Hingoli News : हिंगोली जिल्ह्यातील वसमत (Hingoli Basmat) शहरातील एका अल्पवयीन मुलीचा चार महिन्यापूर्वी आरोपी असलेल्या प्रसाद राऊत या मुलासोबत विवाह करून दिला होता. तीन महिने पीडित मुलगी सासरी राहिली. त्यानंतर ती मुलगी अकोला रेल्वे स्टेशनवर रेल्वे पोलिसांना आढळून आली. त्यांच्या चौकशीमध्ये गंभीर प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी आता वसमत शहर पोलीस ठाण्यांमध्ये पीडित मुलीच्या आई-वडिलांसह पती सासरा आणि नणंदेवर बालविवाह कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे 


हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरात रहिवाशी असलेल्या केशव वंजे यांनी त्यांच्या अल्पवयीन असलेल्या मुलीचे नांदेड जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या प्रसाद राऊत या मुलासोबत डिसेंबर 2021 मध्ये लग्न करून दिले. लग्नानंतर पीडित मुलगी तीन महिने सासरी राहिली. त्यानंतर ती मुलगी अकोला रेल्वे स्टेशनवर रेल्वे पोलिसांना दिसून आली. मुलगी एकटीच असल्याने रेल्वे पोलिसांनी या मुलीची आधी चौकशी करून त्या मुलीला बालसुधारगृहात पाठवले.


बाल सुधारगृहांमध्ये या मुलीची चौकशी झाल्यानंतर अल्पवयीन असताना लग्न झाल्याची पीडित मुलीने माहिती दिली आहे. त्याचबरोबर अल्पवयीन असताना पतीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले असल्याची माहिती सुद्धा या पीडित मुलीने दिली आहे.


त्यानंतर पीडित मुलीच्या तक्रारीवरून वसमत शहर पोलिस स्टेशनमध्ये पीडित मुलीचे आई-वडील पीडित मुलीचा नवरा, सासरा, नणंद यांच्यावर बाल विवाह प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रतिभा शेटे  करत आहेत. 


पीडित मुलीच्या पतीविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल


या प्रकरणामध्ये पीडित मुलीचे ज्या मुलासोबत लग्न करून दिले होते. त्या प्रसाद राऊतने पीडित मुलगी अल्पवयीन असताना सुद्धा तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी पोक्सो कायद्याअंतर्गत सुध्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha