मुंबई : राज्यात आज, 19 जूनपासून 30 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात होणार आहे. शासकीय लसीकरण केंद्राच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येणार आहे. 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण नियमितपणे सुरू राहणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाबाबत प्राधान्यक्रम ठरविण्याची मुभा केंद्र शासनाने राज्यांना दिली आहे. त्यानुसार राज्याच्या आरोग्य विभागाने लसीकरणाच्या सुनियोजनासाठी वयोगटाचा टप्पा निश्चित केला असून त्याप्रमाणे शनिवार 19 जूनपासून 30 ते 44 या वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार आहे.
शासकीय लसीकरण केंद्रावरील लसीकरणासाठी पूर्वनोंदणी ही ऑनलाईन आणि प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन देखील करता येणार आहे. 30 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरण सत्रांचे नियोजन करण्याकरिता कोविन ऍप मध्ये आवश्यक ते बदल करण्यात येणार आहेत. विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ.अर्चना पाटील यांनी राज्यातील सर्व आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्यचिकिस्तक, जिल्हा आरोग्यधिकारी यांना त्याबाबत पत्र पाठविले असून संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काही दिवसांपासून कमी होत असलेला दिसून येत आहे. कोरोनाचा रोजचा आकडा काही दिवसांपासून दहा हजारांच्या खाली आला आहे. आज 9,798 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर काल 14,347 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे बरे होणाऱ्यांची संख्या आता 56,99,983 इतकी झालीय. आज 198 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.73 टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज 198 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.96 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,90,78,541 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 59,54,508 (15.3 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 8,54,461 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,831 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबईत गेल्या 24 तासात 758 कोरोनाबाधितांची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासात 758 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर मागील 24 तासात 19 मृत्यूंची नोंद मुंबईत केली आहे. मुंबईत आजवर 682307 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईचा ओव्हरऑल रिकव्हरी रेट 95 टक्क्यांवर गेला आहे. सध्या मुंबईत 18,764 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 734 दिवसांवर गेला आहे.