सिडनी :  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पाचवी कसोटी सिडनी येथे सुरु झाली आहे. गेल्या काही दिवसांमधील घडामोडीनंतर अपेक्षेप्रमाणं रोहित शर्मा सिडनी कसोटीत भारतीय संघात खेळत नाही. रोहित शर्माच्या जागी भारतीय क्रिकेट संघाचं नेतृत्त्व जसप्रीत बुमराह करत आहे. रोहित शर्माला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर अपेक्षेप्रमाणं कामगिरी करता आलेली नाही. सिडनी कसोटीत रोहित शर्मानं स्वत:हून बाहेर राहण्याचा निर्णय घेतला. याबद्दल भारतीय संघातून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. 


भारतीय क्रिकेट संघाचा विकेटकीपर रिषभ पंतनं रोहित शर्माच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की रोहित शर्माचा निर्णय स्वार्थाच्या पुढं जाऊन भावनात्मक आहे. हा त्याचा स्वत:चा निर्णय होता की तो प्लेईंग इलेव्हनचा सदस्य असणार नाही, असं रिषभ पंतनं म्हटलं. 



रिषभ पंत म्हणाला,रोहित शर्माचा हा भावनिक निर्णय आहे, दीर्घकाळापासून तो आमचा कॅप्टन आहे. आम्ही त्याला संघाचं नेतृत्त्व करताना पाहिलं आहे. मात्र, काही निर्णय असे असतात, ज्यामध्ये तुम्ही सहभागी नसता, हा व्यवस्थापनाचा निर्णय होता. मी त्या चर्चेचा भाग नव्हतो.त्यामुळं मी त्याबाबत जास्त बोलू शकत नाही, असं रोहित शर्मानं म्हटलं.   


मेलबर्न कसोटीतील पराभवानंतर भारतीय संघाविषयी वेगवेगळ्या बातम्या येत होत्या. रोहित शर्मा आणि गौतम गंभीर यांच्यात धुसफूस असल्याच्या चर्चा सुरु होत्या. दोघे एकमेकांना टाळत असल्याचंही पाहायला मिळालं होतं. 


सिडनी कसोटीत भारतीय संघात रोहित शर्माच्या जागी शुभमन गिल तर आकाशदीपच्या जागी प्रसिद्ध कृष्णाला संधी मिळाली आहे. जसप्रीत बुमराहनं टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.भारताचा संघ पहिल्या डावात 185 धावांवर बाद झाला.भारताकडून सर्वाधिक धावा रिषभ पंतनं केल्या. स्कॉट बोलंडनं सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. मिशेल स्टार्कनं 3 आणि पॅट कमिन्सनं 2  तर नॅथन लायननं एक विकेट घेतली. 


मेलबर्न कसोटीत चांगली फलंदाजी करणारा यशस्वी जयस्वाल या कसोटीत लवकर बाद झाला. भारताकडून रिषभ पंतनं 40 धावा, रवींद्र जडेजानं 26 धावा तर जसप्रीत बुमराहनं 22 धावा केल्या. भारताच्या टॉप फलंदाजांनी आज देखील निराशा केली. दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियानं 1 बाद 9 धावा केल्या होत्या. 




इतर बातम्या :