Anil Jaysinghani Arrest : आयपीएल (IPL Money laundering) मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) अनिल जयसिंघानीला अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना 1 कोटीच्या कथित लाच प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणातही अनिल जयसिंघानी हा सहआरोपी असून त्याला आता अहमदाबादमध्ये ईडी युनिटने अटक केली आहे. 


क्रिकेट बुकी म्हणून ओळख असलेल्या अनिल जयसिंघानी (Anil Jaysinghani) याला अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) युनिटने ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर 10 हजार कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात समावेश असल्याचा आरोप आहे. ईडीने मध्यप्रदेश पोलिसांच्या ताब्यातून जयसिंघानी याला ताब्यात घेतले आहे. जयसिंघानी हा मुंबईजवळील (Mumbai) उल्हासनगरचा असून तो 15 हून अधिक प्रकरणांमध्ये संशयित आहे. तथापी, सट्टेबाजी प्रकरणात त्याला तीन वेळा अटक झाली आहे. काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी जयसिंघानी यांच्या मुलीविरोधात लाच प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर अनिल जयसिंघानी यांनी मुंबई उच्च न्यायालयात बेकायदेशीर अटकेला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती, मात्र न्यायालयाने शुक्रवारी याचिका फेटाळून लावली. 


दरम्यान 2015 मनी लॉन्ड्रिंग प्रकरणा संदर्भात एका फेडरल एजन्सीद्वारे तपास सुरु असताना ईडीने कारवाई केली आहे. या प्रकरणी ईडी जयसिंघानी याचा जबाब नोंदवत असताना शुक्रवारी त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. ईडीकडून अहमदाबाद कोर्टात सुरु असलेल्या 2015 मधील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जयसिंघानी याची चौकशी सुरु आहे. चौकशी सुरु असताना ईडीने ताब्यात घेतले आहे. त्याचबरोबर न्यायालयात जयसिंघानी यांच्या कोठडीची मागणी केली आहे. जयसिंघानी यांना नुकतेच मध्यप्रदेश पोलिसांनी कथित बुटलेगिंग प्रकरणात ताब्यात घेतले होते. 


अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरण काय? 


काही दिवसांपूर्वी अमृता फडणवीस यांच्या संदर्भात लाच प्रकरणात जयसिंघानी याची मुलगी अनिक्षा हिला अटक करण्यात आली होती. अनिक्षा आणि अमृता फडणवीस यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध विकसित झाले. त्यानंतर अनिक्षा हिने अमृता फडणवीस यांना विनंती केली की, वडिलांवर अनेक गुन्हे दाखल आहेत, त्यांना गुन्हे किंवा तक्रारीमधून वाचवावे. मात्र या गोष्टीला अमृता फडणवीस यांनी नकार दिल्याने अनिक्षाने अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अनिक्षाने त्यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली, असे हे प्रकरण आहे.