औरंगाबाद: मागील अनेक वर्षांपासून औरंगाबाद (Aurangabad) शहरातील नागरिकांना पाणी प्रश्नाचा सामना (Aurangabad Water Supply Issue) करावा लागत आहे. त्यातच वाढती लोकसंख्या आणि शहराचा होणारा विकास पाहता पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर होत चालला आहे. दरम्यान, आजघडीला शहराला पाच दिवसांआड पाणीपुरवठा (Water Supply) करण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाकडून कागदोपत्री देण्यात आली आहे.पण, प्रत्यक्षात शहरात अनेक ठिकाणी 8 दिवसांपासून पाणीपुरवठा झालेला नाही. त्यामुळे, औरंगाबाद शहरात पुन्हा पाण्याची बोंबाबोंब पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात संताप पाहायला मिळत आहे. 


शहरातील पाणीपुरवठा परिस्थिती 



  • उस्मानपुरा भागातील एकनाथनगरमध्ये 7 दिवसांआड पाणीपुरवठा

  • टीव्ही सेंटर परिसर 8 दिवसांआड

  • सिडको एन-2 मध्ये 6 दिवसांनंतर पाणीपुरवठा

  • आरेफ कॉलनी 7 दिवसांआड

  • रशीदपुरा 6 दिवसांनंतरच

  • गणेश कॉलनी 8 व्या दिवशी पाणी

  • विश्वभारती कॉलनी 5 दिवसांनंतर

  • संजयनगर, भवानीनगर 8 दिवसांनंतर

  • बायजीपुरा 8 व्या दिवशी


न्यायालयात पाक दिवसांचं शपथपत्र


शहरातील पाणीप्रश्न मागील काही वर्षात अधिकच गंभीर बनला आहे. त्यामुळे प्रकरण थेट औरंगाबाद खंडपीठात गेले आणि यावर अनेकदा न्यायालयात चर्चा झाली. पाणीपुरवठ्याच्या नियोजनावरून अनेकदा न्यायालयाने महानगरपालिका प्रशासनाला खडेबोल सुनावत कान टोचले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी महापालिकेने न्यायालयात शपथपत्र सादर करून पाच दिवसांआड पाणी देण्याची हमी दिली. तर काही महिने याची अंमलबजावणीही झाली.मात्र, आता यामध्ये खंड पडला असून, आठवड्यातून एकदाच पाणी मिळत असल्याने नागरिकांचे हाल होत आहे. 


सतत पाणीपुरवठा विस्कळीत...


मागील काही दिवसांत पाणीपुरवठ्यात दररोज तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. जुलै, ऑगस्ट मध्ये जायकवाडी, फारोळा येथे वारंवार तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याच्या घटना एकामागून एक घडल्या. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला. त्यातच शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन्ही जलवाहिन्या कालबाह्य झाल्या आहेत. त्यामुळे त्या सतत फुटत असतात. त्यातच औरंगाबाद-पैठण रस्त्याचे काम सुरु असल्याने यामुळे देखील जलवाहिनी फुटण्याच्या घटना समोर येतात. त्यामुळे सतत पाणीपुरवठा विस्कळीत होत असतो. 


निवडणुकीत फक्त घोषणा... 


प्रत्येक निवडणुकीत औरंगाबाद शहराचा पाणीप्रश्न सर्वात आघाडीवर असतो. महानगरपालिका निवडणुकीत तर सर्वाधिक भर याच मुद्यावर असते. प्रत्यके पक्षाकडून नवीन पाणीपुरवठा योजना मार्गी लावण्याचे आश्वासन दिले जातात. विशेष म्हणजे कित्येक वर्षे शिवसेनेची महानगरपालिकेवर सत्ता आहे. तर विरोधी पक्षात असतांना देवेंद्र फडणवीस यांनी भव्य मोर्चा काढला होता. मात्र, सत्ता आल्यावर राजकीय पक्षांकडून औरंगाबाद पाणीप्रश्नाकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करण्यात येते. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


चिंता वाढली! मराठवाड्यात 'ऑगस्ट महिन्यात' पावसाची 71.9 टक्क्यांची तुट; 49 लाख हेक्टरवरील पिकं धोक्यात