Nagpur Rain : राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस सुरु आहे. याचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. नागपूरसह विदर्भातील अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, भंडारा आणि चंद्रपुर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं शेतकऱ्यांसह नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे. तर नागपुरात येरणगावमधील एका पोल्ट्री फार्ममध्ये गारपीटीमुळं सात हजार कोंबड्या मृत्युमुखी पडल्या आहेत. तर चंद्रपुरात वीज कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे.


पोल्ट्री फार्ममधील हजारो कोंबड्या मृत्यू


नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्याला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा जोरदार तडाखा बसला आहे. तालुक्यातील येरणगावच्या एका पोल्ट्री फार्ममधील तब्बल सात हजार कोंबड्या दगावल्या आहे. त्या शिवाय परिसरातील आणखी दोन पोल्ट्री फार्ममध्येही शेकडो कोंबड्या मृत्युमुखी पडल्या आहेत. त्यामुळं या भागातील शेतकऱ्यांवर ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत भरुन मृत पक्षी फेकण्याची वेळ आली आहे. 


अमरावती जिल्ह्यात पावसामुळं कांदा, भुईमुगासह भाजीपाला पिकाच मोठं नुकसान 


अमरावती जिल्ह्यात काल संध्याकाळी झालेल्या मुसळधार पाऊस आणि गारपीटीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. सर्वात मोठा फटका धामणगाव रेल्वे तालुक्याला बसला आहे.  तालुक्यातील आजणगाव गावातील तीळ, कांदा, भुईमुगासह भाजीपाला पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. या व्यतिरिक्त तालुक्यातील इतर अनेक गावात वादळी वारा आणि गारपीटीमुळं घरांचं नुकसान झालं आहे. तर काही घरांचे छप्परही उडून गेलं आहे. अमरावती येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणलेला हरभरा, गहू आणि सोयाबीन उघड्यावर असल्याने पूर्णपणे पावसात भिजला आहे.




यवतमाळ जिल्ह्यालाही अवकाळी पावसाचा मोठा फटका


यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस, आर्णी, बाभुळगाव, महागाव, दारव्हा या तालुक्यात तीळ, हळद, भुईमूग, मका या पिकांसह आंबा, पाले भाज्या आणि फुलशेतीचं नुकसान झालं आहे. सर्वाधीक फटका बाभूळगाव तालुक्यात बसला असून नांदुरा, उमरडा, चिमणा, बागापूर, नांदेसावंगी, नांदुरा, मांगुळ, अंतरगाव, मिटणापूर, वरखेड, पालोती, गिमोना, टाकळगाव, मालापूर या ठिकाणी बोर आणि लिंबाच्या आकाराच्या गारा पडल्या. बाभूळगाव बाजार समितीमध्ये ही शेतकऱ्यांचे उघड्यावर ठेवलेले सोयाबीन ओले झाले असून त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे.


बुलढाणा जिल्ह्यात वादळी वाऱ्यानं वृक्ष कोसळले, वाहतूक विस्कळीत 


विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर वसलेल्या बुलढाणा जिल्ह्यातही जोरदार वाऱ्यासह पाऊस झाल्यानं जनजीवन प्रभावित झालं आहे. अनेक ठिकाणी वृक्ष कोसळून वाहतूक प्रभावित झाली आहे. तर काही ठिकाणी विद्युत खांब कोसळून वीज पुरवठा खंडित झाला आहे. जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील डोनगाव परिसरात गहू, संत्रा पिकांचं काही प्रमाणात नुकसान झालं आहे. तिकडे चंद्रपूर जिल्ह्यात भद्रावती तालुक्यातील मांजरी कोळसा खाणीत वीज कोसळून बाबुधन कुमार यादव (25 वर्ष ) या कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेचे दृश्य CCTV कॅमेरात कैद झाले आहे.. भंडारा जिल्ह्यात ही अनेक भागात वादळी वाऱ्यासह झाल्या पावसाने शेतात उभ्या असलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Agriculture News : यंदा मिरची 'भाव' खाणार, आवक घटल्यानं दरात वाढ; अवकाळी पावसाचा मोठा फटका