सातारा : साताऱ्यातील फलटणमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोरोनातून बरा होऊन घरी आलेल्या तरुणाला त्याच्याच मृत्यूची माहिती त्यालाच फोनवरुन देण्यात आली. कोरोनामुक्त तरुणाची शासकीय दफ्तरी मृत म्हणून नोंद झाली. या सर्व प्रकारामुळे आरोग्य यंत्रणेतील भोंगळ कारभार उघड झाला आहे. 


फलटणमधल्या मंगळवार पेठेत राहणारा 20 वर्षांचा तरुण सिद्धांत भोसले याच्या मोबाईलवर आरोग्यसेविकेचा फोन आला. सिद्धांतचा मृत्यू झाला आहे. त्याला इतर काही आजार होता का? आणि त्याच्याबाबत माहिती घ्यायची आहे, असं सांगण्यात आले. मलाच माझ्या मृत्यूची माहिती कशी काय देत आहेत असं म्हणत सिद्धांतने फोन त्याच्या आईला दिला. तेव्हा देखील सिद्धांत गेल्याची माहिती त्याच्या आईला देत इतर प्रश्नावली सुरु केली.


यावर सिद्धांतची आई भडकली आणि त्यांनी फलटण ग्रामीण रुग्णालयात जाऊन संबंधित परिचारिकेशी बातचीत केली. त्यावेळ सिद्धांतचं नाव मृतांच्या यादीत 46 व्या क्रमांकावर असल्याचं दिसून आलं. पण ज्याच्या मृत्युचं ऑडिट करायचं होतं तोच स्वत: रुग्णालयात आल्यामुळे तिथल्या कर्मचाऱ्यां धांदल उडाली. 


सिद्धांत 7 मे रोजी पॉझिटिव्ह आला होता. त्याला फलटणमधीलच भोकरे दवाखान्यात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर तर पाच दिवसानंतर (11 मे) त्याला घरी सोडण्यात आलं होतं. पण ग्रामीण रुग्णालयात मृतांच्या यादीत सिद्धांतची चुकीची नोंद नेमकी कशी झाली हे मात्र अद्याप समजलेलं नाही. परंतु उपचार घेतलेल्या दवाखान्यातून त्याचं नाव मृत यादीत गेला असावं असा शासकीय यंत्रणेचा अंदाज आहे.