Nagpur News : पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या (Pench Tiger Project) पवनी बफर क्षेत्रातील सिल्लारी बिटाजवळील तलावात मृतावस्थेत आढळलेल्या वाघाचा (Tiger) अखेर उलगडा झाला. घटना उघडकीस आल्यापासून अवघ्या 12 तासांच्या आता चार आरोपींना अटक करण्यात आली. मात्र अन्य आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले असून तपास पथक त्यांच्या मागावर असल्याची माहिती आहे.


मिळालेल्या माहितीनुसार,  या वाघाला विजेचा करंट देऊन ठार करण्यात आले होते. नंतर त्याचे तुकडे करून त्यांना मोठे दगड बांधून सिल्लारी बिटाच्या कक्ष क्रमांक 256 मधील कोडू तलावाच्या खोल पाण्यात टाकण्यात आले होते. वनविभागाच्या तपास पथकाने वाघाचे अवयव कापलेली जागाही शोधून काढली आहे. ही घटना सुमारे 15 ते 20 दिवसांपूर्वीची आहे. यामुळे पाण्यात टाकलेले वाघाचे अवयव पूर्णतः सडून गेले होते. तरीही अवयवाचे काही तुकडे पाण्यावर तरंगत होते. हा प्रकार काही गावकऱ्यांना लक्षात आल्यावर गुरुवारी दुपारी वन अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पथकासह तातडीने तलावावर धाव घेऊन पाहणी केली. मात्र तो नक्की वाघच असल्याचे स्पष्ट होत नव्हते. परंतु कापलेल्या अवयवांना मोठे दगड बांधलेले आढळल्यावर संशय बळावला. त्यानंतर तो वाघच असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले.


शुक्रवारी राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाच्या निर्देशानुसार पेंचच्या क्षेत्रसंचालक ए. श्रीलक्ष्मी, उपसंचालक डॉ. प्रभुनाथ शुक्ल, प्राधिकरणचे प्रतिनिधी बंडू उइके, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांचे प्रतिनिधी अजिंक्य भटकर यांच्या उपस्थितीत डॉ. सुजीत कोलंगथ, डॉ. सचिन कंबोज यांनी वाघाचे शवविच्छेदन केले.


बारा तासांत उलगडा


विश्वसनीय सूत्रांच्या महितीवरून वनविभागाच्या पथकाने गुरुवारी रात्री उशिरा घोटी गावातून तीन संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीमध्ये त्यांनी वाघाची शिकार केल्याचे कबूल केले. यानंतर शुक्रवारी सायंकाळी अन्य चौथ्या आरोपीला अटक करण्यात आली. तपासानंतर चार आरोपींना अटक करून रामटेक प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्या चौघांनाही 17 जानेवारीपर्यंत वन कोठडी सुनावण्यात आली आहे. अन्य फरार आरोपींचा शोध सुरू आहे.


शिकारीच्या प्रमाणात वाढ...


गेल्या वर्षभरात पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या विविध बीटमधील अनेक शिकारीच्या घटना उघडकीस आल्या होत्या. मात्र अनेक शिकारीच्या किरकोळ घटनांबद्दल नोंदही होत नसल्याची माहिती आहे. मात्र या शिकार करणाऱ्यांच्या मुसक्या आवळणे प्रशासनासाठी आव्हानात्मक ठरत आहे.


ही बातमी देखील वाचा...


शिंदे गटालाही फुटीची लागण! 'या' जिल्हा प्रमुखाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे राजीनामा