माथेरान : माथेरानची राणी' म्हणून ओळखलं जातं, ती मिनी ट्रेन
माथेरानची राणी' म्हटले की नजरेसमोर येते ते निसर्गाच्या सानिध्यात धावणारी 'मिनी ट्रेन'. नेरळ ते माथेरान दरम्यानच्या सुमारे 21 किलोमीटरच्या नागमोडी वळणाचा प्रवास करणारी मिनीट्रेन हे पर्यटकांचे खास आकर्षण आहे. यामुळे, मुंबई - पुण्यासोबतच देशभरातील लाखो पर्यटक हे सुट्टीच्या हंगामात माथेरानला भेट देतात. यावेळी, बच्चेकंपनी आणि अबालवृद्ध हे प्रदूषणमुक्त वातावरणातून धावणाऱ्या मिनी ट्रेनने प्रवास करणे अधिक पसंत करतात. त्यातच, पर्यटकांची आकर्षण असलेली मिनी ट्रेनला 'विस्टाडोम' डब्बे बसविण्यात आले आहेत.
परंतु, गेल्या काही वर्षांमध्ये मिनीट्रेनचे डब्बे रुळावरून घसरल्यामुळे ही सेवा बंद करण्यात आली होती. त्यातच, 2019 साली झालेल्या अतिवृष्टीमध्ये या मार्गाचे अतोनात नुकसान झाले होते. दरम्यान, मिनी ट्रेनची सेवा पूर्ववत करण्यामध्ये रेल्वे प्रशासन असमर्थ ठरले आहेत.
दरम्यान, नेरळ- माथेरान मार्गावर रेल्वे मार्गावर दरडी कोसळल्याने त्यासाठी सुमारे एक कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. तर, या मार्गावरील मिनी ट्रेनचे डब्बे हे वारंवार घसरत असल्याने या मार्गावरील लोखंडी स्लीपर्स बदलून त्या ठिकाणी सिमेंटच्या स्लीपर्स बसवण्याचे काम सुरू आहे. तर, हे काम डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्यात येईल असे रेल्वे बोर्डाने जाहीर केले असले तरी यासाठी अधिक कालावधी लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, यापूर्वी नेरळ - माथेरान मिनीट्रेन सेवा ही तोट्यात चालत असल्याचे कारण दाखवत प्रशासनाने या मार्गाकडे दुर्लक्ष केले होते. तर, अमन लॉज ते माथेरान या दरम्यान धावणारे शटल सेवेला पर्यटकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. यामुळे पुन्हा एकदा नेरळ- माथेरान दरम्यान धावणारी मिनीट्रेन पुन्हा सुरळीत करण्याची मागणी माथेरान येथील रहिवासी आणि पर्यटक करीत आहेत.