कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. कारण निवडणुकीच्या संदर्भातील सत्ताधारी गटाची याचिका मुंबई उच्च न्यायालायाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्वी प्रमाणेच सुरु राहणार आहे.
कोरोनाच्या संकटात राज्य सरकारच्या आदेशानुसार निवडणूक 31 मार्चपर्यंत स्थगित करावी अशी मागणी गोकुळच्या सत्ताधारी गटाने केली होती. मात्र ही याचिका मुंबई उच्च न्यायलयाने फेटाळून लावली आणि पूर्वीप्रमाणे निवडणूक प्रक्रियेचं काम सुरु ठेवावं असे आदेश कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे आता गोकुळ दूध संघाची निवडणूक होणार हे निश्चित झालं आहे. आता अंतिम मतदार यादीनंतर प्रत्यक्ष अर्ज भरणे आणि मतदानाच्या तारखा कधी जाहीर होतात याकडे राजकीय क्षेत्राच्या नजरा लागल्या आहेत.
कोरोनाचे कारण देऊन सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती दिली आहे. या आदेशाविरोधात काही संस्था उच्च न्यायालयात गेल्या होत्या. त्यामध्ये गोकुळची प्रक्रिया देखील सुरु ठेवण्याची मागणी करण्यात आली होती. कोर्टाच्या आदेशानंतर गोकुळची प्रक्रिया सुरु ठेवण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला. मात्र याला सत्ताधारी नेत्यांनी विरोध करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल केली होती ती याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे.
गोकुळमध्ये महाआघाडी म्हणून एकत्र लढणार - हसन मुश्रीफ
कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून लढणार असल्याचं वक्तव्य ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं आहे. गोकुळच्या निवडणुकीसंदर्भातील सत्ताधारी गटाची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्यानंतर मुश्रीफ यांना प्रश्न केला असता, आम्ही गोकुळमध्ये महाविकास आघाडी म्हणून लढणार आहोत. माझी, पालकमंत्री सतेज पाटील आणि पी.एन पाटील यांची याबाबत मुंबईत एक बैठक झाली आहे. अजून काही बैठका होतील असंही मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. त्यामुळे गोकुळमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध सत्ताधारी असा सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
पी. एन. पाटील यांची भूमिका काय असणार?
सध्या गोकुळमध्ये काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील आणि महादेवराव महाडिक यांची सत्ता आहे. पी.एन पाटील हे नेमके कुणाच्या बाजूने उभा राहतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. कारण सतेज पाटील आणि महादेवराव महाडिक यांचं राजकीय वैर सगळ्यांना माहित आहे. त्यामुळे मुश्रीफ दावा करतात त्यानुसार जर महाविकास आघाडी एकत्र लढत असेल तर पी.एन. पाटील महाडिकांना सोडून महाविकास आघाडीसोबत राहणार का हा खरा प्रश्न आहे.