बीड :  काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांचा विधिमंडळात पेन ड्राईव्ह बॉम्ब वरून हातवारे करतानाचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. यामध्ये धनंजय मुंडे दंड थोपटताना संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले त्याचं स्पष्टीकरण धनंजय मुंडे यांनी दिले असून त्या दिवशी विधान भवनाच्या परिसरात विरोधी पक्षनेते पेन ड्राईव्ह बॉम्ब फोडणार असल्याचं मला कळालं होतं याबद्दल मी त्यांना इशारे करून विचारला असता त्यांनी माझ्याकडे बोट करून हो असं म्हटल्यानंतर मला असं वाटलं की ते माझ्याबद्दल बॉम्ब फोडणार आहेत म्हणून मी त्यांना इशारे करत होतो. महाराष्ट्रामध्ये असलेल्या सरकार अस्थिर करण्यासाठी सूडबुद्धीने महाविकासआघाडी मधील मंत्र्यांवर कारवाई केली जात असल्याचे देखील धनंजय मुंडे यावेळी म्हणाले आहेत. 


राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रेनिमित्त आज धनंजय मुंडे यांनी त्यांच्या मूळ गावी नाथरा मध्ये जाऊन गावातील नागरिकांशी मंदिरात बसून दोन तास चर्चा केली. त्याच्यानंतर धनंजय मुंडे यांनी एबीपी माझाशी बोलताना सभागृहांमध्ये नेमके काय घडले होते हे पहिल्यांदाच उघडपणे सांगितले आहे यावेळी धनंजय मुंडे यांच्याशी बातचीत केली आहे. 


धनंजय मुंडे यांचा पंकजा मुंडे यांच्यावर पलटवार


काही दिवसापूर्वी एका जाहीर सभेमध्ये भाजपच्या पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर त्यांच्या नाथरा येथे असलेल्या फार्म हाऊस वरून त्यांच्यावर टीका केली होती आणि आज याच टीकेला धनंजय मुंडे यांनी उत्तर दिल आहे.  आम्हाला गावामध्ये घर नसल्याने आमच्या शेतात असलेलं माझ्या वडीलानी बांधलेलं जुनं घर त्यातच मी रिन्यूवेशन केल आहे. ते माझं शेतातले घर असून त्यालाच काही लोक फार्म हाऊस म्हणतात. मात्र त्यांचे कुठे आणि किती फार्म हाऊस आहेत हे त्यांना जरी माहित नसलं तरी मला माहित आहे.  मात्र ते मी इथं आत्ताच बोलणार नाही अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं आहे


धनंजय मुंडे यांनी आज परळी येथील आपल्या गाथा गावामध्ये जनता दरबार घेतला आणि तब्बल दोन तास सर्वांचे प्रश्न ऐकून घेतले. गावातील लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी पक्ष मजबूत असून आपल्या गावातले प्रश्न मागे राहू नयेत त्यामुळे आपल्या गावातील लोकांना देखील वेळ देणे महत्त्वाचा आहे.  आणि यापुढे त्यांचे प्रश्न सोडवण्याचे आता मी ठरवलेले आहे. 


पंकजा मुंडे यांना जिल्ह्याची बदनामी करू नये : धनंजय मुंडे 


गेल्या काही दिवसापासून बीडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाले. त्यामुळे बीड जिल्ह्याची बदनामी होत असल्याची टीका विरोधक धनंजय मुंडे यांच्यावर करत आहेत. त्यावर बोलताना धनंजय मुंडे म्हणाले आहेत की, मी काम करत असताना माझ्याकडून जर काही चुका होत असतील तर टीका माझ्यावर करा आपल्या जिल्ह्याला बदनाम करु नका.  जिल्ह्याला बदनाम केल्यामुळे आपल्या जिल्ह्यात विकास होणार नाही तर चांगले अधिकारी देखील आपल्या जिल्ह्यात काम करण्यासाठी धजावणार नसल्याचं धनंजय मुंडे म्हणाले आहेत. ज्या गोष्टी जिल्ह्यांमध्ये घडत नाहीत त्या गोष्टीवरून देखील जिल्हा बदनाम करण्याचे काम विरोधक करत आहेत त्यामुळे विरोधकांनी आपला धर्म पाळावा राजकारण करण्यासाठी जिल्ह्याला बदनाम करू नये अस देखील धनंजय मुंडे म्हणाले आहे.


ऊसतोड मजुरांच्या प्रश्नावर बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, गेल्या पाच वर्षांमध्ये लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड मजूर कल्याण मंडळाची स्थापना करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. मात्र तात्कालीन सरकारच्या काळात ते होऊ शकले नाही.  आमचं सरकार आल्यानंतर आम्ही पहिल्याच अधिवेशनात या महामंडळाला मान्यता दिली याच महामंडळाच्या मुख्य इमारतीचे उद्घाटन पुण्यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे.  माझ्यासाठी हा सुवर्ण दिवस असून गोपीनाथ मुंडे साहेबांनी ऊसतोड मजुरांचे प्रश्न सोडवण्यासाठी एक चळवळ उभी केली आणि आता ही चळवळ पुढे घेऊन जाताना मी मंत्री असेल किंवा नसेल मात्र या ऊसतोड मजुरांचे प्रश्न सोडवण्याचं काम सातत्याने करत राहणार आहे.