Walmik Karad : न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर वाल्मिक कराडला बीडमध्ये नेण्यात आलं. संतोष देशमुख हत्या प्रकरणात एसआयटीने वाल्मिक कराडला ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, सध्या वाल्मिक कराडला थकवा जाणवत असून, छातीत दुखत आहे. त्यामुळं त्याच्यावर उपचार सुरु आहेत. वाल्मिक कराडच्या काही चाचण्या केल्या जाणार आहेत. त्यानंतरच तब्येतीची सविस्तर माहिती कळू शकेल.
मकोका गुन्हा दाखल झाल्यानंतर एसआयटीने प्रोडक्शन वॉरंट दाखवून ताबा
न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर वाल्मिक कराडला बीडमध्ये नेण्यात आलं आहे. मात्र त्याच्यावर मकोका गुन्हा दाखल झाल्यानंतर एसआयटीने प्रोडक्शन वॉरंट दाखवून त्याचा ताबा घेतला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा सहभाग असल्याचा पुरावा असल्याचा दावा एसआयटीने केला असल्याची माहिती मिळत आहे. या आधी खंडणीच्या गुन्ह्यातही एसआयटीकडेच त्याचा ताबा होता. वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्याला पहिल्यांदा तुरुंगात नेलं गेलं. त्यानंतर एसआयटीकडून त्याला हत्येच्या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलं.
संतोष देशमुख हत्याप्रकरणी अखेर वाल्मिक कराडवर मकोकातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाल्मिक कराडवर मकोका लावावा अशी देशमुख कुटुंबीयांसह सर्वपक्षीय नेत्यांची मागणी होती. याआधी वाल्मिक कराड हा खंडणी प्रकरणात पोलिसांना शरण गेला होता. मात्र त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी होती. त्यासाठी देशमुख कुटुंबानं सोमवारी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन देखील केलं होतं. त्यानंतर आता वाल्मिक कराडवर मकोका गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला आहे. आता यावर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय देशमुख म्हणाले की, या हत्याकांडातील जे आरोपी आहेत मग ते कोणी पण असो, त्या सगळ्यांना 302 आणि मकोकामध्ये घेण्यात यावं, अशी आमची प्रमुख मागणी आहे.
वाल्मिक कराड यांच्या समर्थकांचे परळीत आंदोलन
संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी काल पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं होतं. आज खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या वाल्मिक कराड यांच्या समर्थकांचे आंदोलन सुरु आहे. परळी शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवरवर चढून वाल्मिक कराडच्या समर्थकांकडून आंदोलन करण्यात येत आहे. भाजप आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर यांच्याविरोधात कराड समर्थकांनी आंदोलन सुरू केले आहे.वाल्मिक कराडच्या मातोश्री देखील आता मैदानात उतरल्या आहेत. लेकाच्या न्यायासाठी वाल्मिक कराडच्या मातोश्रींनी परळी पोलीस स्टेशनबाहेर (Parli Police Station) ठिय्या आंदोलनास सुरुवात केली आहे.