चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात 'गजराज' नावाच्या पिसाळलेल्या हत्तीने वनविभागाच्या अधिकाऱ्याला चिरडल्याची अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य लेखापाल प्रमोद गौरकर यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला. ताडोबा व्याघ्रप्रकल्पातील बोटेझरी भागातील गुरुवारी ( 6 मे) संध्याकाळची ही घटना आहे.
ताडोबाच्या बोटेझरी भागात हत्ती कॅम्प असून या कॅम्पमधील गजराज हा हत्ती दुपारपासून आक्रमक झाला होता आणि कॅम्पमधून पळून आजूबाजूला फिरत होता. याच दरम्यान वनाधिकारी कुळकर्णी आणि गौरकर या भागात गस्त घालत होते आणि आक्रमक झालेल्या गजराजने त्यांच्या गाडीवर हल्ला केला. ज्यामध्ये गौरकर यांचा मृत्यू झाला. वनविभागाची टीम आणि व्हेटनरी डॉक्टर यांनी गजराज या हत्तीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.
विशेष म्हणजे याच गजराज हत्तीने यवतमाळ जिल्ह्यातील अवनी वाघिणीच्या शोधमोहीमेत मोठा गोंधळ घातला होता. तर 16 नोव्हेंबर 2019 ला याच गजराजने जानकीराम मसराम या 45 वर्षीय माहुताचा मोहर्ली इथल्या हत्ती कॅम्पमध्ये हल्ला करून जीव घेतला होता. त्यामुळेच मोहर्लीचा हत्ती कॅम्प काही महिन्यांपूर्वी बोटेझरी येथे स्थानांतरित करण्यात आला होता.
दरम्यान प्रमोद गौरकार यांच्या मृत्यूने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कर्मचारी आणि अधिकारी वर्गावर शोककळा पसरली असून वरिष्ठ वनाधिकारी ताडोबाकडे रवाना झाले आहेत.