Maharashtra News Updates 16th March 2023 : अवकाळी पावसाने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; लोकल ट्रेन 20 मिनिटे उशिराने

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 16 Mar 2023 09:22 PM
Mumbai Local Train News :  अवकाळी पावसाने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; लोकल ट्रेन 20 मिनिटे उशिराने

Mumbai Local Train News :  अवकाळी पावसाने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. जलद आणि धीम्या मार्गावरील लोकल ट्रेन 20 मिनिटे उशिराने धावत आहे. भांडुप आणि भायखळा स्टेशनवर 2 ठिकाणी लोकल थांबल्या होत्या. अचानक पडलेल्या पावसामुळे पेंटाग्राफ आणि ओव्हरहेड वायरमध्ये स्पार्क होऊन लोकल बंद झाल्या. मात्र काही वेळाने लोकल सुरू करून पुढे सोडण्यात आल्या. सध्या जलद आणि धीम्या मार्गावरील वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहे

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे भवितव्य ठरवणारी सुप्रीम कोर्टातली सुनावणी 21 मार्च रोजी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे भवितव्य ठरवणारी सुप्रीम कोर्टातली सुनावणी 21 मार्च रोजी ठरणार आहे. 


सत्तासंघर्षाची सुनावणी संपल्यानंतर आता न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या बेंचसमोरच सुनावणी होणार आहे.


ऑगस्ट 2022 पासून प्रकरण वारंवार पुढे जात आहे, त्यामुळे आता 21 मार्चला तरी सुनावणी होणार का, निवडणुकांचा मार्ग कधी मोकळा होणार याची उत्सुकता लागली आहे.

नांदेड वादळी वाऱ्यासह,गारपीट, एकाचा मृत्यू

र्धापुर तालुक्यातील आंबेगाव,चनापूर ,,पाटणूर परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली.  वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली. केळीच्या बागांना मोठा फटाका बसला. विजवितरण कंपनीचे विद्युत खांब,तारा तुटल्याने विज पुरवठा खंडित झाला. हरबरा, गहू अंबा आदि पिकांना फटका बसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. बारड येथील शंकर नगर येथे घर कोसळून शिवाजी गजभारे या युवकाचा मृत्यू झाला.

 प्रस्ताव बनवून फाईल पुढे ढकलण्यासाठी ७ लाखाची लाच मागणार्या सिडको अधिकाऱ्याला अटक

 सिडको संपादित जमिनीच्या बदल्यात मिळणाऱ्या भूखंडाची पात्रता प्रस्ताव पुढे पाठवण्यासाठी लाच मागणारा सिडको क्षेत्र अधिकारी लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. ७ लाखांच्या पैकी ३ लाखांचा पहिला हप्ता घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या  क्षेत्र अधिकार्यावर हि कारवाई करण्यात आली असून मुकुंद बंडा असे त्याचे नाव आहे.  नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ पुनर्वसन मध्ये संपादित केलेल्या घराच्या बदल्यात सिडको कडून मिळणार्‍या भूखंडाची पात्रता निश्चित करण्याचा  प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविणे करिता फिर्यादी कडे ७ लाखांची लाच मागण्यात आली होती. या बाबत २ मार्चला फिर्यादीने लाच लुचपत विभागाकडे तक्रार अर्ज दिला होता. १३ तारखेला केलेल्या  पडताळणी दरम्यान बंडा यांनी  यांनी स्वतः साठी व इतरांसाठी एकुण सात लाख रुपये  लाचेची मागणी केली असल्याचे निदर्शनास आले होते. त्यापैकी  ३ लाखाचा पहिला हप्ता स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.

वाढत्या कोव्हिड रुग्णसंख्येवरुन केंद्रीय आरोग्य सचिवांचे राज्याला पत्र 

वाढत्या कोव्हिड रुग्णसंख्येवरुन केंद्रीय आरोग्य सचिवांचे राज्याला पत्र 


१५ मार्च पर्यंत राज्याचा पाॅझिटिव्हीटी रेट १.९२ टक्क्यांवर, संपूर्ण देशाचा पाॅझिटिव्हिटी रेट याच दरम्यान फक्त ०.६१ टक्के 


राज्यात वाढत्या कोव्हिड रुग्णांची संख्या बघता केंद्रीय आरोग्य सचिवांच्या खबरदारी घेण्याच्या सूचना 


गाईडलाईन्सनुसार टेस्टींग करण्याच्या सूचना


कोव्हिड केसेसच्या नव्या क्लस्टर्सवर देखरेख ठेवण्याच्या 


सोबतच इन्फ्यूएन्झा आणि सारीच्या केसेस देखील देखरेख ठेवण्याच्या सूचना 


आंतरराष्ट्रीय प्रवाश्यांचे आणि लोकल क्लस्टर्समधील रुग्णांचे जिनोम टेस्टींग करण्याच्या सूचना 


बूस्टर डोजसंदर्भात जनजागृती वाढवत पात्रधारकांना देण्याच्या सूचना 


कोव्हिड नियमांचे पालन गर्दीच्या ठिकाणी होत आहे की नाही याची खबरदारी घेण्याचं आवाहन

अण्णाभाऊसाठे महामंडळ घोटाळा प्रकरणी माजी आमदार रमेश कदम यांना जामीन मंजूर

अण्णाभाऊसाठे महामंडळ घोटाळा प्रकरणी माजी आमदार रमेश कदम यांना तब्बल आठ वर्षांनी जामीन मंजूर झाला आहे. 

साई रिसॉर्ट प्रकरणी मंडळ अधिकारी सुधीर पारदुले यांना दापोली पोलिसांकडून अटक 

 दापालीतील साई रिसॉर्ट प्रकरणी मंडळ अधिकारी सुधीर पारदुले यांना दापोली पोलिसांनी अटक केली आहे. सदानंद कदम, जयराम देशपांडे नंतर आता पारदुळे यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे. अटकेनंतर पारदुले यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 

Pune Rain :  पुण्यात वादळी-वाऱ्यासह पावसाला सुरुवात

Pune Rain :   पुण्यात वादळी-वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान खात्याने राज्यभर पावसाचा इशारा दिला होता. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. डेक्कन, घोले रोड, आपटे रोड, फर्ग्यूसन रोड, कोथरुड , कर्वे नगर आणि पेठांच्यापरिसरात मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झाली आहे. 

जालना जिल्ह्यात सर्वदूर पाऊस, काही भागात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस.

जालना जिल्ह्यात हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज सर्वदूर पावसाने हजेरी लावली असून, जिल्ह्यातील जालना, भोकरदन, बदनापूर सह मंठा तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली, जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील तळणी परिसरात  वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. यामुळे गहू, ज्वारी, हरभरा पिकांसह मोसंबी , द्राक्ष आणि आंब्याच्या पिकाला याचा मोठा फटका

महाराष्ट्र सत्तासंघर्ष सुनावणी संपली, सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवला

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची घटनापीठासमोरील सुनावणी आज संपली आहे. सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवला आहे  येत्या काही दिवसात निकाल जाहीर होऊ शकतो. 

रत्नागिरीतील अंजणारी घाटात टॅंकर पलटी, चालक गंभीर जखमी

रत्नागिरी :  गोव्याच्या दिशेने जाणारा टॅंकर अंजणारी घाटात पलटी झाला आहे. हा टॅंकर ऑइल वाहतूक करणारा होता. टॅंकर पलटी झाल्यामुळे टँकरमधून मोठ्या प्रमाणात ऑइल गळती झाली. त्यामुळे ऑइल गोळा करण्यासाठी घाटात लोकांनी गर्दी केली होती.  या अपघाताच चालक गंभीर जखमी झाला आहे.  

Jalna Accident: जालन्यात बसला भीषण अपघात; 15 प्रवासी जखमी, दोन जण गंभीर

Jalna Accident: जालना येथून बीडकडे जाणाऱ्या बसचा गोलापांगरी गावाजवळ अपघात झाला आहे. या अपघातात 15 प्रवासी जखमी झाले असून 2 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळतेय. 


अंबडकडून येणाऱ्या जड वाहनानं कट मारल्यामुळे बस चालकाचं नियंत्रण सुटलं आणि बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या खोल खड्ड्यांमध्ये पडून हा अपघात झाला. जखमींना उपचारासाठी जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. 

जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा हायकोर्टात; मागण्या रास्त असू शकतात मात्र संप हा बेदायदेशीरच, याचिकेत दावा

जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा हायकोर्टात


मागण्या रास्त असू शकतात मात्र संप हा बेदायदेशीरच, याचिकेत दावा


सध्या राज्यभरात सुरू असलेल्या संपासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका


वकील गुणरत्न सदावर्ते तातडीच्या सुनावणीसाठी करणार विनंती


विद्यार्थी आणि रूग्णांचे अतोनात हाल होत असल्याचा दाखला

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती 75 डॉलर प्रति बॅरलवर, ब्रेंट क्रूड 74 डॉलर प्रति बॅरलवर व्यवहार करतोय 

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती 75 डॉलर प्रति बॅरलवर, ब्रेंट क्रूड 74 डॉलर प्रति बॅरलवर व्यवहार करतोय 


2021 सालानंतर पहिल्यांदाच कच्च्या तेलाचे भाव 75 डॉलर खाली, 2021 च्या शेवटाला येताना कच्च्या तेलाचे भाव ट्रिगर झाले होते 


मागील 4 दिवसात 10 टक्क्यांहून अधिकची घसरण 


क्रेडिट सुइसमधून देखील गुंतवणूकदारांकडून पैसे काढून घेण्यास सुरुवात, अमेरीकेतील बॅंकिंग सिस्टिमसंदर्भात चिंता वाढली 


भीतीपोटी अमेरीका आणि युरोपमध्ये कच्च्या तेलाच्या मागणीत घट 


भारत कच्च्या तेलाची मोठ्या प्रमाणात आयात करत असल्यानं मोठा फायदा होणार मात्र जागतिक मंदीकडे वाटचालीचं चित्र असल्यानंचिंता 


आरबीआयकडून कच्च्या तेलाच्या किंमती 95 डॉलरच्या खाली राहिल्यास अर्थव्यवस्थेला चांगला फायदा होणार असल्याचं पतधोरणजाहीर करताना केलं होतं स्पष्ट

Nanded News : 12 कोटी लिटर पाणी साठवून नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने पाणी टंचाईवर केली मात

Nanded News : 2019 पूर्वी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत होता.विद्यापीठाच्या बाहेरून विकत पाणी घ्यावं लागत होतं. पण 2019 नंतर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी "क्लीन सिटी ग्रीन सिटी" ही संकल्पना मांडली.ही संकल्पना प्रत्येक्षात उतरविण्यासाठी सुरुवातीला पाण्याचे नियोजन करण्यात आले. यासाठी विद्यापीठातील स्थापत्य अभियांत्रिकी विभागाची मदत घेण्यात आली.साडेपाचशे एकर वर विद्यापीठाच्या विविध विभागाच्या इमारती आहेत.दरम्यान विद्यापीठाच्या परिसरात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यास सुरुवात झाली. परिसरात पडणारा प्रत्येक पाण्याचा थेंब अडवण्यात आला.आणि जमिनीत जिरवण्यात आला.त्यामुळे विद्यापीठ परिसरातील हात पंप,विहीर, आणि शेत तळ्यात पाण्याची पातळी वाढलीय.पाणी टंचाईच्या झळा सोसणाऱ्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने तब्बल 12 कोटी पाणी साठवणीचा नवा विक्रम केला आहे.पाणी टंचाईवर मात करत विद्यापीठ परिसर निसर्ग सौंदर्याने नाटल्याचे दिसत आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


राज्याच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा या आठवड्यातील आज तिसरा दिवस आहे. त्याशिवाय राज्यात दोन मोठी आंदोलन सुरु आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शन योजनेसाठी काम बंद आंदोलन पुकारले आहे तर शेतकऱ्यांच्या विवीध मागण्यांसाठी नाशिकपासून विधानभवनाकेड निघालेलं पायी वादळ मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात पोहचले आहे. तर राज्याच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाचा या आठवड्याचा चौथा दिवस आहे. याशिवाय दिवसभरात अनेक महत्वाच्या घडामोडी घडणार आहेत.. पाहूयात थोडक्यात...







 






सरकारी कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनाचा तिसरा दिवस


मुंबई – जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी सुरू असलेल्या काम बंद आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी बेमुदत संपावर आहेत. संपाचा सर्वसामान्यांना मोठा फटका बसत आहे. राज्यातील अनेक रुग्णालयात रुग्णांचे हाल होत आहेत, तर सरकारी कार्यालयातील कामकाज ठप्प झालयं. शासनाने गठीत केलेली अभ्यास समिती समन्वय समितीस मान्य नाही.  जुनी पेन्यान संदर्भातील नियमावली व तपशील उपलब्ध असताना पुन्हा अभ्यास कसला ? राज्य सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीचा राज्य सरकारला सवाल आहे. 


संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांवर मेस्मानुसार कारवाईला सुरुवात करण्यात आलीय... तर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसाही जारी केल्यात. राज्य सरकारने जुन्या पेन्शन संदर्भात जरी अभ्यास समिती गठित केली असली तरीही समितीच कर्मचारी संघटनांना मान्य नाही त्यामुळे हा संप सुरू राहणार आहे... दहावी बारावी बोर्ड परीक्षा सुरळीत जरी सुरू असल्या तरी पेपर तपासणीवर शिक्षकांनी बहिष्कार टाकल्याने विद्यार्थ्यांचे पेपर झाल्यानंतर शाळांमध्येच राज्यभरात लाखो पेपर तपासणी विना पडून आहेत शिक्षकांकडून हे पेपर तपासणीसाठी घेतले जात नाहीयेत आणि त्यामुळेच पेपर तपासणीला उशीर लागू शकतो आणि परिणामी दहावी बारावी बोर्डाचा निकाल आला विलंब होऊ शकतो.


मुख्यमंत्री आणि किसान सभा बैठक -
शहापूर – शेतकऱ्यांच्या विवीध मागण्यांसाठी नाशिकपासून विधानभवनाकेड निघालेलं पायी वादळ मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात पोहचले आहे. या मोर्चाचा आजचा पाचवा दिवस आहे. ठाणे जिल्ह्यातील कळंब इथून मोर्चाला पुन्हा होणार सुरूवात होणार आहे. आज दुपारी 3 वाजता मंत्रालयात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, संबधित खात्याचे मंत्री, सचिव यांच्यासोबत बैठक त्यांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीसाठी जे पी गावीत यांच्यासोबतच शेतकऱ्यांच शिष्ठमंडळ जाणार आहे. मंत्रालयात बैठक होत असली तरी सकाळपासून आमचा मोर्चा सुरूच राहिल... बैठकीत समाधान झाल तर मोर्चा थांबवू अन्यथा आमचा मोर्चा विधानभवनावरच थांबेल असा इशारा जे पी गावीत यांनी दिलाय. 


सत्तासंघर्षाची सुनावणी -
राज्याच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा या आठवड्यातील आज तिसरा दिवस आहे. जर वकिलांच रिजॉईंडर आज संपलं तर खंडपिठासमोरची सुनावणी पुर्ण होईल. जर युक्तिवाद राहिला तर सुनावणी पुन्हा पुढच्या आठवड्यात जाण्याची शक्यता आहे.  दोन दिवस दोन्ही वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला होता.  राज्यपालांचे वकिल सॉलिटरी जनरल तुषार मेहता यांनी जोरदार युक्तिवाद केला... मेहता यांच्या युक्तिवादादरम्यान सरन्यायधिशांनी अनेक प्रश्नांची सरबत्ती करत राज्यपालांच्या भुमिकेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. जर सुनावणी पुर्ण झाली तर निकाल कोणत्या दिवशी येतो हे पहाव लागेल. 


राऊतांचा हक्कभंग समितीची नोटीस?
मुंबई – राज्याच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाचा या आठवड्याचा चौथा दिवस आहे. अनेक मुद्यांवरून विरोधक आजही आक्रमक होण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांना विधान भवन हक्कभंग समितीकडून नोटीस पाठवण्यात आल्यानंतर आता आज विधानपरिषद हक्क भंग समितीच्या वतीने देखील नोटीस पाठवण्यात येणार आहे. यासाठी सकाळी साडेअकरा वाजता हक्कभंग समितीच्या सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीनंतर संजय राऊत यांना त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत उत्तर देण्यासाठी नोटीस पाठवण्यात येईल.


एच३ एन२ यावरती मुख्यमंत्र्यांची आढावा बैठक 


नवीन व्हायरस एच3 एन2 यावरती मुख्यमंत्री आढावा बैठक घेणार आहे. यावेळी आरोग्य मंत्री आणि सर्व अधिकारी उपस्थित राहतील. या व्हायरसमुळे काही उपाय योजना करायच्या का? यावरती ही निर्णय होण्याची शक्यता आहे. 


अवकाळी पावसाची शक्यता 


हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी गारपीट देखील होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नागपूर विभागात चार दिवस गारांसह अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. नागपूर,चंद्रपूर, गडचिरोलीत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. शेतकऱ्यांसह सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार नागपूर विभागात आजपासून 19 मार्चपर्यंत वादळी वारे, गारपीट तसेच पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.  आज आणि उद्या नागपूर, चंद्रपूर व गडचिरोली या तीन जिल्हयात अतिसतर्कतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट)  देण्यात आला आहे... मात्र, महसूल व कृषी विभागातील कर्मचारी संपावर असल्याचे प्रशासकीय यंत्रना अवकाळी पावसाच्या संकटात कशी काम करेल याबाबत प्रश्न चिन्ह आहे.


चंद्रपूर - सामाजिक कार्यकर्त्या पारोमिता गोस्वामी यांच्या संपदा अर्बन निधी लिमिटेड या बचत बँकेला अनधिकृत घोषित करण्यावरून मोठा वाद निर्माण झालाय. चंद्रपूरच्या आर्थिक गुन्हे शाखेने एक पत्र काढून गोस्वामी यांच्या बचत बँकेसह आणखी दोन बँकांना अनधिकृत घोषित केले आहे. केंद्रीय कार्पोरेट मंत्रालयाने विशिष्ट एन डी एच 4 प्रमाणपत्र नसण्यावरून ही बँक अनधिकृत असल्याची घोषणा केली आहे. या बँकेत यापुढे कुणीही सदस्यत्व घेऊ नये असे eow ने म्हंटलं आहे, तर दुसरीकडे आपल्या एनडीएच 4 प्रमाणपत्राची प्रक्रिया प्रलंबित असून प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपल्याला प्रमाणपत्र मिळणार असल्याने आर्थिक गुन्हे शाखेने केलेली घोषणा अन्यायकारक असल्याचे गोस्वामी यांचे मत आहे, एन डी एच 4 च्या प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून एडवोकेट गोस्वामी व चंद्रपूर पोलीस समोरासमोर उभे ठाकले आहे (


मुंबई – पंढरपूर प्रस्तावित कॉरेडॉर आणि इतर सुविधांबाबत आज दुपारी 3 वाजता विधानभवनात बैठक आयोजित केली आहे... उपसभापती निलम गोऱ्हे यांनी ही बैठक बोलावली आहे... 



रत्नागिरी - राज्यभर असलेल्या संपामुळे रुग्णांचे हाल होत असल्याची बाब आता समोर आली आहे. या साऱ्यामध्ये रत्नागिरी जिल्हा मनोरुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी माणुसकी जपली आहे. रुग्णांचे हाल होऊ नयेत यासाठी मनोरुग्णालयातील 78 कर्मचाऱ्यांपैकी 54 कर्मचाऱ्यांनी कोणत्याही प्रकारे संघटनांच्या दबावाला बळी न पडता आपली सेवा अखंडपणे सुरू ठेवली आहे. आपल्या हक्कांना दुय्यम स्थान देत या कर्मचाऱ्यांनी रुग्णांच्या सेवेला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे हे उदाहरण आदर्शवतच म्हणावं लागेल


दिल्ली – अदाणीच्या मुद्यावरून मोदी सरकारला घेरण्यासाठी विरोधकांची रणणीती... राष्ट्रपतींना भेटण्याचा विचार विरोधी पक्ष करत आहेत... आज सकाळी संसदेत विरोधी पक्षांची बैठक आहे, त्या बैठकीत राष्ट्रपतींना भेटण्याची वेळ मागू शकतात, त्यावर चर्चा होईल.


दिल्ली – तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांची मुलगी कविती या आज सकाळी 11 वाजता इडी कार्यालयात येतील... सकाळी 10 वाजता त्या पत्रकार परिषद घेतील आणि त्यानंतर चौकशीसाठी येतील


दिल्ली – दारू घोटाळ्यावरून भाजपचा आजपासून 26 मार्चपर्यंत विरोध प्रदर्शन... भाजपचे वरिष्ठ नेते आपआपल्या परिसरातील घराघरात जाऊन दारू घोटाळ्याच्या भ्रष्टाचाराबाबत माहिती देतील... दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा राजीनामा भाजपकडून मागीतला जाईल.


पॉंन्डेचरी – H3N2 व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पहाता पॉंन्डेचरीतील सगळ्या शाळा आजपासून 26 मार्चपर्यंत बंद रहातील... बुधवारी पॉंन्डेचरीच्या शिक्षणमंत्र्यांनी तशी घोषणा केलीय


मुंबई - महाराष्ट्र भूषण पुरस्कार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहीर केला तो रद्द  करण्यासाठी आणि रघुवीर चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांचे संबंध दाखवण्यात आले आहेत याला संभाजी ब्रिगेड विरोध करणार आहे. त्यांचा नक्की विरोध का आहे या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधतो - अल्पेश


मुंबई - कोविड 19 च्या काळात कोरोनामुळे लाखोंच्या संख्येनं लोकांनी आपले प्राण गमवाले. ज्यात बेताची आर्थिक परिस्थिती असलेल्या अनेक कुटुंबातील कर्त्या व्यक्तिचा मृत्यू झाल्यानं त्या कुटुंबाचे अतोनात हाल झाले. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती. त्यावर केंद्रानंतर राज्य सरकारनं पीडित मृत व्यक्तिच्या कुटुंबियांना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती. त्यानुसार अनेकांनी या योजनेच्या नियमावलीनुसार जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन किंवा पोस्टानं अर्ज दाखल केला आहे. मात्र, अद्याप त्यांना ही रक्कम मिळाली नसून त्याबाबत विचारणा केली असता ऑनलाईन अर्ज मागवत आहोत, असं उत्तर देत त्यांना या रक्कमेपासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप करत प्रमेय वेल्फेअर फाऊँडेशनच्यावतीनं हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे, त्यावर आज सुनावणी होईल.


मुंबई -  नाशिकमधील शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचं राज्यसभा निवडणुकीतील मत रद्द केल्याप्रकरणी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलेले आदेश रद्द करण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे, या याचिकेवर आज सुनावणी होईल.



पुणे - भारतीय वायुदलाचा महत्वाचा तळ लोहगावमधे आहे. या तळावर दक्षिण भारताची हवाई सुरक्षा करण्याची जबाबदारी आहे.  या वायुदलाच्या तळाचा एक भाग आहे बॉंब डम्पिंग गोडाऊन.  हे गोडाऊन 72 एकरांमधे पसरले आहे. हे अंडरग्राऊंड गोडाऊन आहे.  जेव्हा लढाऊ विमानांना शत्रु पक्षावर हल्ला करण्याची वेळ येते तेव्हा या अंडरग्राऊंड गोडाऊन मधील बॉंब लढाऊ विमानांना जोडले जातात. विमानांना अटॅच होणारे अडिच हजार जिवंत बॉंब या अंडरग्राऊंड गोडाऊनमधे आहेत.  या गोडाऊनच्या 72 एकर जागेला पूर्णपणे कंपाऊंड आहे. वरुन पाहिल्यावर ही मोकळी जागा दिसते..मात्र जमिनीखाली 15 फूट खोल हे गोडाऊन आहे.  या 72 एकरातील गोडाऊनच्या कंपाऊंड वॉल पासून 900 मिटर अंतरापर्यंत शेती व्यतिरिक्त कोणतेही बंधन किंवा एक्टीव्हटी करण्यास मनाई आहे. मात्र या नऊशे मीटरच्या आतमधे अनेक गंभीर गोष्टी सुरु आहेत.  सी एन जी रिफीलींग प्लान्ट आहे.  डांबर आणि सिमेंट विटा तयार करणारे प्लान्ट आहेत आणि इतरही अनेक गोष्टी आहेत.  वायुदलाने लक्ष न दिल्याने ही अतिक्रमणे वाढलीयत. यावर डिफेन्स इस्टेट विभागाचे म्हणणे, हवाई दलातील निवृत्त अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 


अहमदनगर -  अहमदनगर पोलीस दलाच्या वतीने आज कर्जतच्या दादा पाटील महाविद्यालयात जातीय सलोखा मेळावा घेतला जाणार आहे... या मेळाव्यासाठी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर यांच्यासह पोलीस अधीक्षक राकेश ओला उपस्थित राहणार आहेत... दुपारी 12 वाजता हा मेळावा होईल... अहमदनगर जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारी आणि हिंदू-मुस्लिम वादाच्या पार्श्वभूमीवर विशेष पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर यांची प्रतिक्रिया 


- श्रीगोंद्याच्या मखरेवाडीतील वंदना शिंदे या महिलेने चोरट्यांच्या भीतीने चार तोळ्याचे सोन्याचे गंठण घरातील रद्दीत लपवून ठेवले होते, त्यांनी घरातील भंगार आणि रद्दी ही एका फेरीवाल्याला विकली... त्यात नजरचुकीने ते गंठण देखील भंगारासोबत गेलं... शेतात काबाडकष्ट करुन पै पै करून केलेलं सोन्याचे गंठण गेल्याने त्यांना काय करावं सुचेना, भंगारावाला परिचयाचा नसल्याने त्या चिंतेत होत्या त्यांच्या कुटुंबियांनी इतर भंगार व्यवसायिकाशी संपर्क केला असता त्यातील एका व्यावसायिकाने सर्वच भंगार गोळा करणाऱ्या मुलांकडे चौकशी केली त्यातील एका मुलाच्या भंगारात ते गंठण सापडलं त्याने कोणताही लोभ न बाळगता ते गंठण परत केलं... चुकीच्या पद्धतीने पैसे कमावून गर्भश्रीमंत होणाऱ्यांपेक्षा कितीतरी पटीने श्रीमंत असल्याचेच या भंगारवाल्याने दाखवून दिलं


लातूर - व्हीएस पँथर्स युवा संघटनच्या वतीने आज 11 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ब्राँझ धातूचा ७२ फुटी पुतळा कायमस्वरूपी करण्यात यावा, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कचे सुशोभीकरण करण्यात यावे या व इतर महत्वपूर्ण मागण्यासाठी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या महामोर्चाच्या आयोजन आणि नियोजनाच्या अनुषंगाने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.


- गोरेगाव शहराला लागून असलेल्या श्रीरामपूर गावात तीन दिवसीय जंगी शंकर पटाचे आयोजन करण्यात आले आहे. या जंगी शंकर पटाला तुफान गर्दी उसळली आहे. लाखोच्या संख्येने दर्शक या ठिकाणी आले असून महाराष्ट्रासह लगतच्या मध्यप्रदेशातुन देखील बैल जोडीसह शेतकऱ्यांनी या संकर पटात सहभाग घेतला आहे . बैलांच्या शर्यतींवरून बंदी उठल्याने शंकर पटाचे आयोजन करण्या पुन्हा एकदा सुरवात झाली असून शेकऱ्यांमध्ये आनंद दिसून येत आहे. तर या शंकर पटात विक्रमी 400 च्या वर बैलजोड्या सहभागी झाल्या आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.