Maharashtra News Updates 9th March 2023 : आज भरती आहे.... उद्या ओहोटी येणार हे भाजपने लक्षात ठेवावं; राज ठाकरेंचा इशारा

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 09 Mar 2023 08:43 PM
अकोला - विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी

अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात आज दुपारी विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झालीये. हे विद्यार्थी दहावीचे विद्यार्थी असल्याची माहिती मिळतीये. होळीच्या दिवशी रंग लावण्याच्या वादातून ही हाणामारी झाल्याचं बोललं जातंये. यात 8 जण जखमी झालेयेत. याप्रकरणी मूर्तिजापूर शहर पोलिसांनी 8 जणांवर गुन्हे दाखल केलेयेत. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केलीये. जखमींवर मुर्तिजापूरच्या लक्ष्मीबाई देशमुख ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरूयेत.

आगीत एका ८५ वर्षीय महिलेचा मृत्यू, वसईतील घटना

वसई येथे एका केमिकल फॅक्टरीला भीषण आग लागली होती. या आगीत एका ८५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावरजवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  घटना आज पावणे चार वाजताची आहे. थिनर ने भरलेल्या ड्रमला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. 
वसईच्या सातीवली येथील तुंगारफाटा येथे एका केमिकल कंपनीला भीषण आग लागली होती. या आगीत सूरय्याबानू अजगरअली या ८५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.  तर दिनेश पासवान (वय २५ वर्षे), कमलेश यादव (वय २४ वर्ष) आणि विजय यादव (वय ३५ वर्ष) हे तिघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. 
आगीचा स्फोट एका मागून एक होत होता. या स्फोटाची भीषणात मोबाईल कॅमे-यत कैद झाली आहे.  या आगीच्या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच वसई विरार अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानाना फार मेहनत घ्यावी लागली होती. दोन तासानंतर आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलं होतं.

Vasai : केमिकल फॅक्टरीला भीषण आग; एका 85 वृद्धेचा मृत्यू, तीन जण जखमी

Vasai News :  वसई :  वसई येथे एका केमिकल फॅक्टरीला भीषण आग लागली होती. या आगीत एका 85 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना आज 3.45 वाजण्याच्या सुमारास घडली. थिनरने भरलेल्या ड्रमला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

Raj Thackeray: आज भरती आहे.... उद्या ओहोटी येणार हे भाजपने लक्षात ठेवावं; राज ठाकरेंचा इशारा

प्रत्येक पक्षाच्या इतिहासात भरती-ओहोटी आलेली आहे, 65 वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसची आजची अवस्था काय आहे? त्यामुळे आज भरती आहे... उद्या ओहोटी येणार हे भाजपने लक्षात ठेवावं असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. मनसेच्या 17 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी 'आम्ही काय केलं' हे डिजिटल डॉक्युमेंट्स प्रकाशित करण्यात आलं.

माहूरगडावर नारिशक्ती चित्ररथाचे प्रचंड जल्लोषात स्वागत

प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली येथील  कर्तव्यपथावर संचलन सोहळ्यात गौरवान्वित झालेल्या महाराष्ट्राच्या साडेतीन 'शक्तीपीठे नारिशक्ती' या चित्ररथाचे गुरुवार दि.9 मार्च रोजी स.11 वा.श्रीक्षेत्र माहूरगड येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले.


स्थानिक विश्रामगृहावर प्रशासनाचे वतीने श्री रेणुकादेवी संस्थानचे कोषाध्यक्ष तथा तहसीलदार किशोर यादव, मुख्याधिकारी डॉ. राजकुमार राठोड, नगराध्यक्ष फिरोज दोसाणी, उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड, विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय काण्णव, समीर भोपी  यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली.त्यानंतर चित्ररथाच्या शोभा यात्रेस प्रारंभ झाला.


आदिवासी समाजाचे ढेमसा नृत्य व बंजारा समाजातील महिलांच्या लेंगी नृत्याने शोभा यात्रेत अधिक रंगत आणली.कार्यालयीन अधीक्षक वैजनाथ स्वामी यांचे मार्गदर्शनात स्वच्छता दूत गणेश जाधव आणि अग्निशमन चालक शे. मनसूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वच्छतेची जनाबदारी चोख बजावली. शहरातील सुवासिनीनी जागोजाग काढलेल्या रांगोळी डोळ्याचे पारणे फेडत होत्या. शोभयात्रेत  फोस्टर किड्स शाळेचे विद्यार्थी, शहरातील नागरिक, महिला व पत्रकारांची मोठया संख्येने उपस्थिती होती. श्री रेणुकादेवी संस्थानच्या सुरक्षा रक्षकांनी सुव्यवस्थेचे उत्तम नियोजन केले होते. शोभा यात्रेचा पहिला मान दिल्याबद्दल शासनाचा सांस्कृतिक विभाग, ना. सुधीर मुनगंटीवार व आ. भीमराव केराम यांचे माहूरकरांनी ऋण व्यक्त केले.

मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणा-या 04 आरोपीस पश्चिम बंगाल येथून अटक
मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणा-या 04 आरोपीस पश्चिम बंगाल येथून विशेष तपास पथक, गुन्हे शाखेकडुन अटक करण्यात आली. 

 

SIT पथकाने तांत्रीक तपासाच्या मदतीने कोलकाता शहरातुन वर नमुद 04 आरोपीना ताब्यात घेऊन अटक केली व कोलकाता येथे  6 मार्चला न्यायालयाकडुन आरोपीतांचे चार दिवस ट्रांन्सीट रिमांड घेवुन गुरुवारी अटक आरोपी यांना मुंबईमधील न्यायालयासमक्ष हजर केले असता न्यायालयाने १४ मार्च रोजीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

 या गुन्हयात आता पर्यंत एकुण 09 आरोपी अटक असून सदर गुन्हयाचा पुढील तपास चालू आहे.
बेळगाव आणि कोल्हापूरला जाणाऱ्यांना आनंदाची बातमी
कर्नाटक परिवहन मंडळातर्फे बेळगाव ते कोल्हापूर आणि कोल्हापूर ते बेळगाव नॉन स्टॉप बससेवा गुरुवार पासून सुरू करण्यात आली आहे. या नॉन स्टॉप बससेवेमुळे कोल्हापूरला जाणाऱ्या आणि बेळगावला येणाऱ्या प्रवाशांची चांगली सोय झाली आहे.

 

सकाळी सात वाजता बेळगावहून कोल्हापूरला पहिली नॉन स्टॉप बस निघाली.कोल्हापूर हून देखील पहिली नॉन स्टॉप बेळगाव बस सकाळी सात वाजता निघाली.प्रत्येक अर्ध्या तासाला नॉन स्टॉप बस सेवा असल्याने प्रवाशांची चांगली सोय झाली आहे.सकाळी सात ते सायंकाळी साडे सहा पर्यंत नॉन स्टॉप बस सेवा उपलब्ध असणार असून एकूण चोवीस बस दिवसभरात बेळगावहून कोल्हापूरला आणि कोल्हापूरहून बेळगावला येणार आहेत.कर्नाटक परिवहन मंडळाने सुरू केलेल्या नॉन स्टॉप बस सेवेमुळे प्रवाशांचा प्रवासातील वेळ वाचणार आहे.
त्या मुळे उद्धव ठाकरे गाजराचा हलवा म्हणाले असतील - राम कुलकर्णी
आज सादर झालेला अर्थसंकल्प हा गाजराचा हलवा आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी केल्यानंतर भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी त्यांच्या टीकेला उत्तर देताना हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक असून जनतेला विकासाच्या प्रवाहात अनुन 18 पगड जाती धर्माच्या कल्याणाचा गोड हलवा आहे त्यामुळेच माननीय उद्धव ठाकरे यांनी गाजराचा हलवा अशी उपमा दिली असावी अशी टीका भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली

 
जगात 1 टक्क्यांपेक्षा कमी शुद्ध हवा...
एका नव्या अध्ययनानुसार जागतिक लोकसंख्येच्या एका टक्क्यांपेक्षा कमी लोक प्रदूषण मुक्त हवेत श्वास घेत आहेत.लॅंन्सेट प्लॅनेटरी हेल्थमध्ये प्रकाशित संशोधन अहवालानुसार जागतिक स्तरावर 99.82 टक्के भाग पार्टीक्युलेट मॅटर 2.5 (पी एम 2.5) च्या धोकादायक पातळीच्या संपर्कात आहे.हे प्रमाण जागतिक आरोग्य संघटनेकडून निश्चित सुरक्षा मर्यादेपेक्षा अधिक आहे.

 

जगातील केवळ 0.001 टक्के लोकसंख्या शुद्ध मानल्या जाणाऱ्या हवेचा वापर श्वसनासाठी करत असल्याचे अहवालात म्हटले गेले आहे.ऑस्ट्रेलिया आणि चीनमध्ये वैज्ञानिकांकडून करण्यात आलेल्या या अध्ययनात जगभरात 5 हजारांहून अधिक देखरेख केंद्रे आणि मशीन लर्निंग सिम्युलेशन,हवामानाविषयक डाटा आणि भौगोलिक घटकांचा वापर करण्यात आला.
केजमध्ये महाराजांच्या गाडीवर माथेफिरूची दगडफेक पोलिसांत गुन्हा दाखल
बीडच्या केज तालुक्यातील साळेगाव येथे असलेल्या नित्यानंद आश्रमाचे  मठाधिपती यांच्या गाडीवर एका माथेफिरुणे दगडफेक केली असून महाराजांना ही जिवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात या माथेफिरू विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

गणेश आनंद महाराज हे गावामध्ये सप्ताहाच्या कार्यक्रमाला आले असता यावेळी धोंडीराम गीते या माथेफिरुणे त्यांच्या गाडीवर दगडफेक करून त्यांना जीव मारण्याची धमकी दिली आहे. यामध्ये त्यांच्या गाडीचं नुकसान झाला असून धोंडीराम गीते यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Nepal Presidential Election: नेपाळमध्ये आज राष्ट्रपती निवडणूक

Nepal Presidential Election: नेपाळमध्ये (Nepal) राष्ट्रपतीपदासाठी (President) आज म्हणजेच, गुरुवारी (9 मार्च) निवडणूक होणार आहे. नेपाळी काँग्रेसचे रामचंद्र पौडेल आणि सीपीएएन-यूएमएलचे ( CPAN-UML) सुभाष चंद्र नेमबांग हे राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण झाल्याचं नेपाळच्या निवडणूक आयोगानं बुधवारी (8 मार्च) माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. 


राष्ट्रपतीपदाच्या (Presidential Election) निवडणुकीत प्रतिनिधी सभागृहाच्या दोन माजी वक्त्यांमध्ये लढत आहे. रामचंद्र पौडेल (78) हे आठ पक्षीय आघाडी समर्थित राष्ट्रपतीपदाचे उमेदवार आहेत, तर सुभाष नेमबांग (69) यांना सीपीएएन-यूएमएलकडून राष्ट्रपतीपदाची उमेदवारी देण्यात आली आहे. 

नागपूरच्या उमेरडमधील एमआयडीसीतल्या टायर कारखान्यात आग, परिसरात धुराचे मोठे लोट

Nagpur News : नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील एमआयडीसीमधील टायरवर प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यात आग लागली. जुने टायर जाळून त्याच्यातून तेल काढणाऱ्या कारखान्यात ही आग लागली. या प्रक्रिये दरम्यानच आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. आगीत कारखान्याच्या आवारात प्रक्रियेसाठी ठेवलेले सर्व टायर जळाले आहेत. आगीमुळे परिसरात धुराचे मोठे लोट पाहायला मिळत आहेत. अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांच्या साहाय्याने आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Maharashtra News: कोकणात सध्या शिमगा जोरात साजरा; गावागावांमध्ये देवाचा पालखी सोहळा

कोकणात सध्या शिमगा जोरात साजरा केला जात आहे. गावागावांमध्ये देवाची पालखी नाचवली जात आहे. घरी आलेल्या ग्रामदैवताची सेवा करायला मिळत असल्याने कोकणी माणूस प्रचंड उत्साही आणि आनंदी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा तालुक्यातील गोविळ या गावी शिमगानिमित्त जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होते. यावेळी जिल्हाभरातील सहभागी संघांनी डोळ्यांचे पारणे फिटतील अशा रीतीने आपली कला सादर केली. यावेळी उपस्थिततांकडून देखील त्यांच्या या कलेला दाद दिली गेली. मानवी रूपी गरुड आणि पालखी नृत्य, परात, पेले, खिळे तसेच काचेच्या बॉटल्स वापरत देखील गोविळ गावची ग्रामदैवत असलेल्या आदिष्ठी देवीची पालखी नाचवली गेली. या साऱ्या कसरती थक्क करणाऱ्या होत्या. पारंपारिक ढोल ताशांच्या साथीला फटाक्यांची साथ मिळत होती. तसेच सादर केल्या जात असलेल्या कसरती देखील काळजाचा ठेका चुकवणाऱ्या होत्या.


 
113 वर्ष जुन्या गेट वे ऑफ इंडियाला तडे?
डोंबिवली एम आय डी सी मधील खंबाळपाडा परिसरातील प्राज  टेक्सटाइल कंपनीला रात्री 1 वाजण्याच्या सुमारास  आग लागल्याची घटना घडली. आगीने काही क्षणात रौद्र रूप धारण केल्याने शेजारी असलेली परफ्यूम बनवणारी रॅमसन्स कंपनी देखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. काही क्षणात आगीने रौद्र रूप धारण केल्याने दोन्ही कंपन्या या आगीच्या विळख्यात सापडल्या .रॅमसन्स कंपनीत परफ्युमचा साठा असल्याने मोठ मोठे स्फोट होत होते.या  आगीमुळे कंपन्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

 

याच कंपनीच्या मागील बाजूला सीएनजी चा गॅस पंप असल्याकारणाने आजूबाजूच्या परिसराला मोठा धोका निर्माण झाला होता.आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने घटना स्थळी धाव घेत आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. कल्याण डोंबिवली अग्निशमन विभागासह  भिवंडी,उल्हासनगर, बदलापूर ,नवीमुंबई ,येथून अग्निशमन दलाच्या जवळपास 20  गाड्या घटना स्थळी दाखल झाल्या .या आगीवर  अग्निशमन दलाचे जवान  नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू केले. यां दोन्ही कंपन्या संध्याकाळी बंद  होतात त्यामुळे कर्मचारी घरी निघून गेले होते सुदैवाने जीवितहानी टळली.
Dombivli Fire : डोंबिवलीत दोन कंपन्यांना भीषण आग

Dombivli Fire : डोंबिवली एमआयडीसी (Dombivli MIDC) मधील खंबाळपाडामध्ये दोन कंपन्यांना मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये दोन्ही कंपन्या जळून खाक झालेले आहेत. प्राज टेक्सटाइल कंपनी आणि परफ्यूम बनवणारी रॅमसन्स अशी या कंपन्यांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच कल्याण डोंबिवली मनपा, भिवंडी, उल्हासनगर, बदलापूर येथून अग्निशमन दलाच्या जवळपास 10 पेक्षा अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे.


पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांच्या हा पहिलाच अर्थसंकल्प असणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्थ खाते आहे. त्यामुळे अर्थमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपला पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका लक्षात घेता या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. 


अहमदाबाद 


ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत विविध मुद्यांवर चर्चा करणार आहेत. दोन्ही देशांचे पंतप्रधान भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात हजेरी लावण्याची शक्यता आहे. 


मुंबई 
महाराष्ट्र राज्य वरिष्ठ महाविद्यालय प्राध्यापक आणि कर्मचारी संघटनेनं आझाद मैदानावर आंदोलन सुरु केलंय. हे सर्व कर्मचारी प्राध्यापक 2001 नंतरच्या कायम विनाअनुदानित महाविद्यालयातील आहेत.


ठाणे 
9 मार्च 2006 साली स्थापन झालेल्या मनसेला आज 17 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्त गडकरी रंगायथन मध्ये संध्याकाळी 6 वाजता राज ठाकरेंची सभा होणार आहे. 


नाशिक  
ख्रिस्ती समाजावर होत असलेले अन्याय-अत्याचार, सातत्याने केले जाणारे धर्मांतरांचे आरोप, ख्रिस्ती संस्थांबाबत सापत्नभावांची वागणूक तसेच शासनाचे ख्रिस्ती समाजाबद्दलचे दुर्लक्षिततेचे धोरण याविरोधात ख्रिस्ती समाज बांधवातर्फे मूकमोर्चा काढण्यात येणार आहे.
 
पुणे 
संत तुकाराम महाराजांचा 375 वा बिजोत्सव, देहू येथे कार्यक्रमांचे आयोजन
खासदार सुप्रिया सुळे या दौंड तालुक्यातील गाव भेटीच्या दौऱ्यावर असणार आहेत. दौंड तालुक्यातील विविध गावांना सुप्रिया सुळे भेट देतील.


छत्रपती संभाजीनगर
औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर केल्याच्या निषेधार्थ सुरू असलेल्या साखळी आंदोलनाचा पाचवा दिवस. आज संध्याकाळी 7 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा भडकल गेट कॅण्डल मार्च काढणार आहेत.


सांगली 
गॅस दरवाढीच्या निषेधार्थ सांगलीतील मदन भाऊ पाटील युवा मंचाकडून स्मशानभूमी मध्ये गॅसचे दहन करण्यात येणार आहे, सकाळी 11 वाजता.


जळगाव 
कापूस दरासह विविध मागण्यांसाठी मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदार संघात बोडवड चौफुली ते तहसीलदार कार्यालयावर महाविकास आघाडीकडून जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.


निर्णायक कसोटी सामना 
India vs Australia 4th Test : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमधील अखेरचा सामना नऊ मार्च रोजी अहमदाबादमध्ये होत आहे. चार सामन्याच्या कसोटी मालिकेत भारताने 2-1 ने आघाडी घेतली आहे. आता निर्णायक कसोटी सामन्यात कोण बाजी मारणार? याकडे क्रीडा विश्वाचं लक्ष लागलेय. भारतीय संघात काही बदल होण्याची शक्यता आहे. केएस भरतच्या जागी ईशान किशन याला संधी मिळण्याची शक्यता आहे. तर उमेश यादव याच्या जागी मोहम्मद शामी संघात परतणार आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.