Maharashtra News Updates 19th May 2023 : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 19 May 2023 10:10 PM
Mumbai News: मुंबई: शिवसेना ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेडमध्ये झाली मातोश्रीवर बैठक

Shiv Sena: शिवसेना ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेडमध्ये झाली मातोश्रीवर बैठक


शिवसेना ठाकरे गट व संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्रात 'संयुक्त मिळावे' सुरू होणार, संयुक्त पहिला मेळावा लवकरच मुंबईत व त्यानंतर पुण्यात होणार


जाती आणि धार्मिक वाद मिटवण्यासाठी संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रात प्रबोधन करणार...


ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेड यांच्यात जिल्हास्तरावर सुद्धा मेळावे होणार


आज मातोश्री मुंबई येथे शिवसेना ठाकरे गट - संभाजी ब्रिगेड समन्वय समितीची बैठक झाली. बैठकीमध्ये अनेक विषयांवर चर्चा

Gondia News: गोंदिया शहरातील भीमनगर येथे भरदिवसा युवकाची हत्या; अवैध अमली पदार्थाच्या व्यवसायाlतून हल्ला झाल्याचा अंदाज

Gondia News: अवैध अमली पदार्थाच्या व्यवसायात गुंतलेल्या तरुणावर घरात घुसून ३ ते ४ हल्लेखोरांनी वार केले. या अचानक झालेल्या हल्ल्यात गोंदिया येथील पंकज मेश्राम याचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान पंकज सोबत मध्यस्थी करण्यासाठी घरात आलेल्या कान्हा विठ्ठल नावाच्या तरुणावरही आरोपींनी हल्ला केला आहे. भीमनगर परिसरातील पंचशील झंडा चौकाजवळील एका घरात ही घटना घडली. विशेष म्हणजे सलग दोन दिवसात गोंदिया जिल्ह्यात 2 हत्या झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.

समीर वानखेडेंनी तपासांत सहकार्य करावं, तूर्तास त्यांना अटक करणार नाही; सीबीआयची हायकोर्टात ग्वाही

समीर वानखेडेंना उद्या सीबीआय कार्यालयात जाऊन जबाब नोंदवण्याचे निर्देश


वानखेडेंच्या याचिकेवर सीबीआयला सोमवारपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश


समीर वानखेडेंनी तपासांत सहकार्य करावं, तूर्तास त्यांना अटक करणार नाही, सीबीआयची हायकोर्टात ग्वाही


वानखेडेंनी सीबीआय तपासअधिका-यांकडे जाऊन आपला जबाब नोंदवावा - हायकोर्टाचे निर्देश 

Sameer Wankhede: कारवाई सूडबुद्धीनं केली हा दावाच चुकीचा; वानखेडेंवरील कारवाई केंद्र सरकारची परवानगी घेऊन केली; सीबीआयचा हायकोर्टात दावा

Sameer Wankhede: समीर वानखेडे यांनी त्यांच्याविरोधातील कारवाई सूडबुद्धीनं केली हा दावाच चुकीचा असल्याचे सीबीआयने हायकोर्टात म्हटले. वानखेडेंवरील कारवाई केंद्र सरकारची परवानगी घेऊन केली असल्याचा सीबीआयने हायकोर्टात दावा केला. 

Chandrapur News: चंद्रपूर जिल्ह्यात सिमेंटचे पोल घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटल्यानं 2 जणांचा मृत्यू

Chandrapur News: चंद्रपूर जिल्ह्यात सिमेंटचे पोल घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटल्यानं 2 जणांचा मृत्यू झालाय, तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. मूल तालुक्यातील पिंपरी-दीक्षित येथील ही घटना असून मिथुन मराठे (35) आणि अंकित गंडेशिवार (30) अशी मृतांची नावं आहेत. मृतक आणि जखमी हे सर्व मूल तालुक्यातील केळझर येथील रहिवाशी असून केळझर येथून चिंचाळा येथे सिमेंट पोल नेत असताना पिंपरी-दीक्षित येथे वळणावर ट्रॅक्टर अनियंत्रित झाला आणि सिमेंट पोल अंगावर पडून 2 जण जागीच दगावले. जखमींना पोंभुरणा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून बेजबाबदारपणे सिमेंट पोलची वाहतूक करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. 

यवतमाळ पोलीस दलाकडून अडीच हजार रक्त पिशव्यांचे संकलन; यवतमाळ, दारव्हा, वणी उपविभागात शिबिराचे आयोजन





Yavatmal News : यवतमाळ पोलीस अधीक्षकांनी पदभार स्वीकारला त्यावेळी सामाजिक आढावा घेतला. उन्हाळ्यात रक्ताची गरज असताना रक्ताची मागणी आणि त्या तुलनेत कमी पुरवठा होत असल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. गरजू रुग्णांना रक्ताचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी जास्तीत जास्त दात्यांना रक्तदानासाठी प्रोत्साहित करता यावे म्हणून पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांच्या संकल्पनेतून पोलीस दलाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या तीन दिवसात राबवलेल्या शिबिरातून दोन हजार 516 रक्त पिशव्यांचे संकलन करुन जिल्हा रुग्णालयाकडे सुपूर्द करण्यात आले.





जळगावातील चाळीसगावात गावगुंडांची दहशत, रुग्णालयात घुसून तरुणाला बेदम मारहाण
Jalgaon News : जळगावच्या चाळीसगाव शहरात एका खाजगी रुग्णालयात काम करणाऱ्या तरुणाला काही गावगुंडांनी रुग्णालयात घुसून बेदम मारहाण केली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. मारहाण करण्यात आलेल्या तरुणावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून संबंधित आरोपींवर चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुन्या वादातून हा मारहाणीचा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी मारहाण करणाऱ्या आरोपींना अटक केली आहे.
जळगावातील चाळीसगावात गावगुंडांची दहशत, रुग्णालयात घुसून तरुणाला बेदम मारहाण
Jalgaon News : जळगावच्या चाळीसगाव शहरात एका खाजगी रुग्णालयात काम करणाऱ्या तरुणाला काही गावगुंडांनी रुग्णालयात घुसून बेदम मारहाण केली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. मारहाण करण्यात आलेल्या तरुणावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून संबंधित आरोपींवर चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुन्या वादातून हा मारहाणीचा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी मारहाण करणाऱ्या आरोपींना अटक केली आहे.
Kokan News: कोकणात यावर्षी तब्बल 491 गावे आणि वाड्या संभाव्य दरडग्रस्त

Kokan News: कोकण आणि नैसर्गिक आपत्ती हे समीकरण आता पावसाळ्यात ठरलेले आहे.कोकणातील रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढू लागले आहे.कोकणात यावर्षी प्रशासकीय यंत्रणांनी केलेल्या सर्वेक्षणात तब्बल 491 गावे आणि वाड्या संभाव्य दरडग्रस्त असल्याची नोंद करण्यात आली आहे..

भुसावळ - पुणे हुतात्मा एक्स्प्रेस महिनाभर रद्द, रेल्वे प्रशासनाचा निर्णय..

Train Update :  उन्हाळ्याच्या सुट्ट्या व  गर्दीच्या काळात मध्य रेल्वे प्रशासनाने मनमाडमार्गे दररोज धावणारी भुसावळ - पुणे  व्हाया पनवेल हुतात्मा एक्स्प्रेस ही गाडी 20 मे ते 19 जूनपर्यंत महिनाभर दोन्ही बाजूने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. खानदेशसह नाशिक जिल्ह्यातील प्रवाश्यांची मोठी गैरसोय होणार असल्याने नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान भुसावळ-पुणे एक्स्प्रेसचा रॅक इगतपुरी- भुसावळ मेमू या गाडीसाठी संलग्न करण्यात आला आहे. पर्यायी म्हणून ' मेमू ' ट्रेन या काळात दररोज धावणार आहे.

Mumbai News: अमृता फडणवीसांना धमकी आणि लाच देण्याचा प्रयत्न प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल 

Mumbai News: अमृता फडणवीसांना धमकी आणि लाच देण्याचा प्रयत्न प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल 


मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकानं (एसआयटी) भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत स्थापन विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं

 

बुकी अनिल जयसिंघानी, त्याची मुलगी अनिक्षा जयसिंघानी आणि चुलत भाऊ निर्मल जयसिंघानी विरोधात दाखल करण्यात आलाय हे आरोपपत्र

 

तपास अधिकारी एसीपी रवी सरदेसाई यांनी दाखल केलेल्या 733 पानांच्या आरोपपत्रात पोलिसांनी 13 साक्षीदारांचा उल्लेख 

 

पोलिसांनी लाच प्रतिबंधक कायद्याच्या कलम 8 (भ्रष्ट किंवा बेकायदेशीर मार्गाने, सार्वजनिक सेवकावर प्रभाव पाडण्यासाठी) आणि 12 (कलम 7 किंवा 11 नुसार केलेल्या गुन्ह्यांना उत्तेजन देण्यासाठी शिक्षा) आणि आयपीसी कलम 120 (ब) (कट रचणे) अन्वये गुन्हा दाखल केला होता

 

मात्र त्यानंतर यातृकलम 385 (खंडणी) देखील जोडण्यात आलं 

 

मुंबई पोलिसांना या प्रकरणात सीआरपीसी कलम 173 (8) नुसार पुढील तपासासाठी खुलं असल्याचं  आरोपपत्रात म्हटलेलं आहे

 

अमृता फडणवीस यांनी 20 फेब्रुवारी रोजी मलबार हिल पोलिसात दाखल केली होती तक्रार 

 

 या तक्रारीत बुकी अनिल जयसिंघानी  आणि त्याती मुलगी अनिक्षाने त्यांना  ब्लॅकमेल केले आणि धमकी देत  त्यांच्या कडून 10 कोटी रुपये खंडणी  उकळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता 

 

अनिक्षा जयसिंघानीला या प्रकरणात अटक करण्यात आली होती

 

अनिल जयसिंघानी आणि निर्मलला 20 मार्च रोजी गुजरातहून अटक केली होती
Beed News: पक्ष विरोधी कारवाई केल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे बीड जिल्हा प्रमुख अप्पासाहेब जाधव यांची तडकाफडकी हकालपट्टी

Beed News: पक्ष विरोधी कारवाई केल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे बीड जिल्हा प्रमुख अप्पासाहेब जाधव यांची तडकाफडकी हकालपट्टी केल्याची घोषणा सामना दैनिकातून करण्यात आली आहे.


बीड मध्ये महाप्रबोधन सभेच्या स्थळाची पाहणी करताना सुषमा अंधारे आणि आप्पासाहेब जाधव यांच्या वाद झाला होता.


सुषमा अंधारे वरती आप्पासाहेब जाधव यांनी गंभीर आरोप केले होते.

Mumbai News: राज्यातील सरकारी शाळांच्या गणवेशा संदर्भात निर्णय कधी? 

Mumbai News: राज्यात 'एक रंग एक गणवेश' धोरण यावर्षी राबवले जाणार की पुढल्या वर्षी ? यासंदर्भात शिक्षण विभागाने स्पष्टता आणावी शाळा व्यवस्थापनाची मागणी


 

नवीन शैक्षणिक वर्ष 15 जून पासून सुरू होत आहे. त्यामुळे शाळा सुरू होण्यास अवघा 1 महिना बाकी असताना अद्याप शिक्षण विभागाकडून राज्यातील सर्व सरकारी शाळांबाबत 'एक रंग एक गणवेश' धोरणाबाबत अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही.

 

या संदर्भात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शाळा व्यवस्थापन आणि अधिकाऱ्यांसोबत 11 मे रोजी बैठक घेतल्यानंतर सुद्धा हे धोरण नेमकं कधी राबवले जाणार ?? याबाबत स्पष्टता दिलेली नाही

 

 त्यामुळे गणवेशाचा रंगच माहीत नसल्याने कोणत्या गणवेशाची ऑर्डर द्यायची ? असा प्रश्न शाळा प्रशासनाला पडला आहे

 

शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी मे महिन्यात जिल्हास्तरावर गणवेशासाठी निधी मिळतो आणि विद्यार्थी संख्येनुसार तो शाळांना दिला जातो... त्यानंतर शाळा व्यवस्थापन कापड खरेदी करून विद्यार्थ्यांच्या कपड्यांचे माप घेऊन गणवेश शिवून घेण्याची ऑर्डर देते

 

मात्र नव्या शैक्षणिक वर्षात सर्व सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये एकच गणवेश करण्याचा विचार शिक्षण विभागाचा आहे. अद्याप अधिकृत निर्णय न झाल्याने शाळा व्यवस्थापन समोर गणवेश कापड खरेदीची ऑर्डर कधी द्यायची ? गणवेश कधी शिवून घ्यायचे ? असा प्रश्न उभा राहिला आहे 

 

त्यामुळे गणवेश बदल करायचा असल्यास आणि सर्व राज्यातील सरकारी शाळांमध्ये एकच गणवेश करायचा असल्यास त्या संदर्भात अधिकृत निर्णय तातडीने घ्यावा, अशी मागणी शाळा व्यवस्थापनांकडून केली जातीये

 

जर यावर्षी हा निर्णय लागू होणार नसेल त्या प्रकारे अधिकृतरित्या परिपत्रकानुसार माहिती द्यावी जेणेकरून शाळांमध्ये गणवेशा संदर्भात संभ्रम राहणार नाही असं शाळा व्यवस्थापनाचे म्हणणं आहे
Sangli News : अपघातातून लवकर बरं व्हावं म्हणून चक्क रस्त्यावर दिला बोकडाचा बळी; विट्यातील धक्कादायक प्रकार समोर

Sangli News : विटा ते कराड राष्ट्रीय महामार्गावर मध्यवर्ती चौकापा सून साधारणपणे दीड किलोमीटर अंतरावर श्वेता स्टील हे फर्निचरचे दुकान आहे. मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास एक चार चाकी गाडी आली, त्यातून दोन व्यक्ती खाली उतरल्या. एकाच हातात  कोकरू होते आणि त्यांनी त्या पिल्लाला  खाली पाडून तिथेच त्याच्या मानेवर सूरी फिरवली. त्यावर ते काहीक्षण ओरडून निपचित पडले, तसे त्याचे मुंडके आणि गुडघ्यापासून खालचे पुढचे दोन पाय धडा वेगळे केले आणि एका वर्तमान पत्राच्या कागदावर नारळ, रोट्या, तांदूळ, औषधाच्या गोळ्या,एक अंडं, काजळ, पावडर, लिंबू, दारूची बाटली असले साहित्य ठेवले आणि त्या व्यक्ती पसार झाल्या. ही घटना  शेजारी राहणाऱ्या एका महिलेला दिसली. तशी ती महिला जोरात ओरडून अक्षरशः गांगरून गेली आणि जागीच बेशुद्ध पडली. घरातील अन्य व्यक्तींनी तिला उठवून विचारले असता तिने समोर पाहिलेले दृश्य सांगितले त्यावेळी एखाद्या लहानग्याचा नरबळी दिला की काय? अशी भीती त्या घरातील लोकांना वाटली. त्यांनी लगेच काही सामाजिक कार्यकर्तेकडे संपर्क साधला आणि घडलेली हकीकत सांगितली. त्यावर काही लोकांनी तात्काळ घटनास्थळी जात  प्रत्यक्ष येऊन पाहणी केली असता त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून लगेच पोलिसांना बोलावले. त्यानंतर हा सर्व प्रकार पोलिसांच्याही निदर्श नास आला. त्यावर जादूटोणा प्रतिबंध कायद्यानुसार संबंधित दोघा व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.  दरम्यान  विटा शहरात भर रस्त्यावर बोकड बळी देणार्या व्यक्ती वर आणि असे अघोरी कृत्य करण्याचा सल्ला देणाऱ्या मांत्रिकावर विटा पोलिसांनी जादूटोणाविरोधी कायदा नुसार कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनी केलीय.

Sangli News: अमावास्येच्या दिवशी नरसोबावाडीमध्ये पंचगंगेच्या काठावर पार पडतात आज विविध विधी

Sangli News: आज  वैशाख अमावस्या असून दर अमावास्येच्या  दिवशी कोल्हापूर जिल्ह्यातील नरसोबावाडी मधील दत्त मंदिराच्या परिसरातील कृष्णा आणि पंचगंगेच्या काठावर असलेल्या संगम स्थानावर पितरांच्या शांतीसह आज  अनेक पितृशांतीचे विधी पार पडतात.  अमावास्येच्या दिवशी नद्यांमध्ये स्नान करून जप, तपश्चर्या आणि दान ही धार्मिक कार्ये केली जातात. तसेच पितरांच्या शांतीसाठी अन्नदान करण्यासाठी अमावस्या शुभ मानली जाते. तसेच पितरांच्या शांतीसाठी अनेक विधी देखील नरसोबावाडी मधील पंचगंगेच्या काठावर पार पडतात. यामुळे नरसोबावाडी मध्ये पंचगंगेच्या काठावर  पितरांच्या शांतीसह आज  अनेक विधी  पार पाडतात आणि हे विधी करण्यासाठी भाविक या नरसोबवाडी मंदिर परिसरात दाखल होतात.

Buldhana News: बुलढाण्यात टोमॅटोला प्रतिकिलो दीड ते दोन रुपये भाव

Buldhana News: संकट जणू काही शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलिय की, काय असा प्रश्न सध्या उभा राहत आहे. त्याच कारणही तसचं आहे. आधी अस्मानी संकट... नंतर सुलतानी संकट... याच फेऱ्यात शेतकरी यंदा अडकलाय असं दिसत आहे. मोठ्या मेहनतीने लागवड केलेली टोमॅटोची बाग... भर उन्हात पाणी देऊन, मशागत करून उभी केली. मात्र एन उत्पन्नाच्या काळात टोमॅटोला फक्त दीड ते दोन रुपये किलोचा भाव मिळत असल्याने शेतकरी पुन्हा पुन्हा हवलदील होताना दिसत आहे.


बुलढाणा जिल्ह्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी आता अडचणीत सापडले आहेत. किलोला दीड ते दोन रुपये भाव मिळत असल्याने उत्पादन खर्च तर सोडाच पण टोमॅटो तोडणीचा खर्चही निघत नसल्याने टोमॅटो शेतातच वाढत्या तापमानामुळे खराब होत असल्याने शेतकर्यांनी टोमॅटो तोडणी सोडून दिली आहे. हजारो रुपये टोमॅटो लागवडीसाठी खर्च करूनही शेतकऱ्यांना भावा अभावी शेतातच टोमॅटो सोडून द्यावी लागत आहे. आणि त्यामुळे आता अशा भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने अनुदान जाहीर कराव अशी मागणी ही होताना दिसत आहे.

Ahmadnagar: व्यापाऱ्यांनी शेवगाव बंद घेतला मागे

Ahmadnagar: शेवगाव येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणुकीवेळी दगडफेक झाल्याने शेवगावमध्ये तणाव निर्माण झाला होता याच पार्श्वभूमीवर शेवगावमधील व्यापाऱ्यांनी बेमुदत बंद पुकारला होता...मात्र संबंधित प्रशासनाला आपल्या मागण्यांचे निवेदन देऊन त्यांच्याकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर व्यापाऱ्यांनी आपला बंद मागे घेतला आहे. त्यामुळे आजपासून शेवगाव शहराचे जनजीवन पूर्वपदावर येणार आहे. अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे अहमदनगर प्रतिनिधी सुनिल भोंगळ आपल्या सोबत जोडले गेलेत.

Ganeshotsav 2023: यंदाच्या गणेशोत्सवात घरगुती स्तरावर पर्यावरणपूरक श्रीगणेशमूर्ती बंधनकारक

Ganeshotsav 2023: यंदाच्या गणेशोत्सवात घरगुती स्तरावर पर्यावरणपूरक श्रीगणेशमूर्ती बंधनकारक


गणेशोत्सवसाठी घरगुती गणेशमूर्ती 4 फूट पर्यंत उंची असणाऱ्या आणि केवळ शाडू माती, पर्यावरणपूरक घटकांपासून घडविलेल्या असणे बंधनकारक

 

पर्यावरणपूरक श्रीगणेशमूर्ती तयार करण्यासाठी प्रत्येक विभागात एक जागा मोफत उपलब्ध करुन देण्याचे निर्देश

 

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारण्यासाठी आकारले जाणारे शुल्क व अनामत रक्कम माफ

 

मुंबई नगरीची महत्त्वाची सांस्कृतिक ओळख असणारा श्री गणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक व्हावा, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सातत्याने विविध स्तरिय प्रयत्न करित असते. 

 

येत्या सप्टेंबरमध्ये येणा-या श्री गणेशोत्सवाच्या अनुषंगाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशांनुसार आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश विचारात घेऊन पर्यावरणपूरक श्री गणेशोत्सवाला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने महानगरपालिकेच्या प्रत्येक विभागात एक जागा शाडू मातीपासून श्रीगणेशमूर्ती घडविण्यासाठी मूर्तीकारांना मोफत उपलब्ध करुन देण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी आज आयोजित एका विशेष बैठकीदरम्यान दिले आहेत. 

 

विशेष म्हणजे सदर ठिकाणी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्यास प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने प्रायोगिक स्तरावर काही प्रमाणात शाडू माती उपलब्ध करुन देण्याचेही निर्देश परिमंडळीय उपायुक्तांना देण्यात आले आहेत.

 

 त्याचबरोबर मुख्यमंत्री यांच्या निर्देशांनुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांसाठी आकारले जाणारे शुल्क व अनामत रक्कम माफ करण्याचाही निर्णय घेण्यात आला असून त्याची तात्काळ अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. 

 

तसेच गेल्यावर्षीच्या गणेशोत्सवादरम्यान ज्या गणेशोत्सव मंडळांची शुल्क व अनामत रक्कम जमा असेल, त्यांना ती पुढील 7 दिवसांच्या आत परत करण्याचेही निर्देश महानगरपालिका आयुक्त यांनी आजच्या बैठकीदरम्यान दिले आहेत. 

 

यंदाचा गणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीने महानगरपालिका विविध स्तरिय कार्यवाही करित आहे. याच कार्यवाहीचा भाग म्हणून सन 2023 च्या गणेशोत्सवात घरगुती स्तरावरील गणेशोत्सवासाठी 4 फुटांपर्यंत उंची असणाऱ्या मूर्ती या केवळ शाडू माती आणि पर्यावरणपूरक घटकांपासून घडविलेल्या असणे बंधनकारक करण्यात आले आहे. 

 

तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार करण्यात येणा-या मूर्तींवर घरगुती गणेशोत्सवासाठी प्रतिबंध असणार आहे. ही बाब लक्षात घेऊन  पर्यावरणपूरक श्रीगणेश मूर्ती घडविणा-या मूर्तीकारांना महानगरपालिकेच्या प्रत्येक विभागात एका ठिकाणी मोफत जागा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश देतानाच यासाठी योग्य जागा शोधण्याचे व निर्धारित करण्याचे निर्देश परिमंडळीय सह आयुक्त / उपायुक्तांना आजच्या बैठकीदरम्यान देण्यात आले. 

 

त्याचबरोबर पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्यास प्रोत्साहन देण्याचा भाग म्हणून या मूर्तीकारांना मूर्ती बनविण्यासाठी आवश्यक असणारी शाडूची माती काही प्रमाणात मोफत उपलब्ध करून देण्याचेही निर्देश देण्यात आले. यासाठी राज्यातील विविध भागातून किंवा आवश्यकता भासल्यास बाहेरील राज्यातून देखील शाडूची माती आणून त्याचा मूर्तीकारांना पुरवठा करावा असेही निर्देश परिमंडळीय सह आयुक्त / उपायुक्तांना देण्यात आले.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


Sushma Andhare : बीडमध्ये ठाकरे गटाचा वाद चव्हाट्यावर, सुषमा अंधारे यांना मारहाण केल्याचा जिल्हाप्रमुखांचा दावा, अंधारे म्हणाल्या.... 


बीड: बीडमध्ये ठाकरे गटाचा वाद चव्हाट्यावर आला आहे. गटातटाच्या वादातून शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांना मारहाण केल्याचा दावा ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी केला आहे. तर सुषमा अंधारे यांनी हा दावा फेटाळला असून ही शिंदे गटाने लिहिलेली स्क्रिप्ट असल्याचं त्या म्हणाल्या. 


सुषमा अंधारे या पदांसाठी पैसे घेत असल्याचा आरोप बीडचे जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी केला आहे. त्यातून त्यांनी अंधारे यांना मारहाण केल्याचा दावा केला. दरम्यान, शिवसेने ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव आणि उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांच्यात धक्काबुक्की झाल्याची घटना घडली. त्यानंतर हे सर्व प्रकरण घडल्याचं समोर आलं आहे. 


सुषमा अंधारे या कार्यकर्त्याकडून ब्लॅकमेलिंग करून पैसे उकळत असल्याचा गंभीर आरोप बीडचे जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी केला. तर महाप्रबोधन यात्रेच्या पार्श्वभूमीवर, या यात्रेला गालबोट लागावं म्हणून शिंदे गटाने ही स्क्रिप्ट रचल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला. 


Pune Power Cut: पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील अनेक भागात वीजपुरवठा खंडित; तांत्रिक बिघाडाने नागरिकांचे हाल


Pune Power Cut:  पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या (पीजीसीआयएल) अतिउच्चदाब 400 केव्ही शिक्रापूर ते तळेगावच्या चारपैकी दोन वीजवाहिन्यांमध्ये गुरूवारी रात्री 7.10 वाजता अचानक तांत्रिक बिघाड झाला. परिणामी चाकण एमआयडीसीसह पुणे शहरातील नगररोड विभाग आणि पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी व भोसरी विभागातील सुमारे 3 लाख 55 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद पडला. रात्री 10.30 नंतर या सर्व ग्राहकांचा वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने सुरु होण्याची शक्यता आहे.  रात्रीच्या वेळी वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचे हाल झाले. 


पीजीसीआयएलच्या शिक्रापूर ते पीजीसीआयएल तळेगाव अतिउच्चदाब 400 केव्ही वीजवाहिन्यांच्या चारपैकी दोन वाहिन्यांमध्ये आज रात्री 7.10 वाजता तांत्रिक बिघाड झाला. महापारेषण कंपनीच्या 400 केव्ही चाकण, 220 केव्ही चिंचवड, 220 केव्ही उर्से, 220 केव्ही चाकण, 132 केव्ही चाकण, 132 केव्ही खराडी या अतिउच्चदाब उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद झाला. यात सुमारे 396 मेगावॅट विजेचा पुरवठा बंद झाला. त्यामुळे पुणे शहरातील प्रामुख्याने खराडी, वडगाव शेरी, विमाननगर, येरवडा, धानोरी आदी परिसरातील सुमारे एक लाख 25 हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. सोबतच पिंपरी गाव, चिंचवड, पुनावळे, वाल्हेकरवाडी, वाकड, ताथवडे, किवळे, रावेत, थेरगाव परिसर आणि संपूर्ण प्राधीकरणासह आकुर्डीमधील 50 टक्के परिसरातील दोन लाख 30 हजार असे एकूण तीन लाख 55 हजारांवर ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. यासोबतच चाकण एमआयडीसीमधील उच्च व लघुदाहबाच्या सुमारे ५ हजार औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा बंद पडला. तर 132 केव्ही अतिउच्चदाब चाकण उपकेंद्रातून एका वीजवाहिनीद्वारे चाकण शहराचा वीजपुरवठा सुरु ठेवण्यात आला आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.