सांगली : सांगली जिल्ह्यातील मिरजमधल्या अॅपेक्स केअर रुग्णालयाचा संचालक डॉ. महेश जाधव याला अटक करण्यात आली आहे. रुग्णांची हेळसांड करुन तब्बल 87 रुग्णांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि कासेगाव पोलिसांच्या संयुक्त पथकाने पाठलाग करत महेश जाधवला रात्री अटक करण्यात आली. आता अॅपेक्स हॉस्पिटल रुग्णालयातील 87 रुग्णाच्या डेथ ऑडिटची पोलिसांना प्रतीक्षा आहे. कोरोना उपचारा संदर्भातील निष्काळजीपणा दाखवून रुग्णांच्या मृत्यूस जबाबदार ठरल्याप्रकरणी एखाद्या डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल होण्याची राज्यातील ही बहुतेक पहिलीच घटना असावी.


डॉ. जाधव याने मिरज-सांगली रस्त्यावर अॅपेक्स कोरोना हॉस्पिटल सुरु केलं होतं. या हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ वैद्यकीय पथकाऐवजी होमिओपॅथीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून रुग्णावर उपचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार आला. शिवाय हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनचा पुरेसा साठा नसतानाही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 205 रुग्णांना दाखल करुन घेतलं होतं. त्यापैकी 87 जणांचा मृत्यू झाल्याचं उघडकीस आलं आहे. हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉ. जाधव याने भरमसाठ बिलांची आकारणी केली, तसंच डिस्जार्च झाल्यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांना बिलाची पावती देण्यास देखील टाळाटाळ करण्यात येत होती. आवश्यकता नसतानाही अनेकांकडून रेमडेसिवीर इंजेक्शन देखील मागवण्यात आल्याच्या घटना घडल्या होत्या. याबाबत रुग्णांच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांकडे तक्रारी केल्या होत्या. याशिवाय कोरोना उपचारादरम्यान हॉस्पिटलमधील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे बंद ठेवण्यात आले होते. यामुळे या हॉस्पिटलमधील कारभारावर संशय अधिकच बळावला होता. 


पुढील चौकशीसाठी डॉ. महेश जाधवला महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आलं आहे. डॉ. महेश जाधवच्या अटकपूर्व जामीन अर्जावर काल न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळताच त्या पळ काढला. अखेर पाठलाग करत त्याला अटक करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली.