडकेत मादी बिबट्याचा मृत्यू, भंडाऱ्यातील लाखांदूर इथली घटना

Bhandara News : जंगलातून शहरात आलेल्या एका दोन वर्षीय मादी बिबट्याचा अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयासमोर पहाटे चारच्या सुमारास घडली. शहरातील नागरिक पहाटे फिरायला निघाले असता त्यांना रस्त्यावर बिबट्या आढळून आला. वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि बिबट्याला पाहिलं असता तो मृतावस्थेत आढळून आला. बिबट्या मृतावस्थेत असल्याची माहिती मिळताच त्याला बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

कल्याणमध्ये रुग्णवाहिकेच्या तर्राट चालकाची रस्त्यावरील इतर वाहनांना धडक, वाहतूक पोलिसांकडून चालक ताब्यात

Kalyan News : कल्याणमधील पत्रीपूल नजीक असलेल्या परिसरात एका रुग्णवाहिकेच्या चालकावर नागरिकांनी चांगलाच संताप व्यक्त केला. कारण हा चालक बेदरकारपणे गाडी चालवत ऐन गर्दीच्या वेळेला इतर वाहनांना धडक देत रुग्णवाहिका चालवत पुढे जात होता. त्यामुळे नेमकी काय भानगड आहे हे जाणून घेण्यासाठी इतर चालकांनी ही गाडी थांबवली. नंतर पाहत आहेत तर काय रुग्णवाहिकेचे दोन्ही चालक दारु पिऊन तर्राट झाले होते. त्यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी चांगलाच गोंधळ घातला. तब्बल अर्धा तास गोंधळ घातल्यानंतर घटनास्थळी पोलीस आले त्यांनी या तर्राट ॲम्बुलन्स चालकाला वाहतूक पोलिसांच्या ताब्यात दिले.

पार्श्वभूमी

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.  






 





राज्य मंत्रिमंडळाची बैठक 
राज्य मंत्रिमंडळाची आज बारा वाजता मंत्रालयात बैठक आहे. दिवाळीनिमित्त गरजूंना शंभर रुपयात वस्तु वाटप करणार आहेत. अद्याप पर्यंत अनेक भागांमध्ये या वस्तू  पोहोचलेल्या नाही. त्यामुळे या योजने संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत पुन्हा एकदा आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे. तसेच राज्यात झालेली अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांचा मोठा नुकसान झाले या पार्श्वभूमीवरही राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार आहे.  


अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर युक्तीवाद 
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर आज युक्तिवाद होणार. तपास यंत्रणा वेळकाढूपणा करतंय असा आरोप देशमुखांच्या वतीनं मंगळवारी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टात करण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार याप्रकरणी राज्य सरकारनं सहकार्य करणं अपेक्षित आहे, मात्र तसे होत नसल्याचंही न्यायालयाला देशमुखांच्या वकिलांकडून सांगण्यात आलं. सीबीआयच्या या वेळकाढू भूमिकेवर न्यायालयानंही त्यांना चांगलेचं सुनावलं. आम्हाला दिवाळी सुट्टीपूर्वी निर्णय द्यायचा होता. आम्ही सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशाला बांधील आहोत, याचंही भान ठेवा अशा शब्दांत न्यायालयानं सीबीआयला फटकारलं होतं.  


एमसीए अध्यक्षपदाची निवडणूक 
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (Mumbai Cricket Association Election) अध्यक्षपदाची निवडणूक आज होणार आहे. शरद पवार आणि शेलार पॅनलचे अमोल काळे विरुद्ध माजी कसोटीवीर संदिप पाटील यांच्यात थेट लढत आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर आणि शिवसेना वाहतूक संघटनेचे निलेश भोसले हेही पवार-शेलार पॅनेलकडून कार्यकारिणीसाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत.  एकनाथ शिंदे समर्थक आमदार प्रताप सरनाईक यांचे चिरंजीव विहंग सरनाईक हेही पवार-शेलार पॅनेलकडून मुंबई ट्वेन्टी ट्वेन्टी लीगच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडून आले आहेत.


मनसुख मांडविया अहमदनगर दौऱ्यावर 
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया हे आज अहमदनगर दौऱ्यावर आहेत...केंद्रीय आरोग्यमंत्री मांडविया यांच्या हस्ते डॉ. विखे पाटील कॅन्सर सेंटरचे लोकार्पण होणार आहे. सकाळी 11 वाजता, डॉ विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल विळद घाट, अहमदनगर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी खासदार डॉ.सुजय विखे पाटील , वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तान्हाजी सावंत, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित असणार आहेत.


कोल्हापुरात शिवसैनिकांचा मोर्चा 
कर्नाटक सरकारने कोल्हापुरातील कनेरीवाडी या ठिकाणी कर्नाटक भवन बांधण्याचा निर्णय घेतला आहे. याला कोल्हापुरातील शिवसैनिकांनी विरोध केलाय...कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी नुकतीच कनेरी मठावर येऊन कर्नाटक भवनची घोषणा केली आहे... त्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले असून कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात कर्नाटक भवन होऊ देणार नाही अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे... उद्या याच संदर्भात कनेरी मठावर हजारो शिवसैनिक मोर्चा घेऊन जाणार आहे.


चित्रा रामकृष्ण आणि संजय पांडे यांना कोर्टात हजर केलं जाणार 
राष्ट्रीय शेअर बाजारातील (NSE)कर्मचाऱ्यांच्या कथित अवैध फोन टॅपिंग आणि हेरगिरी प्रकरणात चित्रा रामकृष्ण  (Chitra Ramakrishan), रवी नारायण आणि मुंबई पोलीस माजी आयुक्त संजय पांडे यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे. एवेन्यू कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे. 


सत्येंद्र जैन यांच्या जामीन अर्जावर सुनावणी 
आर्थिक गैरव्यावहार प्रकरणी अटकेत असलेले दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. सत्येंद्र जैन यांच्या जामीनाला ईडीनं विरोध केला आहे. 


पंतप्रधान नरेंद्र यांच्या गुजरात दौऱ्याचा दुसरा दिवस 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. आज सकाळी 9:45 च्या सुमाराला केवडिया येथे पंतप्रधानांच्या हस्ते लाईफ अभियानाचा (मिशन LiFE)शुभारंभ होईल. दुपारी 12 च्या सुमाराला पंतप्रधान केवडिया येथे 10व्या मिशन प्रमुखांच्या परिषदेत सहभागी होतील. त्यानंतर, दुपारी 3:45 च्या सुमाराला ते व्यारा येथील विविध विकास उपक्रमांची पायाभरणी करतील.    

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.