रत्नागिरी : जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सध्या जिल्हा परिषद अध्यक्ष कोण? ही एक गोष्टी प्रामुख्यानं चर्चिली जात आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे शेवटच्या टर्ममध्ये कुणाला संधी मिळणार याबाबतची उत्सुकता दिसून येत आहे. सध्याच्या या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या शर्यतीत प्रामुख्यानं चार नाव चर्चेत आहेत. यामध्ये माजी मंत्री रामदास कदमांचे भाऊ अण्णा कदम, भास्कर जाधव यांचे भाऊ बाळशेठ जाधव, भास्कर जाधव यांचा मुलगा विक्रांत जाधव आणि शिवसेनेचे जुने आणि निष्ठावंत कार्यकर्ते उदय बने. यापैकी कुणाला अध्यक्षपद मिळणार यावर सध्या तर्कवितर्क लढवले जात आहेत. 


यापूर्वी हे पद जिल्ह्याच्या दक्षिण भागात राहिलं होतं. माजी आमदार सुभाष बने यांचे पुत्र रोहन बने यांनी अध्यक्षपद भूषवलं होतं. त्यामुळे आता अध्यक्षपद जिल्ह्याच्या उत्तर भागात जाणार असल्याचं बोललं जात आहे. यामध्ये मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांच्या पसंतीसह 'मातोश्री'चा आशिर्वाद नेमका कुणाला मिळणार? यावर आगामी गणितं अवलंबून असणार आहेत. अवघ्या 10 ते 12 दिवसांवर ही निवड आली असून विषय समित्यांच्या अध्यक्षपदासाठी देखील सध्या जोरदार फिल्डींग लावली जात आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी वरिल चार नावे वगळता इतर कुणाला संधी मिळणार का? याकरता देखील आणखी किमान 10 दिवसांची वाट पाहावी लागणार आहे. 


संधी भास्कर जाधवांच्या मुलाला कि भावाला?
भास्कर जाधव यांचा अनुभव दांडगा आहे. विधानसभा निवडणुकीवेळी जाधव राष्ट्रवादीमधून शिवसेनेत आले. यावेळी त्यांना मंत्रीपद मिळेल अशी आशा होती. पण, महाविकास आघाडीमध्ये मात्र ती पूर्ण झालेली नाही. त्यामुळे अनेकवेळा जाधव यांची नाराजी देखील दिसून आली. असं असलं तरी सध्या जाधव पक्ष बांधणीसाठी काम करत आहेत. त्यामुळे नाराज असलेल्या भास्कर जाधव यांचा मुलगा विक्रांत जाधव यांना जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी मिळणार कि त्यांचाच राजकीय विरोधक असलेल्या त्यांचाच भाऊ बाळशेठ जाधव यांनी संधी दिली जाणार? हे देखील पाहावं लागणार आहे. दरम्यान, भास्कर जाधव यांच्या मुलाला डावलत त्यांच्या भावाला संधी दिल्यास त्याचा अर्थ भास्कर जाधव यांना शह दिला जाऊ शकतो, अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यामध्ये खासदार विनायक राऊत आणि मंत्री उदय सामंत यांचं पारडं कुणाच्या बाजुनं असणार यावर आगामी गणितं अवलंबून आहेत.



 


जाधवांच्या मुलाला संधी देण्यास काय अडचण?
भास्कर जाधव यांच्या मुलाला संधी दिल्यास जाधव यांची नाराजी दूर होऊ शकते असा देखील एक मतप्रवाह दिसून येतो. असं असलं तरी विक्रांत जाधव हे तांत्रिक दृष्ट्या शिवसेनेत नाहीत. ते अद्यापही राष्ट्रवादीमध्ये आहेत. त्यामुळे विक्रांत जाधव यांना संधी देताना या बाबींचा देखील विचार केला जाऊ शकतो. तर, दुसरीकडे रामदास कदमांचा भाऊ अण्णा कदम यांच्या नावाची देखील चर्चा आहे. विक्रांत जाधव हे चिपळूण तर अण्णा कदम हे खेडमधील आहेत.




जुन्या कार्यकर्त्याला संधी?
जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले उदय बने हे जुने आणि निष्ठावंत शिवसैनिक आहेत. त्यांना प्रशासनाचा देखील अनुभव असल्याचं बोललं जात आहे. पण, त्यांच्या पाठिशी कुणीही गॉडफादर नाही. असं असलं तरी त्यांचं 'मातोश्री'वर वजन असल्यानं त्यांना देखील संधी मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. सध्या कोकणातील शिवसेना-भाजप यांच्यातील राजकारण पाहता बने यांना संधी देत निष्ठावंतांची या ठिकाणी कदर होते, असा संदेश देखील सेनेतर्फे दिला जाऊ शकतो.




मंत्री, खासदार कुणाच्या पाठिशी?
सध्याच्या या साऱ्या समीकरणांमध्ये मंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांचा पाठिंबा किंवा या दोघांचं मत देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. राऊत, सामंत, भास्कर जाधव यांच्या मुलाला पाठिंबा देणार कि त्यांचा राजकीय विरोधक असलेल्या भावाला? यावर देखील जिल्हा परिषद अध्यक्षपदाची गणितं ठरणार आहे. या साऱ्यांबाबत 'एबीपी माझा'नं शिवसेनेच्या नेत्यांशी देखील संपर्क साधला. पण, याबाबतचा योग्य निर्णय 'मातोश्री'वर होईल, याबाबत आता काहीही बोलणार नाही अशी प्रतिक्रिया दिली.