Jalgaon APMC election : जळगाव (jalgaon) जिल्ह्यात 12 बाजार समित्याच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. बाजार समितींमध्ये बहुतांश बाजार समितींमध्ये भाजप शिंदे गटाविरोधात महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) असाच सामना रंगत असल्याचे पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, भाजपचे नेते तथा मंत्री गिरीश महाजन आणि शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
गेल्या अडीच वर्षापासून या बाजार समित्यांवर प्रशासन निुयक्त होते. या बारा बाजार समित्यांमध्ये (Bajar Samiti) एकूण 215 जागांसाठी ही निवडणूक होत असून त्यासाठी आज मतदान होत आहे. 12 बाजार समित्यांमध्ये एकूण 215 जागांसाठी 510 उमेदवार रिंगणात आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर आणि त्यानंतर राज्यातील सत्ता परिवर्तनानंतर बाजार समितीची (APMC Election 2023) ही पहिलीच निवडणूक होत असल्याने निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जळगाव, धरणगाव-एरंडोल, पाचोरा-भडगाव, पारोळा, मुक्ताईनगर-वरणगाव-बोदवड, भुसावळ, चोपडा, जामनेर, यावल, रावेर, चाळीसगाव, अमळनेर या 12 बाजार समित्यांसाठी आज मतदान होत आहे. तर दुसरीकडे बाजार समितीची निवडणूक ही प्रमुख पक्षांसाठी विधानसभेची रंगीत तालीम असल्याचेही बोललं जात असून यावरच विधानसभेतील पक्षांची आणि उमेदवारांच्या विजयाची गणित ही अवंलबून असल्याचे सांगितले जात आहे.
खडसे, गिरीश महाजन अन् गुलाबराव पाटलांची प्रतिष्ठा पणाला
यंदाच्या बाजार समितीत पहिल्यांदाच काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेस ही तीनही पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोर जात आहेत. शिंदे गटात फूट पडल्यानंतर जळगाव जिल्ह्यात पाच आमदार जे शिंदे गटाला जाऊन मिळाले होते त्यानंतर राज्यात भाजप शिंदे गट युतीतील सत्ता स्थापन झाली. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये भाजप शिंदे गटाविरोधात महाविकास आघाडी असाच सामना रंगत असल्याचे पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, भाजपचे नेते तथा मंत्री गिरीश महाजन व शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
शिंदे गटाच्या आमदारांच्या 'या' मतदारसंघांकडे लक्ष
शिंदे गटात गेलेल्या या पाचही आमदारांच्या मतदारसंघातील बाजार समित्यांकडेही संपूर्ण राज्यांचे लक्ष लागले आहे. यात पाचोरा तालुक्यातील शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या मतदारसंघातील पाचोरा, भडगाव तालुक्याची बाजार समिती, शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांची धरणगाव-एरंडोल बाजार समिती, आमदार चिमणराव पाटील यांच्या मतदारसंघातील पारोळा बाजार समिती, आमदार लता सोनवणे यांची चोपडा बाजार समिती, तसेच मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मतदार संघातील बोदवड बाजार समिती, या बाजार समित्यांमधील लढती ह्या लक्षवेधी ठरणार आहेत. तसेच आपापल्या मतदारसंघात शिंदे गटाचे सत्ताधारी आमदारांची प्रतिष्ठा सुध्दा या निवडणुकीत पणाला लागली आहे.
दोन टप्प्यात होणार मतमोजणी
जिल्ह्यातील जळगाव, अमळनेर, पाचोरा,बोदवड, यावल, धरणगाव आणि भुसावळ, रावेर, चोपडा, चाळीसगाव, पारोळा, जामनेर या 12 बाजार समितीसाठी आज 28 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. एकाच दिवशी मतदान झाले असले तरी मतमोजणी मात्र दोन टप्प्यात होणार आहे. यात उद्या 29 एप्रिल रोजी भुसावळ, रावेर, चोपडा, चाळीसगाव, पारोळा,जामनेर या सहा बाजार समितीची मतमोजणी होणार आहे. तर 30 एप्रिल रोजी रोजी जळगाव, अमळनेर, पाचोरा, बोदवड, यावल, धरणगाव या सहा बाजार समित्यांची मतमोजणी होणार आहे.
चोपडा अन् धरणगावात राष्ट्रवादी भाजपसोबत...
राज्यात जरी भाजप आणि राष्ट्रवादी पक्ष हे एकमेकांच्या विरोधात असले तरी स्थानिक पातळीवर मात्र या दोनही पक्षांनी बाजार समितीच्या निवडणुकीत एकमेकांचा पाठिंबा घेतल्याचे पाहायला मिळत आहे. यात शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातील धरणगाव एरंडोल या बाजार समितीसाठी राष्ट्रवादीचे बंडखोर संजय पवार यांनी भाजप शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. तर चोपडा तालुक्यातील अर्धी भाजप आणि अर्धी राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणुकीला सामोरे जात आहे. तर उर्वरित भाजप गट शिंदे गटासोबत तर उर्वरित राष्ट्रवादी महाविकास आघाडीसोबत ही निवडणूक लढवत असल्याचे पाहायला मिळत आहे.
जळगावमध्ये केंद्रावर गोंधळ
जळगावातील नुतन मराठा महाविद्यालयाच्या केंद्रावर हमाल मापाडी मतदारसंघाचे उमेदवार उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत बोगस मतदार मतदान करत असल्याचा आरोप केला. यामुळे या केंद्रावर काही काळ गोंधळ झाला. या निवडणुकीत हमाल मापाडी कामगारांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याचे हे दिसून आलं. शिंदे गटाकडून बोगस मतदान केल्याचा आरोपही यावेळी हमाल मापाडी मतदारसंघाचे उमेदवार देवेन सोनवणे यांच्याकडून करण्यात आला. तर 18 बाजार समित्यांसाठी 510 उमेदवार रिंगणात असून 3 उमेदवार हे बिनविरोध निवडून आले आहेत. प्रत्येकी 350 मतदार याप्रमाणे मतदानासाठी केंद्राची रचान करण्यात आली आहे. प्रत्येकाचे मतदान कार्ड तपासूनच मतदान करण्यासाठी प्रवेश दिला जात असून असा कुठलाही प्रकार या ठिकाणी घडलेल्या नसल्याचे निवडणूक अधिकारी संतोष बिडवई यांनी बोलताना सांगितलं. तसेच आक्षेप असल्यास याचिका दाखल करावी, त्यावर निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी सांगितलं.