नागपूर : कोरोनाचा संसर्ग असताना नागपूर शहरासाठी 18 जून हा दिवस काहीसा दिलासादायक ठरला. 7 फेब्रुवारीनंतर 18 जून रोजी पहिल्यांदाच नागपूर शहरात कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. त्यामुळे तब्बल 131 दिवसानंतर नागपूरसाठी कोरोनाची महाभयंकर दुसरी लाट मृत्यूच्या अनुषंगाने शांत झाली आहे. मात्र याच 131 दिवसांच्या कालावधीत 4 हजार 824 जणांचा मृत्यू झाल्याने ही दुसरी लाट नागपूर जिल्हा आणि खासकरुन नागपूर शहरासाठी किती भयंकर होती याचा अंदाज येतो.
नागपूर शहरात गेल्या वर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात कोरोनाची पहिली लाट आली होती. त्यावेळी एका दिवसात कमाल अडीच हजारांपर्यंत कोरोनाबाधित रुग्ण आणि सुमारे शंभरपर्यंत मृत्यू नागपूरकरांनी अनुभवले होते. पहिल्या लाटेत कोरोनाचा प्रादुर्भाव शहरी भागापर्यंत मर्यादित राहिला होता. मात्र फेब्रुवारीपासून सुरु झालेली दुसरी लाट खऱ्या अर्थाने महाभयंकर होती आणि शहरासह ग्रामीण भागातही तीव्रतेने पसरली होती. या दुसऱ्या लाटेमध्ये नागपूर जिल्ह्यात 131 दिवस सलग रोज अनेकांचे मृत्यू होत होते. शहरात 7 फेब्रुवारी असा दिवस होता, जेव्हा जिल्ह्यात एकही मृत्यू कोरोनामुळे झाला नव्हता. मात्र, त्यानंतर 17 जूनपर्यंत सलग 131 दिवस रोज कोरोनामुळे होणारे मृत्यू नागपूरकर अनुभवत होते.
8 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी दरम्यानच्या 21 दिवसात 13 हजार 690 जणांना कोरोनाची लागण झाली होती, तर 143 जण कोरोनामुळे दगावले होते.
मार्च महिन्याच्या 31 दिवसात 79 हजार 768 जणांना कोरोनाची लागण झाली, तर 763 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला.
तर एप्रिल महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाभयंकर स्वरुप धारण करत नागपूर जिल्ह्यात हाहाकार माजवला. एप्रिल महिन्याच्या तीस दिवसात सर्वाधिक 1 लाख 78 हजार 119 जण कोरोना बाधित झाले, तर याच कालावधीत नागपूर जिल्ह्यात 2 हजार 290 जण कोरोनामुळे मृत्युमुखी पडले.
मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोनाची दुसरी लाट ओसरायला सुरुवात झाली. मे महिन्याच्या अखेरपर्यंत नागपुरात कोरोनाची रुग्णसंख्या आणि मृत्यू संख्या लक्षणीयरीत्या कमी व्हायला सुरुवात झाली होती. मात्र या कालावधीत ग्रामीण भागात कोरोनाचा जोर कायम असल्यामुळे मे महिन्यात नागपूर जिल्ह्यात 66 हजार 818 बाधित झाले, तर कोरोनामुळे 1 हजार 514 जण दगावले.
जून महिन्यात कोरोनाचा प्रकोप लक्षणीयरित्या कमी झाला आणि त्याचे परिणाम कोरोनाबाधितांची संख्या तसेच कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या कमी होण्यामध्ये दिसून आले. जून महिन्यात नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत 18 दिवसात केवळ 2 हजार 001 जण बाधित झाले आहेच, तर 114 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
दुसरी लाट पहिल्या लाटेच्या तुलनेत दुप्पट घातक
जर आपण नागपूरसाठी 7 फेब्रुवारी दुसऱ्या लाटेची सुरुवात मानली तर या 131 दिवसात तब्बल 3 लाख 26 हजार 818 जण हे कोरोनाबाधित झाले आहेत आणि 4 हजार 824 जणांनी आपले प्राण या कालावधीत गमावले आहेत. जे पहिल्या लाटेच्या तुलनेत दुप्पट आहे. त्यामुळे नागपूरकरांनी दुसऱ्या लाटेच्या कटू अनुभवातून शिकवण घेत तिसरी लाट थोपवण्यासाठी नियमांचे पालन करणे गर्दी टाळणे आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे मास्कचा नियमित वापर करणे अत्यावश्यक झाले आहे.