Maharashtra News Updates 15 October 2022 : मनसे प्रमुख राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला, राज ठाकरे वर्षा निवासस्थानी दाखल

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 15 Oct 2022 11:26 PM
सदावर्ते यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली

गुणरत्न सदावर्ते यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.  एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस आणि लव्ह जिहाद या विषयावर चर्चा झाल्याचं समजते.  

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दोन तास बैठक, नुकसान भरपाईसंदर्भात लवकरच मोठ्या घोषणेची शक्यता

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दोन तास बैठक, नुकसान भरपाईसंदर्भात लवकरच मोठ्या घोषणेची शक्यता

स्वाभिमानीच्या ऊस  परिषदेला रविकांत तुपकर यांची गैरहजेरी

स्वाभिमानीच्या ऊस  परिषदेला रविकांत तुपकर यांची गैरहजेरी


स्वाभिमानी पासून रविकांत तुपकर यांनी फारकत घेतल्याची चर्चा


तब्येत बरी नसल्याने उपस्थित राहिलो नाही अशी तुपकरांची एबीपी माझाला माहिती


 

अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक

अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक


भाजपाच्या वतीने अंधेरी मतदार संघातील प्रत्येक वार्डची आमदारांना जबाबदारी


अंधेरीतील 10 वॉर्डसाठी भाजपचे दहा आमदार मैदानात


पोलिंग बॉइथची जबाबदारी भाजपच्या माजी नगरसेवकांवर


मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नेतृत्वात भाजपचे प्रमुख आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक



बैठकीसाठी मुंबई प्रभारी आमदार अतुल भातकळकर, विधान परिषद गटनेते प्रवीण दरेकर, प्रतोद प्रसाद लाड, आमदार योगेश सागर, मनिषा चौधरी, पराग अळवणी, अमित साटम, कँप्टन तमिल सेलवन, यांच्यासह जिल्हा अध्यक्ष यांची खलबतं

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्कार सोहळ्यासाठी रिक्षा रॅली 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भव्य सत्कार सोहळा ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे अध्यक्ष डॉ शंकर पवार यांच्यावतीने 16 ऑक्टोबर 2022 रोजी हायलँड ढोकाळी मैदानात आयोजित करण्यात आले असून दुपारी 3 वाजता चेकनाका कोपरी ते हायलँड मैदान ढोकाळी अशी रिक्षा रॅली काढण्यात येणार आहे, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रिक्षा रॅलीमधून मैदानात पोहोचणार आहे. रॅलीमध्ये 300 रिक्षा, 200 बाईक चा समावेश असणार आहे

विरार  : फोटो काढण्याच्या नादात वैतरणा नदीत 2 मुली तोल जाऊन खाली पडल्या

विरार  : फोटो काढण्याच्या  नादात वैतरणा नदीत 2 मुली तोल जाऊन खाली पडल्या..  एकीचा मृतदेह मिळाला तर एकीचे शोधकार्य सुरू आहे. वैतरणा फणसपाडा जेटीवर आज सायंकाळी 5 वाजताच्या सुमारासची घटना आहे. 4 मुलींचा चमू वैतरणा फणसपाडा जेटी वर फिरायला गेल्या होत्या. जेटीवर फोटो, सेल्फी फोटो काढत असताना एकीचा तोल गेला, तिला वाचविण्यासाठी सोबतच्या तीन जणी गेल्या असता, यात दोघी बुडाल्या तर  दोघी सुखरूप बाहेर निघाल्या आहेत. विरार  पोलीस आणि वसई विरार महापालिकेचे अग्निशमन दलाकडून रात्री सुद्धा शोधकार्य सुरूच आहे. संतु दस्साना (वय 15)  आणि लीला दस आना (वय 24) असे बुडालेल्या दोघींचे नाव असून, संतुचा मृतदेह मिळाला आहे तर लीलाचे शोधकार्य सुरू आहे.

भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांच्या कारला अपघात

भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांच्या कारला समोरून येणाऱ्या रिक्षाने धडक दिली. सुदैवाने या अपघातात माधव भंडारी आणि त्यांच्या सोबत असलेले प्रवक्ते राम कुलकर्णी यांना कसलीही इजा झाली नाही. हा अपघात आज  सायंकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास मस्साजोग (ता. केज) जवळ झाला. 


माधव भंडारी यांचे रविवारी अंबाजोगाई पुस्तक प्रकाशन कार्यक्रमानिमित्त व्याख्यान आहे. त्यासाठी बीड येथील कार्यक्रम आटोपून माधव भंडारी आणि राम कुलकर्णी ही अंबाजोगाईकडे निघाले होते. मस्साजोगजवळ त्यांच्या समोरून येणारा ॲपे रिक्षा मातीच्या ढिगाऱ्यावर गेल्याने पलटी झाला आणि भंडारी यांच्या कारला धडकला. भंडारी यांच्या चालकाने प्रसंगावधान राखत कार बाजूला घेतल्याने मोठा अनर्थ टळला असून माधव भंडारी, राम कुलकर्णी यांना कसलीही इजा झाली नाही. तर, रिक्षाचा चालक किरकोळ जखमी झाला आहे. दरम्यान, अपघातानंतर भंडारी हे अंबाजोगाईच्या दिशेने रवाना झाले असून ते तिथे मुक्कामी असणार आहेत

इमारतीच्या तोडकामादरम्यान झालेल्या अपघातात पोकलन चालकाचा मृत्यू.

कामोठे वसाहतीमधील धोकादायक घोषित करण्यात आलेल्या एका इमारतीच्या पाडकामा दरम्यान झालेल्या अपघातात एका पोकलेन चालकाचा मृत्यू झाला आहे. कामोठे वसाहती मधील सेक्टर 35 येथे असलेली ब्लु हेवन ही इमारत राहण्यासाठी धोकादायक ठरवण्यात आली होती. पालिकेने दिलेल्या नोटिसीनंतर या इमारतीच्या पाडकामाची कारवाई विकासकाकडून सुरु होती.या कामादरम्यान घडलेल्या दुर्घटनेत एका पोकलेन चालकाला आपला जीव गमवावा लागला आहे. महत्वाचे म्हणजे पाडकाम सुरु असताना कार्यरत मजुरांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा उपकरणे पुरवण्यात येत नसल्याच्या तक्रारी कामगार आयुक्तांकडे करण्यात आल्या आहेत. दरम्यान या प्रकरणी कामोठे पोलीस तपास करीत आहेत.

खासदार इम्तियाज जलील यांची केंद्रीय नागरी समितीवर तिसऱ्यांदा  फेरनिवड

 औरंगाबाद : खासदार इम्तियाज जलील यांची केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार विषयक स्थायी समितीवर पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. ही समिती केंद्र सरकारच्या गृहनिर्माण, स्मार्ट सिटी, मेट्रो, पीएम स्वानिधी आणि केंद्र सरकारचा निधी असलेल्या अशा अनेक योजनांसह केंद्र सरकारच्या विविध योजनांवर सनियंत्रण (लक्ष) ठेवते. खासदार इम्तियाज जलील यांची समितीवर तिसऱ्यांदा  फेरनिवड करण्यात आली आहे.          खासदार राजीव रंजन सिंह यांची समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यात संजय सिंह, गौतम गंभीर, हेमा मालिनी, हिबी इडन हे देखील सदस्य आहेत.

7 नोव्हेंबर रोजी पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयावर स्वाभिमानीचा मोर्चा, विविध मागण्यांसाठी पुण्यात होणार मोर्चा

7 नोव्हेंबर रोजी पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयावर स्वाभिमानीचा मोर्चा, विविध मागण्यांसाठी पुण्यात होणार मोर्चा

वाशीम जिल्ह्यातील सहा पंचायत समिती सभापती, उपसभापती निवडणुकीचे निकाल जाहीर




वाशीम जिल्ह्यातील सहा पंचायत समिती सभापती उपसभापती पदाची निवडणूक आज पार पडली. सहा पैकी पांच पंचायत समितीवर माहाविकास आघाडीने आपला झेंडा फडकवला असून मानोरा पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्याने BJP ला साथ दिल्याने इथ BJP आणि कॉंग्रेसने बाजी मारली आहे. अडीच वर्षा अगोदर या सहाही पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या होत्या. आज अडीच वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्याने आज पुन्हा सभापती उपसभापती पदाची निवडणूक पार पडली. यात महाविकास आघाडीने बाजी मारल्याचे चित्र पाहायला मिळाले 
 

 


 



 


Maharashtra Corona Cases: राज्यात आज 403 रुग्ण बरे होऊन घरी तर 462 नवीन रुग्णांचे निदान

  • आज ४०३ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ७९,७६,०७० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९८.१४% एवढे झाले आहे.

  • आज राज्यात ४६२ नवीन रुग्णांचे निदान .

  • राज्यात आज एकही करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२% एवढा आहे.

  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,५०,५६,१४६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८१,२७,२५९ (०९.५६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

मनसे प्रमुख राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला, राज ठाकरे वर्षा निवासस्थानी दाखल

शेतकऱ्यांनी शेतात साचलेल्या पाण्यात अर्धनग्न होऊन केले आंदोलन

Parbhani News : परभणी जिल्ह्यात काल परतीच्या पावसानं सर्वत्र धुमाकूळ घातला होता. यातूनच शेतकऱ्यांच्या सोयाबीन आणि कापसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. ठीक ठिकाणी शेतीमध्ये पाणी साचलंय. काढणीला आलेलं सोयाबीन असेल किंवा वेचणीला आलेला कापूस असेल हा पाण्यामध्ये पूर्णपणे बुडाला असून परभणीच्या मिरखेल येथील हीच परिस्थिती तेथील शेतकऱ्यांनी विशद केलीय. मिरखेल येथील पाणी साचलेल्या सोयाबीनच्या शेतात शेतकऱ्यांनी अर्धनग्न होऊन सरकार कडे पीक विमा आणि नुकसान भरपाई ची मागणी केली आहे. 

BJYM Maharashtra President : भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षची आज होणार निवड, बबनराव लोणीकर यांच्या मुलाची वर्णी लागण्याची शक्यता

BJYM Maharashtra President : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये युवकांना संधी


भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षची आज होणार निवड


बबनराव लोणीकर यांच्या मुलाची वर्णी लागण्याची शक्यता


राहुल लोणीकर नवे युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष होण्याची शक्यता


भाजपा युवा मोर्चाची आज मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात बैठक


प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत होणार घोषणा


सध्याचे युवा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांची महामंत्रीपदी नियुक्ती झाल्याने हे पद रिक्त आहे

नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये टोमॅटोची आवक घटल्याने दरात 10 ते 15 रुपयांची वाढ

Navi Mumbai News : एपीएमसी मार्केटमध्ये टोमॅटोची आवक घटल्याने दरात वाढ झाली आहे. टोमॅटोच्या दरात 10 ते 15 रुपयांची वाढ झाल्याची पाहायला मिळते. गेल्या आठवडाभरापासून पाऊस सुरु असल्याने टोमॅटो पिकाचे नुकसान झालं. परिणामी बाजारातील आवक घटली. सध्या एपीएमसी मार्केटमध्ये टोमॅटोचा दर 35 ते 40 रुपये झाला आहे. 
किरकोळ मार्केटमध्ये हाच दर 60 ते 70 रुपयांवर पोहोचला आहे. दरम्यान पावसामुळे एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्याला उठाव नसल्याने इतर भाजीपाल्याच्या किंमती स्थिर आहेत.

उद्या मुंबई-गोवा महामार्ग बंद आंदोलन, हायवेची दुर्दशा आणि खड्ड्यांविरोधात माझं पेण'समितीकडून महामार्ग बंद करण्याचा इशार

Pen News : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मागील बारा वर्षापासून अगदी धीम्या गतीने सुरु आहे. शिवाय या महामार्गावर जे नवीन काम केले आहे त्यावर देखील मोठमोठे खड्डे पडले आहेत. मात्र याकडे कोणीही लक्ष देत नसल्याने अखेर पेण तालुक्यातील माझं पेण या सामाजिक संघटनेने पुढाकार घेऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी उद्या १६  ऑक्टोबर रोजी संपूर्ण मुंबई गोवा महामार्ग महामार्ग बंद करण्याचा इशारा दिला आहे.  त्याबाबतचे निवेदन संघटनेच्या माध्यमातून त्यांचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांना देण्यात आले आहे.

चिपळूण तालुक्यातील घोणसरे इथे सर्पदंशाने तरुणीचा मृत्यू

Chiplun News : चिपळूण तालुक्यातील घोणसरे येथे सर्पदंशाने एका तरुणीचा मृत्यू झाला. सिद्धी रमेश चव्हाण असे या मृत तरुणीचे नाव आहे. गुरुवारी (13 ऑक्टोबर) दुपारी 3 वाजता ती घरी झोपलेली असताना ही घटना घडली. गाढ झोपेत असलेल्या या तरुणीची झोप अखेरची ठरली. उंदराच्या मागावर साप घरात शिरला असल्याचा अंदाज आहे. सापाने तिला तीनवेळा दंश केला. या घटनेनंतर सिद्धीला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात उपचार सुरु असतानाच सिद्धीचा मृत्यू झाला.

परभणीच्या दोन्ही धरणांतून पाण्याचा विसर्ग

काल परभणी जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने परभणी जिल्ह्यातील प्रकल्प पुन्हा एकदा ओव्हर फ्लो झाले आहेत येलदरी आणि लोअर दुधना या दोन्ही धरणाचे दोन दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत.येलदरीच्या 2 दरवाज्या मधुन 4424 तर विद्युत निर्मिती प्रकल्पातून 1800 असा 6224 क्यूसेक्स वेगाने पाणी पुर्णा नदीपात्रात सोडण्यात आला आहे तर लोअर दुधनाच्या 2 दरवाज्यातून 680 क्यूसेक्स वेगाने पाणी दुधना नदीपात्रात सोडण्यात आले असुन आज जर पाऊस झाला तर हा विसर्ग वाढवण्यात येणार असुन पुर्णा आणि दुधना दोन्ही नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

Andheri East Bypoll : ठाकरेंच्या शिवसेनेच्या 'मशाल' चिन्हाला समता पक्षाचं कोर्टात आव्हान, मशाल चिन्हावर समता पक्ष आज दिल्ली हायकोर्टात बाजू मांडणार

Andheri East Bypoll : अंधेरीतील पोटनिवडणुकीत ठाकरेंची शिवसेना मशाल चिन्हावर लढतेय आणि प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर आता या चिन्हालाच आव्हान देण्यात आलंय. समता पक्षानं मशाला चिन्हाला दिल्ली हायकोर्टात आव्हान देण्याचं ठरवलंय. समता पक्ष यावर आज कोर्टात याचिका दाखल करणार आहे. २००४ मध्ये समता पक्षाची राज्यातली मान्यता काढण्यात आली. त्यानंतर आता शिवसेनेतील फुटीनंतर निवडणूक आयोगानं ठाकरेंच्या शिवसेनेला मशाल चिन्हं दिलं आहे. या चिन्हावर ठाकरेंची शिवसेना प्रथमच निवडणूक लढवत असताना समता पक्षानं याच चिन्हावर दावा केल्यानं कोर्टात काय होणार याकडे लक्ष लागलंय. 

दाट धुक्यामुळं मध्य रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनीट उशीरानं सुरु

Mumbai Local Train : खोपोली, कर्जत, बदलापूर, कसारा, टिटवाला, कल्याण परीसरात पडलेल्या धुक्यामुळं मध्य रेल्वेची वाहतूक उशीरानं सुरु आहे. कर्जत ते सीएसटी दरम्यान धावणाऱ्या गाड्या 10 ते 15 मिनिट उशीराने सुरु आहेत. तर कसारा, टिटवाला ते सीएसटी गाड्या 5 ते 10 मिनिटे उशिराने धावत आहेत. 

मध्य रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिट उशिराने 

खोपोली, कर्जत, बदलापूर , कसारा, टिटवाला, कल्याण परीसरात पडलेल्या धुक्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने


कर्जत ते सीएसटी दरम्यान धावणाऱ्या गाड्या 10 ते 15 मिनिट उशिराने 


तर कसारा, टिटवाला ते सीएसटी गाड्या 5 ते 10 मिनिटे उशिराने धावत आहेत

Maharashtra Rain : राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस

Maharashtra Rain : राज्यात परतीच्या पावसानं (Rain) धुमाकूळ घातला आहे. राज्याच्या विविध जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. यामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. या पावसाचा शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. मुंबईसह ठाणे परिसरात पावसानं जोरदार हजेरी लावली. त्याचबरोर राज्यातील सिंधुदुर्ग, पुणे, परभणी, लातूर, सोलापूर, अहमदनगर या जिल्ह्यात देखील पावसानं जोरदार बॅटींग केली आहे. या परतीच्या पावसाचा शेती पिकांना फटका बसला आहे.


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Mumbai Crime News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात आक्षेपार्ह टिपण्णी करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

Mumbai Crime News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर ट्वीटच्या माध्यमातून आक्षेपार्ह टिपण्णी करणाऱ्याविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात युवा सेनेचे सचिव किरण साळी यांनी फिर्याद दिली आहे. @bhujangashetti या ट्विटर हॅंडलच्या (Twitter Handle) चालकावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 153 (अ), 500, 505 (2) अंतर्गत हा गुन्हा दाखल (Crime News) करण्यात आला आहे. 


किरण साळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, "सदर ट्विटर हॅंडलनं समाजात असंतोष निर्माण होईल, या उद्देशानं 11 ते 14 ऑक्टोबर, 2022 दरम्यान आक्षेपार्ह, महिलांना अपमानास्पद, लज्जास्पद आणि आपत्ती निर्माण होईल, असा मजकूर पोस्ट केला आहे."

पार्श्वभूमी

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू... 


आजपासून अंधेरी पूर्व निवडणुकीचा प्रचार सुरू 


विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप विरुद्ध उद्धव ठाकरे यांची शिवसेना असा थेट सामना होत आहे.शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा रमेश लटके यांच्या प्रचाराची सुरुवात त्यांच्या निवासस्थानापासून होणार आहे. तर भाजपच्या मुरजी पटेल यांच्या प्रचाराची सुरुवातही आज होणार आहे. 


प्राध्यापक साईबाबा यांच्या मुक्ततेविरोधातील याचिकेवर सुनावणी 


प्राध्यापक साईबाबा यांच्या सुटकेविरोधात दाखल याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं जी. एन साईबाबाची निर्दोष मुक्तता केली होती. त्याविरोधात राज्य सरकारने दाखल याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक साईबाबा यांची उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. 2010 मध्ये माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून साईबाबा यांना 2013 गडचिरोली पोलीसांनी अटक केली होती.


ज्ञानवापी मशिदीतील शिवलिंग पूजेसंबंधी याचिकेवर सुनावणी  


वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीतील शिवलिंगाच्या नियमित पूजेसाठी दाखल याचिकेवर आज वाराणसी कोर्टात सुनावणी होणार आहे.


लातूर जिल्ह्यातील मांजरा धरण 95 टक्के भरलं, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा 


लातूर शहराला पाणीपुरवठा करणारं मांजरा धरण 95 टक्के भरले आहे. मांजरा धरणाच्या कॅचमेंट एरियामध्ये मागील काही दिवसापासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे धरणात येणारा पाण्याचा जोर वाढलाय. आज कोणत्याही क्षणी मांजरा धरण 100 टक्के भरण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर धरणातून विसर्ग करण्यात येणार आहे. नदीकाठील 152 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन विभागाला सर्व सूचना करण्यात आल्या आहेत.


शिवसेनेच्या विरोधात समता पक्ष न्यायालयात जाणार


शिवसेनेच्या मशाल चिन्हाविरोधात समता पक्ष आज कोर्टात जाणार आहे. मशाल चिन्ह अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरेंना देऊ नये अशी समता पक्षाची मागणी आहे. समता पक्ष समता पक्ष आज दिल्ली हायकोर्टात आपलं म्हणणं मांडणार आहे. 


आजही राज्यात पावसाचा अंदाज


महाराष्ट्रातील मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. काल  मान्सून उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागातून माघारी परतला आहे. पुढील तीन ते चार दिवसात मान्सून आणखी काही भागातून माघारी फिरेल. मात्र तोपर्यंत उर्वरीत महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. ज्यामुळे कापणीला आलेल्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. 


स्वाभिमानी शेतकरी संघटनेची उस परिषद 


स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आज 21 वी ऊस परिषद होणार आहे. महाविकास आघाडीला सोडल्यानंतर स्वाभिमानीची ही पहिलीच ऊस परिषद आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी काय भूमिका घेतात हे पहावं लागेल. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.