Nashik Rain : नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने (Rain) हजेरी लावली असून नदी नाले तुडुंब भरून वाहून लागले आहे. मागील 24 तासांत जिल्ह्यात 90 मिमी पावसाची नोंद करण्याचे आली आहे. 


राज्यात सगळीकडे पाऊस सुरू असताना मात्र नाशिक शहरासह जिल्ह्यात पावसाने उघडीप  दिली होती. अखेर गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पावसाला सुरवात झाली असून इगतपुरी, त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला असून शेती कामांना वेग आला आहे, तर भात लावणीला देखील काही भागात सुरवात झाली आहे.


दरम्यान मागील 24 तासात जिल्ह्यात 90 मिमी पावसाची नोंद झाली असून इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, पेठ, निफाड, सिन्नर, देवळा तालुक्याला पावसाने झोडपले आहे. त्र्यंबक तालुक्यातील हरसुल परिसरात दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस सुरू असून दिवसभरात त्रंबकेश्वर तालुक्यात 272 तर हरसुलला 66 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यंदा प्रथमच पावसाने एका दिवसात शतक मारल्याने बळीराजा सुखावला आहे. भातासाठी हा चांगला पाऊस असल्याने आवनीच्या कामाला वेग आला आहे. त्र्यंबकला 112 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर इगतपुरी तालुक्याला तीन-चार दिवसांपासून पावसाने झुडपले आहे. मागील 24 तासात 234 मीटर पावसाची नोंद करण्यात आले आहे. गतवर्षी याच कालावधीत 305 मिमी पावसाची नोंद झाली होती यांना मात्र याच कालावधीत 234  मी पावसाची नोंद झाली आहे. 


बळीराजा सुखावला!
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी सुखावला असून शेतीकामांना वेग आला आहे. भात लावणी, शेत मशागत, नांगरणी आदी कामे सुरू झाली आहेत. शिवाय दुबार पेरणीचे संकट टळले आहे.


पाणीसाठ्यात वाढ
जिल्ह्यातील धरणसाठ्यात कमालीची घट झाली होती. जिल्ह्यातील अनेक धरणे तळाला गेली होती. मात्र आता दोन दिवसांच्या पावसामुळे जिल्ह्यातील धरण साठ्यात काहीसा बदल झाला आहे. शिवाय नाशिकरांवर पाणी कपातीचे संकट आले होते, ते देखील दूर होण्याची शक्यता आहे.