Maharashtra News Updates 18 October 2022 : रेल्वे समितीच्या बैठकीत गोंधळ, खा. रणजितसिंह निंबाळकरांचा अध्यक्षपदाचा राजीनामा

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 18 Oct 2022 05:50 PM
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी शुक्रवारपर्यंत तहकूब

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी शुक्रवारपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष सीबीआय कोर्टात 21 ऑक्टोबर रोजी ईडी युक्तिवाद करणार  आहे. 


सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशनानुसार एका आठवड्यात निर्णय देण्यात यावा, देशमुखांतर्फे विनंती 


जर सरकारी पक्ष सहकार्य करणार नसेल तर हे कसं शक्य होणार? देशमुखांच्या वकिलांचा सवाल 


सरकारी वकिलांकडून युक्तिवाद करण्यास चालढकल सुरूय, अनिल देशमुखांच्या वकिलांचा  आरोप


अर्जावर वेळेत निर्णय देऊन सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निर्णय देण्यास आम्ही बांधील -कोर्ट


अनिल देशमुखांतर्फे वकील विक्रम चौधरी तर सीबीआयतर्फे एएसजी अनिल सिंह यांनी केला युक्तिवाद

Pune Railway Meeting : रेल्वे समितीच्या बैठकीत गोंधळ, खा. रणजितसिंह निंबाळकरांचा अध्यक्षपदाचा राजीनामा

पुणे आणि सोलापूर रेल्वे विभागीय समिती बैठकीत आज मोठा गोंधळ झाल्याचं दिसून आलं. सत्ताधारी भाजपचे खासदार आणि विभागीय रेल्वे समितीचे अध्यक्ष रणजितसिंह निंबाळकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.  या बैठकीतून 12 खासदारांनी वॉक आऊट केलं. जनतेच्या मागण्यांबाबत लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्याचा वाद झाला. करमाळा तालुक्यातील केम, जेऊरसारख्या भागातील विद्यार्थी आणि प्रवाशांच्या प्रश्नावर हा वाद झाल्याचं स्पष्ट झालंय. या प्रकारचा रेल्वे मंत्रालय आणि वरिष्ठांनी गंभीर दखल घेतली आहे.  

Bala Nandgaonkar : दिवाळीतील शिधा वाटपाच्या घोषणेची अंमलबजावणी व्हावी : मनसे नेते बाळा नांदगांवकर

Bala Nandgaonkar : दिवाळीतील शिधा वाटपाच्या घोषणेची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी मनसे नेते बाळा नांदगांवकर यांनी केली आहे. तसेच दिवाळीच्या शिधा वाटपात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होण्याची शक्यता अशी शक्यताही नांदगावकर यांनी केली आहे.  

पवार कुटुंब फोडण्याचा भाजपचा डाव; रोहित पवार यांचा खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: पवार कुटुंब फोडण्याचा भाजपचा डाव; आमदार रोहित पवार यांचा खळबळजनक आरोप

केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं, 6 जणांचा मृत्यू

उजनी धरणातून 50 हजार क्यूसेकनं पाण्याचा विसर्ग सुरु, भीमा नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा

Rain News : उजनी धरणातून 50 हजार क्यूसेकनं पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे. त्यामुळं भीमा नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सावधानतेचा इशारा दिला आहे. 

Maharashtra Rain Updates : नगर शहरासह परिसरात जोरदार पाऊस

Maharashtra Rain Updates : अहमदनगर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात रात्री जोरदार पाऊस झाला आहे. रात्री झालेल्या पावसानं शहरातील सखल भागांत पाणी साचलं होतं. तर शहरातून वाहणारी सिना नदी दुथडी भरून वाहत आहार. परतीच्या पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीवर देखील याचा परिणाम होणार आहे. अहमदनगर जिल्ह्यात सरासरीपेक्षा 120 टक्के पेक्षा अधिक पावसाची नोंद झालीये. परतीच्या पावसामुळे प्राथमिक अंदाजानुसार 1 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. दोन दिवसांपूर्वी कर्जतच्या निमगाव गांगर्डा येथील सीना नदी पात्रात पुरामध्ये अशोक गांगर्डे हे ग्रामपंचायत कर्मचारी बेपत्ता झालेत त्यांचा शोध आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून शोध सुरू आहे. सिद्धटेक येथील विशेष पथकाकडून सीना नदीपात्रात शोधमोहीम सुरू तर दुसऱ्या घटनेत नाबजी गांगर्डे हे वयोवृद्ध सिना नदी पात्रात वाहून जाताना सुदैवाने वाचलेत. ग्रामपंचायत कर्मचारी हे आपल्या वस्तीवरून गावात पाणी सोडण्यासाठी आले होते. मात्र तर घरी परतले नसल्याने त्यांच्या मुलीने त्यांना फोन केला मात्र त्यांचा फोन लागला नाही. तत्पूर्वी मुलीने एकदा फोन केला होता त्यावेळी आपण नदीजवळ आल्याचे अशोक गांगर्डे यांनी तिला सांगितले होते. दरम्यान दोन दिवसांपासून शोध घेऊन देखील अशोक गांगर्डे मिळून आलेले नाही. 

Beed News : बीडच्या गेवराई तालुक्यात रात्रभर पाऊस, कापसाच मोठे नुकसान
Beed News : बीड जिल्ह्यामध्ये गेल्या आठ दिवसापासून परतीच्या पावसानं थैमान घातलं असून गेवराई तालुक्यात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे कापसाचं प्रचंड नुकसान झालं आहे. बीड जिल्ह्यात काही भागांमध्ये पावसानं उसंत घेतली असली तरी गेवराई तालुक्यात पात्र रात्री आणि सकाळी मुसळधार पाऊस झाला आणि या पावसानं कापसाच्या शेतामध्ये गुडघाभर पाणी साचल्यानं पूर्ण कापूस पीक पाण्याखाली गेल आहे.

 

लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्यांनी कापसाचे पीक जगवल होत त्यातच आठ दिवसापासून पडणाऱ्या सततच्या पावसामुळे कापसाची बोंड काळी पडली असून त्यामधून काहीच उत्पन्न मिळणार नसल्याच शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे दिवाळीपूर्वी तात्काळ सरकारने ओला दुष्काळ बीड जिल्ह्यात जाहीर करावा अशी मागणी शेतकरी करत आहेत.

 

राष्ट्रवादीचे माजी आमदार अमरसिंह पंडित गेल्या तीन दिवसापासून गेवराई तालुक्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी करत आहेत. आणि त्यांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन तहसीलदार यांची भेट घेऊन सरसकट मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे. 
सिंधुदुर्गमधील कुडाळमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वैभव नाईक यांच्या समर्थनार्थ एसीबी कार्यालयावर मोर्चा

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट वैभव नाईक यांच्या समर्थनार्थ एसीबी कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. मागील वीस वर्षात वैभव नाईक यांच्या संपत्तीत वाढ झाल्याची तक्रार एसीबीकडे नोंदवण्यात आली आहे. या तक्रारीनंतर वैभव नाईक यांची एसीबीकडून चौकशी केली जात आहे. थोड्याच वेळात मोर्चाला सुरुवात होणार आहे.  शिवसेना कार्यालय ते एसीबी कार्यालय यादरम्यान मोर्चाचं आयोजन करण्यात आलं असून या मोर्चात अरविंद सावंत, भास्कर जाधव आणि वैभव नाईक यांच्यासह जिल्ह्यातील शिवसैनिक सहभागी होणार आहेत.

फलटण तालुक्यातील सोमंथळी एर्टिगा कार पुरात बुडाली, पिता-पुत्राचा मृत्यू

Satara Rain : साताऱ्यातील पाचगणी, वाई, लोणंद, फलटण या भागात रात्री मुसळधार पाऊस झाला आहे. फलटण तालुक्यातील सोमंथळी इथं ओढ्यावर आलेल्या पुरात एर्टिगा कार बुडाल्याची घटना घडली. यामध्ये गाडीतील पिता पुत्राचा मृत्यू झाला आहे. ग्रामस्थांनी जेसीबीच्या (JCB) सहाय्यानं ही गाडी बाहेर काढली. मृत माण तालुक्यातील वारूगड गावातील आहेत. छगन मदने आणि प्रांजल (13 वर्ष) असे मुलाचे नाव आहे. 

दुकानाचे टाळे तोडून पाच महिलांनी चोरी केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, मीरा भाईंदरमधील घटना

Mira Bhayandar News : मीरा भाईंदर येथे मध्यरात्री दुकानाचे टाळे तोडून पाच महिलांनी चोरी केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यासंदर्भात नयानगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अद्यापही आरोपी फरार आहेत. मीरा रोड येथे वोकहार्ट रुग्णालयाजवळील मदिना मेडिकलच्या दुकानात दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री चोरी झाली होती. दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये पाच महिला मध्यरात्रीच्या सुमारास दुकानाचे कुलूप तोडत असल्याचे दिसून आले. दुकानालगत  झोपले असल्याचे नाटक करत आपल्या ओढणीचा पडदा करुन त्यांनी कुलूप फोडले. त्यानंतर दुकानात प्रवेश करून मुख्य गल्ल्यातील 20 हजारांची रोख रक्कम घेऊन पळ काढला. नयानगर पोलिसांनी दुकानदाराच्या तक्रारीनुसार चोरीच्या घटनेचा गुन्हा नोंदवला असून आरोपी महिलांचा शोध सुरु आहे.

साताऱ्यात पुराच्या पाण्यात कार बुडाली, गाडीतील वडील आणि मुलीचा बुडून मृत्यू, फलटण तालुक्यातील सोमंथळी इथली घटना

Satara Rains : साताऱ्यात ओढ्यावर आलेल्या पुराच्या पाण्यात अर्टिगा कार बुडाली. फलटण तालुक्यातील सोमंथळी इथली ही घटना आहे. या घटनेत गाडीत असलेल्या वडील आणि मुलीचा बुडून मृत्यू झाला. ग्रामस्थांनी जेसीबीच्या साहाय्याने ही गाडी बाहेर काढली. या घटनेतील मृत हे मृत माण तालुक्यातील वारुगड गावातील होते. छगन मदने आणि आणि प्रांजल मदने (वय 13 वर्षे)अशी मृतांची नावं आहेत.

भांडुप मध्ये चायनीज सेंटरला भीषण आग

भांडुपमधील छत्रपती शिवाजी महाराज तलाव परिसरातील दुर्गा चायनीज सेंटर या हॉटेलला पहाटे आग लागली.पहाटे सहा वाजताच्या दरम्यान ही आग लागली आणि काही क्षणात  आगीचं रौद्ररुप पाहायला मिळाले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. सुमारे अर्धा तासाच्या अथक प्रयत्नांनंतर त्यांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात  यश आले. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी लाखोंचे नुकसान झाले आहे.

डोंबिवलीत चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रिक्षाला धडकली, एक मुलासह पादचारी जखमी

Dombivli News : डोंबिवली पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या कोपरपुलाजवळ आज सकाळी सात वाजता एक अपघात झाला. पूर्वेकडून पश्चिमेला येणार्या बसने कोपर पुलाजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या एका रिक्षाला धडक दिली. या अपघातात एका मुलासह एका पादचारी जखमी झाला आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या बस चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील कारवाई सुरु केली आहे.

Pune Rains : पुरंदर तालुक्यातील नाझरे धरणातून कऱ्हा नदीत 35 हजार क्युसेकने विसर्ग सुरु

Pune Rains : पुरंदर तालुक्यातील नाझरे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणात येणार्‍या पाण्याच्या येव्यामुळे धरणाच्या सांडव्यावरुन स्वयंचलित द्वारांद्वारे कर्‍हा नदीत सुरु असलेल्या विसर्गात मोठी वाढ करण्यात आली आहे. सध्या धरणातून 35250 क्युसेक्स इतक्या दराने कर्‍हा नदीत विसर्ग चालू आहे. कर्‍हा नदीपात्रात कोणीही उतरु नये आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावीत, असा इशारा जलसंपदा विभागाने दिला आहे. तसेच नदीकाठच्या राहिवासींना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे..

Pune Rains : नीरेतील बुवासाहेब ओढ्यावरुन पुन्हा पाणी वाहिले; सातारा-शिरुर, नीरा-बारामती मार्ग वाहतुकीसाठी बंद

Pune Rains : पुरंदर तालुक्यातील नीरा येथील बुवासाहेब ओढ्याचे पाणी पुलावरुन वाहत असल्याने सातारा-शिरुर, नीरा-बारामती मार्ग सध्या वाहतुकीसाठी बंद आहे. साताऱ्यावरुन  शिरुरला जाण्यासाठी याच तकलादू पुलावरुन जावं लागतं. बुवासाहेब ओढ्याच्या पुलाचे काम सुरु आहे. वाहतुकीसाठी तकलादू पुलाची उभारणी करण्यात आली आहे. पंरतु यंदाच्या मोसमात तिसऱ्यांदा या पुलावरुन पाणी गेल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. सातारा-शिरुर मार्ग बंद असल्याने वाहनचालकांना जवळपास 30 किलोमीटरचा फेरा पडत आहे. तसेच नीरामधून बहुसंख्य विद्यार्थी हे बारामती तालुक्यातील सोमेश्वर येथे शाळेसाठी जात असतात. पंरतु या पुलावरुन पाणी गेल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. विद्यार्थ्यांची परीक्षा असल्याने विद्यार्थी शाळेत जाऊ शकत नाहीत. त्यामुळे परीक्षेला मुकावे लागत असल्याचे स्कूल बस संघटनेचे अध्यक्ष सांगत आहेत.

नाशिकमधील सारथी कार्यालयाच्या उद्घाटनावरुन वाद, पत्रिकेत संभाजीराजे छत्रपती यांना डावलल्याचा मराठा संघटनांचा आरोप

Nashik News : नाशिकमधील सारथी कार्यालयाच्या उद्घाटनावरुन नवा वाद निर्माण झाला आहे. सारथीच्या नियोजित उद्घाटन पत्रिकेत संभाजीराजे छत्रपती यांना डावलल्याचा आरोप मराठा संघटनांनी केला आहे. संभाजीराजेंना डावलल्यास कार्यक्रम होऊ देणार नाही असा इशारा स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते करण गायकर यांनी दिला आहे. येत्या 21 तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्रातील सारथीच्या विभागीय कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे. परंतु संभाजीराजे छत्रपती यांना सन्मानपूर्वक बोलवा अन्यथा कार्यक्रम होऊ देणार नसल्याचा इशारा स्वराज्य संघटनेने दिला आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर बोरघाटात पहाटे ट्रकचा अपघात, सुदैवाने जीवितहानी नाही, ट्रक चालक घटनास्थळावरुन पसार

Raigad News : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर बोरघाटात ट्रकचा अपघात झाला. आज पहाटे ही घटना घडली. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक पलटी झाला.  पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावरील टॅंकरला ट्रकची धडक बसली. अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका, औरंगाबादहून उपचारांसाठी मुंबईकडे रवाना

भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरणातील दलदलीच ठिकाणी अडकलेल्या नीलगायला जीवनदान, जीसीबीच्या साहाय्याने बाहेर काढलं

Bhandara News : दलदलीमध्ये अडकलेल्या नीलगायला जीवनदान दिल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्याच्या गोसीखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यात घडली आहे. तिला दलदलीतून बाहेर काढण्यासाठी चक्क जेसीबीची मदत घ्यावी लागली. संबंधित नीलगाय पाण्याच्या शोधात फिरत असताना गोसेखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यात पडली आणि वाहत सरळ लिफ्ट इरिगेशनचे काम सुरु असलेल्या दलदलच्या ठिकाणी अडकली. ही बाब मजुरांच्या लक्षात आल्याने त्यांनी ही माहिती वनविभागाला दिली. त्यानंतर जेसीबीच्या साहाय्याने नीलगायला दलदल भागातून बाहेर काढण्यात आलं. औषधोपचार करुन तिला सोडण्यात येणार आहे.

पालघरच्या जव्हार, मोखाडा, विक्रमगड तालुक्यातील ठाकरे गटाचे पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे, ग्रामपंचायत निवडणुकीत सहकार्य न केल्याचा आरोप, शिंदे गटात सामील होणार

Palghar News : पालघर जिल्ह्याच्या जव्हार, मोखाडा, विक्रमगड तालुक्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये कोणत्याही प्रकारचे सहकार्य न केल्यामुळे या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे सादर केले असून त्यांनी शिंदे गटाची वाट धरली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पालघर जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. ज्या ग्रामपंचायतीचे सरपंच निवडून आले आहेत त्यापैकीही काही सरपंच शिंदे गटात जाण्याची शक्यता आहे.

Ambernath News : अंबरनाथमधील डॉक्टरांच्या घरावरील दरोड्याची उकल, माजी महिला कर्मचाऱ्यासह एकूण 9 जणांना बेड्या

Ambernath News : अंबरनाथमधील डॉ. उषा लापसिया यांच्या घरावर जुलै महिन्यात सशस्त्र दरोडा पडला होता. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी तीन महिन्यांनी दरोडेखोरांचा मग काढत एका महिलेसह एकूण 9 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. कामावरून काढून टाकल्याच्या रागातून पूर्वी डॉक्टर लापसिया यांच्याकडे काम करणाऱ्या महिलेनंच हा कट रचल्याचं तपासातून समोर आलंय.

मध्यरात्रीनंतर पुण्यातील पाऊस थांबला

Pune Rain :  मध्यरात्रीनंतर पुण्यातील पाऊस थांबला आहे. रात्री नऊ वाजता सुरु झालेल्या पावसाने पुणे- पिंपरी-चिंचवडला झोडपले. शिवाजीनगर भागात रात्री साडेअकरापर्यंत 81 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. इतर भागातही असाच मुसळधार पाऊस झाला. शहरातील अनेक भागातील वीज आणि मोबाईल नेटवर्क रात्रीपासून अजूनही गायब होते. अनेक वसाहतींमध्ये पाणी शिरलं आहे. अनेक भागात दुचाक्या वाहून गेल्या आहेत.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.  








बीसीसीआयला आज मिळणार 36वा अध्यक्ष








बीसीसीआयची आज सर्वसाधारण सभा आणि निवडणूक होणार आहे. ही निवडणूक बिनविरोध होणार असून रॉजर बिन्नी यांच्याकडे बीसीसीआयचं अध्यक्षपद येणार आहे. तर खजिनदारपदी आशिष शेलार यांची निवड होणार आहे.


बिल्किस बानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी 


बिल्किस बानो बलात्कार प्रकरणी आणि तिच्या कुटुंबातील सात सदस्यांचा खून केल्याप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या 11 दोषींना गुजरात सरकारने मुक्त केलं होतं. गुजरात सरकारच्या या निर्णयाविरोधात पीडित बिल्किस बानो हिने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. 


अनिल देशमुख यांच्या याचिकेवर सुनावणी 


राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर आजपासून सीबीआय कोर्टात सुनावणील होणार आहे. सीबीआयच्या गुन्ह्यावरूनच ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात हायकोर्टान देशमुखांना जामीन मंजूर केला आहे. तसेच याविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलेल्या ईडीला कोणताही दिलासा न देता सर्वोच्च न्यायालयानं त्यांचं अपील फेटाळून लावलं आहे. त्यामुळे देशमुखांनी सीबीआयच्या प्रकरणातही जामीन मागत कोर्टात याचिका दाखल केली आहे. 


संजय राऊत यांच्या याचिकेवर सुनावणी  


पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी अटकेत असलेल्या संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी सुरू राहणार आहे. राऊत यांच्या जामिनाला ईडीने विरोध केला आहे. आज संजय राऊतांच्या वकिलांकडून बाजू मांडली जाणार आहे.


उमर खालिदच्या जामीन याचिकेवर सुनावणी 


जेएनयूचा विद्यार्थी उमर खालीद याच्या जामीन याचिकेवर आज दिल्ली उच्च न्यायायलयात आज सुनावणी होणार आहे. 2020 साली दिल्लीमध्ये झालेल्या दंगलीच्या कटात सहभागी असल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. तसेच देशविरोधी कारवाया करत असल्याचा ठपका ठेवत त्याच्यावर यूएपीए कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. दिल्ली पोलिसांनी त्याच्या जामीन अर्जाला विरोध केला आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.