पालघर : जव्हारहून मोखाडामार्गे नाशिककडे जाणारा भरधाव ट्रक मोरचोंडी येथील बस स्थानकाजवळील चहा आणि फळविक्रीच्या दुकानात चालकाच्या विरूध्द दिशेने घुसला आहे. या भीषण अपघातात आरोही ( भुमिका) नकुल सोनार (5) आणि उषा भालचंद्र वारघडे (8) या दोन चिमुरडींचा  जागेवरच मृत्यू झाला आहे. तर हर्षदा दिनेश धोंगडे  (24) आणि प्रदिप जनार्दन कडु (20) हे दोघे जणं गंभीर जखमी  झाले आहेत. दोन्ही जखमींना मोखाडा ग्रामीण रूग्णालयातील उपचारानंतर नाशिकच्या जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. मद्यधुंद ट्रक चालकाला मोखाडा पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. 


मोखाडा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जव्हारहून मोखाडामार्गे नाशिककडे मोठा दहाचाकी ट्रक भरधाव वेगाने जात होता. यावेळी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चालकाचा मोरचोंडी येथे ट्रकवरचा ताबा सुटला आणि ट्रक थेट चालकाच्या विरूध्द दिशेने  मोरचोंडी बसस्थानकाजवळील चहा आणि फळविक्रीच्या दुकानात घुसला. सदरचा अपघात दुपारी  3:30  ते  4  वाजेच्या दरम्यान घडला आहे. यावेळी आरोही ( भुमिका ) नकुल सोनार आणि ऊषा भालचंद्र वारघडे या दोन चिमुरडींना, चिरडून, दुकानाला उद्ध्वस्त करून ट्रक विजेच्या खांबावर जाऊन आदळला आहे.


या अपघातात हर्षदा धोंगडे आणि प्रदिप कडु हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने मोखाडा ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, स्थिती गंभीर असल्याने दोन्ही जखमींना नाशिकच्या जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. दरम्यान, मद्यधुंद चालकाने चपळाई करून ट्रक मागे पुढे करून तेथुन ट्रक घेऊन पळ काढला. मात्र, पुढे वाघ्याचीवाडी येथे तो पुन्हा झाडाला ठोकला आणि तेथेच ट्रकने पेट घेतला. यावेळी संतप्त जमावाने रास्ता रोको केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे या राज्यमार्गावरील वाहतुक शेरीचापाडा मार्गे वळविण्यात आली होती. तर मद्यधुंद ट्रक चालकाला मोखाडा पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या: